पंढरपूरचा तह : (११ जुलै १८१२). पेशवे आणि जहागीरदार यांच्यातील तह. महाराष्ट्रात १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पेशवे-जहागीरदारांच्या संघर्षाचे प्रश्न पुढे येण्यास सुरुवात झाली. यासाठी दुसरा बाजीराव व दक्षिणेकडील सरदार हे सारखेच जबाबदार होते. यांमध्ये पटवर्धन, पानसे, रास्ते, गोखले, निपाणीकर-देसाई, कित्तूरकर देसाई आदी जहागीरदारांचा समावेश होता. या संघर्षातूनच पुढे पंढरपूरचा तह घडून आला.

कृष्णा व तुंगभद्रा नद्यांच्या मधील प्रदेशावरून प्रामुख्याने हा संघर्ष होता. पेशव्यांनी हे प्रदेश विविध कारणांसाठी या जहागीरदारांना दिलेले होते. त्यासाठी त्यांना तैनात जाबते (अधिकार) दिले होते. या जाबत्यामध्ये काही बाबींचा स्पष्ट उल्लेख केलेला असे. उदा., कोणता प्रदेश, किती गावे, त्या प्रदेशातून किती महसूल गोळा होतो, महसूल गोळा करण्यासाठी किती सैन्य सरदारांनी पदरी बाळगावे इ. आणि यावरूनच पुढे संघर्ष सुरू झाला. याशिवाय इतर काही कारणे होती ती खालीलप्रमाणे :

१. पेशव्यांनी सरदारांना विशिष्ट भागात शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी काही प्रदेश तोडून दिलेला होता. त्यासाठी काही सैन्य बाळगून त्या भागातून महसूल गोळा करण्याचे काम सरदारांकडे होते. प्रत्येक प्रदेशांचा महसूल किती आहे, किती गोळा होतो तो कसा खर्च होतो, हे पाहण्यासाठी पेशव्यांनी जे आपले अधिकारी दरखदार म्हणून नियुक्त केलेले होते ते पेशवा-सरदार यांच्यामधील दुव्याचे काम करत.

२. सरदारांनी इनाम गावांच्या व्यतिरिक्त काही गावे, खेडी बेकायदेशीरपणे बळकावलेली होती. त्याचा कोणताही हिशेब पेशव्यांना दिलेला नव्हता.

३. जहागीरदारांना काही हक्क दिलेले होते, कामाच्या मोबदल्यात त्यांना काही जमिनी दिलेल्या होत्या; मात्र पुणे दरबारात सावळागोंधळ सुरू झाल्यानंतर जहागीरदारांनी इनाम गावाशिवाय आसपासचा भाग दडपून आपल्याकडे घेतलेला होता.

४. जहागीरदारांना त्यांच्या प्रदेशात शांतता, सुव्यवस्था टिकविण्यासाठी सैन्य बाळगण्याची परवानगी दिलेली होती. याला ‘सरंजामी सैन्य’ म्हणत. या सरदारांच्या फौजात त्यांच्या छोट्या जहागीरदारांच्या पथकांचा समावेश होत असे. पथकांच्या खर्चास सरकारकडून पैसा मिळत असे. इतलाखी फौजा म्हणजे नगदी फौजा होत. इतलाखी फौजांसाठी सरकारातून रोख पैसा मिळत असे. इतलाखी फौजांवर जहागीरदाराची पूर्ण सत्ता असे. प्रत्यक्षात इतलाखी फौजेसंबंधी पेशव्याला बऱ्याच वेळा माहितीही नसे. याचा फायदा जहागीरदार घेत. प्रत्यक्ष सैन्यापेक्षा जादा सैन्य कागदोपत्री दाखवून, वाढीव खर्च दाखवीत. जादा खर्चासाठी जादा प्रदेश अनधिकृतपणे बळकावीत असत.

५. जहागीरदारांना काही प्रसंगी वाढीव कामगिरीमुळे कर्ज होत असे, तेव्हा ते कर्ज फेडण्यासाठी पेशवे त्यांना काही काळासाठी प्रदेश तोडून देत. मात्र कर्ज फिटल्यावर तेवढाच प्रदेश पेशव्याला परत करणे जहागीरदाराची जबाबदारी असे. पण प्रत्यक्षात कर्ज फिटल्यावर तो प्रदेश तसाच अनधिकृतपणे जहागीरदारांकडेच राहात असे. उदा., पटवर्धन सरदाराकडे कर्नाटकातील प्रदेश हैदरचा बंदोबस्त करण्यापुरताच दिलेला होता. पण प्रत्यक्षात हैदरचा शेवट झाल्यानंतर तो प्रदेश पेशव्यांकडे परत आला नाही.

६. पेशवे काही विशिष्ट प्रसंगी सरदारांना जमीन तोडून देत असत. जहागीरदार काम झाल्यावर ती जमीन परत न करता स्वतःकडेच ठेवत. उदा., परशुरामभाऊ पटवर्धनला नौबत खर्चासाठी दिलेली जमीन परशुरामभाऊ मरण पावल्यानंतर रामचंद्रआप्पा पटवर्धन यांनी ती जमीन  पेशव्यांना परत केली नाही. बापू गोखले यांनी पेशव्यांच्या आदेशावरून प्रतिनिधीच्या प्रदेशावर हल्ले करून प्रदेश जिंकून घेतला, मात्र प्रदेश जिंकून झाल्यानंतर गोखल्यांनी प्रतिनिधीचा प्रदेश स्वतःकडेच ठेवून घेतला.

पेशवे काळात पूर्वीपासून असे व्यवहार चालू होते. मात्र याकडे फारसे कोणी लक्ष दिले नव्हते. दुसरा बाजीराव सत्तेवर आला आणि यातून संघर्ष सुरू झाला. जहागीरदारांनी आपल्याशी कसे वागावे यासंबंधी पेशव्यांच्या अपेक्षा होत्या. पेशव्यांनी इंग्रजांमार्फत आपल्या अपेक्षा जहागीरदारांपुढे मांडल्या. त्या खालीलप्रमाणे :

१. वसई तहानंतर पेशव्यांना पूर्वापार देण्याचे कर व महसूल जहागीरदारांनी बंद केला. त्या महसुलातून स्वतःचे सैन्य वाढविले व पेशव्यांचा प्रदेश बळकावला आहे.

२. जहागीरदारांना दिलेल्या तैनात जाबत्यामध्ये ज्या सर्व अटींची नोंद केलेली असे, त्या अटींची पूर्तता जहागीरदार करीत नाहीत.

३. पेशव्यांना गरज असेल तेव्हा सैन्य घेऊन त्याला मदत करावी, असे जहागीरदारावर बंधन असे, मात्र जहागीरदार हे बंधन पाळत नाहीत.

४. जहागीरदार स्वतःकडे अपेक्षेपेक्षा जादा सैन्य ठेवतात व सैन्याचे जादा पैसे वसूल करण्यासाठी ते पेशव्यांचाच प्रदेश बळकावतात. तेव्हा जहागीरदारांनी जादा सैन्य बाळगू नये व त्यासाठी आलेला खर्च, त्याच्या प्रदेशासह पेशव्याला परत द्यावा.

५. जहागीरदाराकडे असणाऱ्या शिबंदीपैकी (अनियमित सैन्य) प्रत्येक सैनिकाच्या पगारातून एक दिवसाचा पगार कापावा व वर्षअखेरीस तो पेशव्यांना द्यावा.

६. जहागीरदारांनी गैरहजर सैनिकांचा पगार कापून तो पेशव्यांना परत करावा.

पेशव्यांच्या या अपेक्षा बऱ्याच वर्षांपासूनच होत्या. मात्र पेशवे स्वत: कायदा राबविण्यास असमर्थ असल्याने मध्यस्थ म्हणून त्यांना इंग्रजांची मदत घ्यावी लागली. वसईच्या तहाने (१८०२) पेशव्यांवर काही बंधने आली होती. आर्थर वेलस्लीने पेशव्यांच्या वतीने पहिल्यांदा या अपेक्षांच्या बाबतीत प्रयत्न केला. वेलस्लीने स्ट्रॅचीच्या नेतृत्वाखाली एक मंडळ जहागीदारांकडे पाठविले होते. मात्र या काळात इंग्रज-मराठा दुसरे युद्ध सुरू झाल्याने ते शक्य होऊ शकले नाही. पुण्याचा इंग्रज वकील असलेल्या रसेल याने पेशव्यांची बाजू मांडून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. रसेलने तैनाती फौजेच्या माध्यमातून जहागीरदारांनी पेशव्यांचा बळकावलेला प्रदेश व जमिनी परत करण्याचे कबूल केले; परंतु रसेलची बदली झाल्याने हा प्रयत्न थांबला. या व्यतिरिक्त पेशवे-जहागीरदार संबंध बिघडण्याची आणखी कारणे होती. उदा., आप्पासाहेब पटवर्धनाने अनाधिकाराने हुबळीचा किल्ला आपल्याकडेच ठेवला. माधवराव रास्तेने बदामीचा किल्ला बळकावला होता, तो परत करण्यास पेशव्यास नकार दिला.

पेशवे-जहागीरदार संबंध बिघडत असताना खुद्द पेशव्यांनी जहागीरदारांचे प्रश्न सोडविण्याचा एक वेगळाच मार्ग स्वीकारला. पेशव्यांच्याकडे एखाद्या जहागीरदारांचा वाद गेल्यास पेशव्यांनी त्यांच्या जहागिरीच्या वाटण्या करून त्यांची शक्ती क्षीण करण्याचे धोरण स्वीकारले. उदा., पेशव्यांनी मध्यस्थी करून सांगली संस्थान, मिरज सरंजामामधून स्वतंत्र केले (१८०८). जहागीरदारांना पेशव्यांचे हे धोरण धोक्याचे वाटत होते. या घटना घडत असताना मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन पुण्यात इंग्रजांचा वकील म्हणून रुजू झाला (१८११). एल्फिन्स्टनला पेशव्यांना दुबळे करण्याची ही आयतीच संधी प्राप्त झाली.  पेशवे-जहागीरदारांचा प्रश्न सैन्याने सोडवल्याशिवाय महाराष्ट्रात ब्रिटिशांना यश मिळणार नाही, अशी एल्फिन्स्टनची धारणा होती. कारण या काळात पेशवे विविध मार्गांनी पैसे जमा करून सैन्याची जमवजमाव करत होते. पेशव्यांनी त्र्यंबकजी डेंगळे याला सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. इंग्रजांना या काळात पेशव्यांपेक्षा त्र्यंबकजी डेंगळे यांची जास्त भीती वाटत होती. पेशव्यांनी डेंगळ्यांच्या साहाय्याने आपले स्थान बळकट करण्यास सुरुवात केली. पेशव्यांनी एल्फिन्स्टनला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. एल्फिन्स्टनने तिकडे दुर्लक्ष केले. मात्र त्याचा उलटा परिणाम झाला. पेशवे -जहागीरदार हळूहळू मतभेद विसरून एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. आप्पासाहेब पटवर्धनाने पेशव्यांचा घेतलेला जादा प्रदेश परत करण्यास सुरुवात केली. माधवराव रास्तेने पेशव्यांच्या बळकावलेल्या जमिनी पेशव्यांना परत केल्या. बागलकोट व जालीहाळ परगणे परत केले. इतकेच नव्हे तर, बदामीचा किल्ला रास्तेने पेशव्यांना परत केला. बापू गोखल्याने प्रतिनिधीचा २५ किल्ले असलेला प्रदेश पेशव्यांना परत केला. चिंतामणराव पटवर्धनाने पेशव्यांपुढे एकदम नमते घेतले व पेशव्यांकडे ५०० सैन्य पाठविले. निपाणीच्या आप्पा देसाई याने कोल्हापूरकरांशी असलेले मतभेद मिटविण्याची तयारी दाखविली. पेशव्यांचे वाढते वजन लक्षात घेऊन, इंग्रजांनी तटस्थ राहणे योग्य नाही, हे एल्फिन्स्टनने ओळखले व कलकत्त्याच्या परवानगीने पेशवे-जहागीरदार संबंधांत हस्तक्षेप केला.

एल्फिन्स्टनने खरशेटजी मोदी या आपल्या प्रतिनिधीच्या मार्फत सर्व जहागीरदारांना पंढरपूरला जमण्याचे निमंत्रण दिले. पंढरपूरला सर्व सरदार एकत्र आले व पंढरपूरचा तह झाला (११ जुलै १८१२). या तहात खालील कलमांचा समावेश होता :

१. पेशवे आणि जहागीरदार यांनी आपापले पूर्वीचे अपराध विसरून जावेत.

२. पेशवे आणि जहागीरदार यांनी आपल्या पूर्वीच्या आर्थिक मागण्या सोडून द्याव्यात.

३. पेशव्यांनी जहागीरदारांच्याकडे तैनात जाबत्यामध्ये ज्या नोंदी आहेत, त्याच्यापेक्षा जादाची मागणी करू नये.

४. तैनात जाबत्याचे जहागीरदारांनी शब्दश: पालन करावे.

५. पेशव्यांशी जोपर्यंत जहागीरदार निष्ठावान राहतील, तोपर्यंत त्यांच्याकडे सरंजामी जमिनी असाव्यात. याला इंग्रज जामीन राहतील.

६. जहागीरदारांनी तैनात-जाबत्या व्यतिरिक्त जो प्रदेश घेतला असेल, तो पेशव्यांना परत करावा.

७. इंग्रजांच्या सल्ल्याशिवाय पेशव्यांनी कोणत्याही जहागीरदारांच्या जमिनी जप्त करू नयेत.

८. जहागीरदारांच्या संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिशांनी घ्यावी.

९. जहागीरदारांना पेशव्यांनी पूर्वापार सन्मानाने वागवावे.

१०. पेशवे-जहागीरदार वाद उत्पन्न झाल्यास दोघांनी इंग्रजांचा निवाडा मान्य करावा.

११. ब्रिटिशांना कोणत्याही जहागीरदाराशी स्वतंत्रपणे करार करण्याचा अधिकार असावा.

या तहाची अंमलबजावणी सुरू झाली. कंपनीने जहागीरदारांची पुनर्रचना सुरू केली. कित्तूरकर देसाई यांना वर्षाला ४५ हजार रुपयांचा प्रदेश पेशव्यांना परत करावा लागला. पटवर्धनना याचा सर्वांत जास्त फटका बसला. रामचंद्रआप्पा पटवर्धन याने ३० हजार रु., चिंतामणराव पटवर्धन सांगलीकर यांनी  ४५ हजार रु. आणि त्र्यंबक रघुनाथ पटवर्धन (कुरुंदवाडकर) यांनी रु. १० हजार किंमतीचा प्रदेश पेशव्यांस परत केला.

संदर्भ :

  • Varma, Sushma, Mountstuart Elphinstone in Maharashtra (1801-1827) : A Study of the Territories Conquered from the Peshwaas, K. P. Bagchi, Calcutta, 1981.
  • गोडबोले. कृ. ब. ना. मौन्टस्टुअर्ट एल्फिन्स्टन साहेब यांचे चरित्र, दामोदर सांवळाराम आणि मंडळी, मुंबई, १९११.
  • सरदेसाई. बी. एन. आधुनिक महाराष्ट्र, फडके प्रकाशन, कोल्हापूर, २०००.

                                                                                                                                                                                      समीक्षक : अवनीश पाटील