रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील किल्ला. हा गुढे गावाजवळ वसलेला असून कुटगिरी नदीवरील पुलापासून पुढे ५० मी. अंतरावर कासारदुर्ग किल्ल्याचा खंदक लागतो. किल्ल्याच्या परिसरात चार ते पाच किमी. परिघामध्ये विरळ वस्ती आहे. या भागातील प्रचंड झाडीमुळे खंदक पूर्णपणे झाकला गेला आहे. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांतही तो सहज दिसत नाही.

खंदक, कासारदुर्ग.

किल्ल्याला तिन्ही बाजूंनी नदीने वेढलेले असून चौथ्या म्हणजे जमिनीकडील बाजूस, दक्षिणोत्तर परसलेल्या खंदकाच्या दोन्ही बाजूंस, नदीपर्यंत उतार दिलेला आहे. नदीच्या वक्राकार पात्राचा खुबीने वापर करून जमिनीच्या बाजूस बांधलेला खंदक नदीपासून सुरू होऊन पुन्हा नदीपाशी संपतो. खंदकाची रुंदी सु. १५ फूट असून सध्या खोली सु. ५.५ फूट आहे. खंदकात मोठी झाडे वाढलेली आहेत. ती वाढण्यासाठी किमान ७-८ फूटांचा मातीचा थर खंदकात खाली असला पाहिजे. म्हणजे खंदकाची एकूण खोली अंदाजे १२ ते १४ फूट असण्याची शक्यता आहे. खंदकाची एकूण लांबी सु. ३५० फूट आहे. खंदकाच्या आतील भागात तटबंदीचे अवशेष आहेत.

फांजी (तटाची भिंत), कासारदुर्ग.

किल्ल्यात सध्या भातशेती केली जाते. या शेतीच्या कामामुळे किल्ल्याचे अवशेष नष्ट होत चाललेले आहेत. जमिनीच्या बाजूने किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन ठिकाणी खंदक बुजवून रस्ता केलेला आहे. कासारदुर्गवरील खंदक ज्या प्रकारचा आहे, तसे खंदक रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड, गोपाळगड, यशवंतगड या किल्ल्यांना आहे. या किल्ल्यांच्या खंदकांनाही चढउतार असल्याने तेथे पाणी राहू शकत नाही.

या किल्ल्याचा उल्लेख अंजनवेलची वहिवाट  या कागदपत्रांत आलेला आहे. पवार या विजयनगरच्या सरदाराकडे जी तीन ठाणी होती, त्यामध्ये कासारदुर्ग होता. परिसरात शंभर वर्षांपूर्वी कासार लोकांची वसाहत होती, अशी माहिती मिळते. कासारदुर्ग, गुढे व माणिकदुर्ग हे तिन्ही किल्ले पालशेत बंदरावरून कऱ्हाड या बाजारपेठेकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर आहेत. या व्यापारी मार्गावर कर गोळा करण्यासाठी आणि या मार्गावरून जाणाऱ्या व्यापाऱ्यांना व वाटसरूंना संरक्षण देण्यासाठी हे तीन किल्ले बांधले असावेत. दुसरा एक योगायोग म्हणजे विजयनगर साम्राज्याने बांधलेल्या गंडीकोटा या किल्ल्याभोवती देखील नदीचे पाणी असून किल्ल्याला वळसा घालून नदी पुढे जाते. गुढे व कासारदुर्ग या विजयनगरने बांधलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्याच्या तीन बाजूने असेच नदीचे पाणी आहे. गंडीकोटा, गुढे व कासारदुर्ग या तीनही किल्ल्यांचा भौगोलिक आराखडा पाहिला असता तो सारखाच दिसतो.

संदर्भ :

  • जोशी, सचिन विद्याधर, रत्नागिरी जिल्ह्याचे दुर्ग वैभव, बुकमार्क पब्लिकेशन्स, पुणे, २०१३.
  • पोतदार, द. वा. अंजनवेलची वहिवाट, भारत इतिहास संशोधक मंडळ, त्रैमासिक, पुणे, १९१३.

                                                                                                                                                                                   समीक्षक :  जयकुमार पाठक