नागपूरकर जानोजी भोसले (कार. १७५५–७२) यांचे राजकीय सल्लागार. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे म्हणून प्रसिद्ध. दिवाकर पुरुषोत्तम किंवा दिवाकरपंत म्हणूनही परिचित. नाना फडणीस यांचे पुणे दरबारात जे स्थान होते, तेच स्थान देवाजीपंत यांना नागपूरकर भोसले यांच्या दरबारात होते.

सेनासाहेबसुभा रघूजी भोसले यांना दोन पत्न्या होत्या. त्यांच्यापासून त्यांना चार मुलगे झाले : मुधोजी, बिंबाजी, जानोजी व साबाजी. जानोजी व साबाजी हे दुसऱ्या पत्नीचे मुलगे होते; पण जानोजी सर्वांत मोठे होते. रघूजींनी आपल्या पश्चात जानोजी यांस नागपूर संस्थानची गादी मिळावी व इतरांना आवश्यक तेवढे उत्पन्न द्यावे, असे सांगितले होते. जानोजी रघूजींच्या अखेरच्या दिवसांत त्यांच्याबरोबर स्वारीत होते, तर मुधोजींना गाविलगडचा किल्ला सर करण्यास पाठविले होते. पुढे रघूजींचे निधन झाले (१४ फेब्रुवारी १७५५) आणि त्यांच्या मुलांत गादीबद्दल नंतर तंटे सुरू झाले. मुधोजी हे पहिल्या पत्नीचे सुपुत्र या नात्याने त्यांनी आपला वडीलपणा पुढे करून सेनासाहेबसुभ्याचे पद मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. तेव्हा जानोजी सावध होऊन त्यांनी आपली मजबुती करण्यास सुरुवात केली.

मुधोजींनी जानोजी यांना पत्र लिहिले की, ‘आम्ही वडील मातोश्रीचे. तेव्हा कनिष्ठ तुम्ही. दौलतीची मालकी आम्हांकडेस. तुम्ही आमचे आज्ञेत वागावे.’ याप्रमाणे मुधोजींनी वऱ्हाडातून खंडण्या घेऊन फौजा ठेवण्यास सुरुवात केली. सदाशिव हरी, पारोळेकर देशमुख, दिनकर विनायक, महिपतराव दिनकर इ. मंडळी मुधोजींजवळ होते. याउलट जानोजींकडे रघूजींच्या वेळचे सर्व सरदार व मुत्सद्दी होते. बाबूराव कोन्हेर, रखमाजी गणेश चिटणवीस, त्रिंबकजी राजे भोसले, नरहर बल्लाळ, कृष्णाजी गोविंद, शिवभट साठे, रघूजी करांडे, बिंबाजी वंजाळ, कृष्णाजी आटोळे, आनंदराव वाघ इ. महत्त्वाची माणसे जानोजींजवळ होती. त्या काळच्या वहिवाटेप्रमाणे पेशव्यांस नजराणा दिल्याशिवाय वस्त्रे मिळत नसत. जानोजी ज्येष्ठ असल्यामुळे त्यांनाच सेनासाहेबसुभ्याची वस्त्रे मिळविण्याकरिता त्रिंबकजी राजे भोसले व बाबूराव कोन्हेर यांना पुण्यास पेशव्यांकडे पाठविण्यात आले.

त्रिंबकजींकडे कोन्हेरराम उमरेडकर नावाचा एक कारकून होता. त्यांच्याकडे देवाजीपंत एक शागीर्द (सेवक) म्हणून होते. त्रिंबकजी जेव्हा पुण्यास सेनासाहेबसुभ्याच्या वस्त्रांकरिता गेले, त्या वेळी देवाजीपंतही सोबत होते. त्रिंबकजी व बाबूराव कोन्हेर यांचे नानासाहेब पेशव्यांशी नजराण्याबद्दल जे बोलणे चालले होते, ते सर्व देवाजीपंत लक्ष देऊन ऐकत. पुढे त्यांनी नानासाहेबांची मर्जी संपादन केली. नानासाहेबांनी त्यांना नित्य येण्याबाबत आज्ञा केली.

त्रिंबकजी व बाबूराव कोन्हेर हे नजराण्याची रक्कम दीड लाख रुपये ठरवण्याच्या तयारीत आहेत; तथापि जानोजींना मात्र नजराण्याची रक्कम ७ लाख रुपये सांगून ते लबाडी करत असल्याचे देवाजीपंताना समजले. तेव्हा त्यांनी जानोजींना भेटून याबाबत तपशीलवार सांगितले आणि ही कामगिरी माझ्याकडे दिल्यास मी नजराण्याची रक्कम अडीच लाख ठरवून आणतो, असे सांगितले. जानोजींनीही आपला फायदा ओळखून हे काम देवाजीपंतांवर सोपविले. देवाजीपंतांनी पुण्यास जाऊन नानासाहेब पेशव्यांना सांगितले की, ‘त्रिंबकजी व बाबूराव जर दीड लक्ष देत असतील, तर मी जानोजींकडून अडीच लक्ष देववितो.ʼ नानासाहेबांचाही एक लाखाचा फायदा होत असल्याने त्यांना ही गोष्ट पसंत पडली. अखेर देवाजीपंतांच्या मध्यस्थीने नजराण्याची रक्कम ठरली. देवाजींपंतांनी हुशारीने व संयमाने ही सर्व परिस्थिती हाताळली. त्यामुळे जानोजींची मर्जीही त्यांच्यावर पंतांवर बसली.

जानोजींना सेनासाहेबसुभा हे पद (अडीच लाख नजराण्याच्या बदल्यात) मिळणार हे मुधोजींना समजताच भोसले बंधूंतील कलह वाढला. त्याच वेळी ओरिसाचे (ओडिशा) सुभेदार शिवभट साठे १२ लाख रुपयांची खंडणी घेऊन नागपुरास आले. ते पैसे घेण्यावरूनही भोसले बंधूंचा आपसांतील संघर्ष आणखी वाढला. पुढे नानासाहेब पेशव्यांनी भोसले बंधूंना पुण्यास बोलावून त्यांच्यात तडजोडी करविल्या. त्यानुसार जानोजींना सेनासाहेबसुभा व मुधोजींना सेनाधुरंधर हे पद व चंद्रपूरचा सुभा देऊन त्यांनी जानोजींचा कारभार करावा, असे ठरले. तसेच दोन्ही भोसले बंधूंनी १०-१० लाख रुपये भरावेत, असेही ठरले. नानासाहेबांनी हा निकाल १७५७ साली दिला; तथापि जानोजींना प्रत्यक्ष कायदेशीर सनद ताराबाईंच्या हस्ते थोरल्या माधवरावांच्या कारकिर्दीत मिळाली (६ ऑगस्ट १७६१).

संदर्भ :

  • ओक, वामन दाजी, रा. रा. नागपूरकर भोसल्यांची बखर, पुणे, २०१७.
  • काळे, या. मा. नागपूर प्रांताचा इतिहास, पुणे, १९३४.
  • चिटणीस, गंगाधर माधव, नागपूरकर भोसल्यांचे चिटणीसी बयान, राजवाडे मंडळ, धुळे.
  • सरदेसाई, गो. स.; काळे, या. मा.; कुलकर्णी, कृ. पां. ऐतिहासिक पत्रव्यवहार, पुणे, १९३३.

                                                                                                                                                                                            समीक्षक : मंदार लवाटे