बोरकर, हरिश्चंद्र : ( ११ आक्टोबर १९४४ ). महाराष्ट्रातील झाडीबोली चळवळीचे प्रवर्तक आणि लोककर्मी व लोककलावंताचे संघटक लोककर्मी म्हणून प्रख्यात असणारे लेखक आणि संशोधक. त्यांनी ललित व ललितेत्तर विविध विषयांवरील १०७ ग्रंथांची निर्मिती करून मराठी सारस्वतांत आपले स्थान सिद्ध केले आहे. त्यांचा जन्म भंडारा जिल्ह्यातील रेंगेपार (कोहळी) या छोट्याशा खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रभाकर असून आईचे नाव गुणाबाई आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण भंडारा येथे पार पडले. उच्च माध्यमिक शालांत परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी साकोली येथे सोसायटी हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. अध्यापनाचे कार्य सुरू असतानाच त्यांचे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत कार्य सुरू होते. दंडार लोकनाट्याचा त्यांना बालपणापासूनच लळा होता. शिवाय हे करीत असतानाच त्यांनी खाजगीरीत्या परीक्षेला बसून बी. ए. व एम. ए. केल्यानंतर बी. एड. व एम. एड या अध्यापनक्षेत्रातील पदव्याही प्राप्त केल्या. पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एम.पी.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी आपला अठरा वर्षाचा शिक्षकी पेशा त्यागून वर्ग १ शिक्षणाधिकारी पदाचा स्वीकार केला. सतत अभ्यासाची आवड असल्यामुळे त्यांनी वयाच्या पन्नासव्या वर्षी झाडीबोलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन (१९९४) या विषयावर संशोधन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथून भाषाशास्त्रात आचार्य पदवी प्राप्त केली.
हरिश्चंद्र बोरकर यांची साहित्य संपदा : लोकनाट्य – घायाळ वाघीण (२००६),नवेगावचा कोलू पाटील (२०१०), रावणाघरी रामाचा पाहुणचार (खडीगंमत २०१०), रुख्मिणी स्वयंवर (२०१८); एकांकिका- वात्सल्य (२०१०); लोककथा – कथांचा क (२००५), आठवणीतील कथा (२००५), काही कथा लोक (२००५), दोन गोष्टी (२००९), दुर्गाबाई (२०१७), मांडोबाई (२०१७), असा रंगला विडा (२०१७), लघुकादंबरी – कोरोनाचा प्रकोप (२०२०); कवितासंग्रह – लोकगीते (१९९१), लोकशाहीची लोकगीते (१९९३), गीतहास्यायन (२००३), सुरसंगीता (२०१२), माझी शाहीरी (२०१५), अनुनाद (२०१६), कोश साहित्य – झाडीबोली मराठी शब्दकोश (२०००), विवेकसिंधू (२००२), मराठी अंत्याक्षरी कोश (२००९), ग्रामगीतेची शब्दश्रीमंती (२०१५); भाषाशास्त्रविषयक लेखन – झाडीबोली : भाषा आणि अभ्यास (१९९८),भाषिक भ्रमंती (२००८) ; लोकसाहित्य विषयक लेखन – विवाहगीते आणि मंगलाष्टके (१९९९), झाडीपट्टीची दंडार (१९९९), झाडीपट्टीची लोकरंगभूमी (२००४), झाडीपट्टीची लोकगीते (संकलन,२००५), लुप्तप्राय लोकाविष्कार (२००८), खडीगमंत : विदर्भाचे लोकलेणे (२००८), दंडारीची लोकसंपदा (२००९), विदर्भाचा डाहाका (२०११), झाडीपट्टीचे लोकरामायण (२०१७) इत्यादी.
हरिश्चंद्र बोरकर यांनी बालपणापासून नाटकाचे वेड जोपासले असून उत्कृष्ट नाटककार, कुशल नाट्यकलावंत, अनुशासनप्रिय दिग्दर्शक व कल्पक नेपनथ्यकार म्हणून त्यांचा झाडीपट्टी रंगभूमीवर दबदबा आहे. त्यांनी निर्मिलेल्या नाटकांची संख्या १३ असून त्यांच्या बहुतेक नाटकांना पौराणिकतेसोबत लोकसाहित्याची पार्श्वभूमी आहे. खेड्यात नाटक बसविताना बाहेरून नाटक बोलविणे आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे नसते. त्याकरिता बोरकरांनी दोन उपक्रम राबविले. त्यांनी गावातील हौशी महिलांचा शोध घेऊन त्यांच्याकरवी अनेक महिलांची नाटके उभारली. शिवाय गावातील कसबी जोडपी निवडून त्यांच्याकडून तीनचार स्त्रीपात्रे असलेली कौटुंबिक नाटके बसविली. बहुप्रवेशी नाटकातील प्रवेशाचे स्थळ बदलविताना अवधी जातो. त्यावर उपाय म्हणून ‘फिरता रंगमंच’ किंवा ‘सरकता रंगमंच’ असा पर्याय नागर रंगभूमीने उभारला. पण तेवढा खर्च करणे खेड्यातील हौशी मंडळाला शक्य नव्हते. त्याकरिता बोरकरांनी ‘जुळा रंगमंच’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. आज नाट्यक्षेत्रात ‘जुळा रंगमंचवाले बोरकर’ हीच त्यांची ओळख ठरली आहे.
दंडार या स्थनिक लोकनाट्याचा वापर करून त्यांनी लिहिलेले घायाळ वाघीण हे मराठीतील पहिले दंडार-लोकनाट्य असून ते अतिशय लोकप्रिय ठरले आहे. नवेगावचा कोलू पाटील ही दंडारीची संहिता तयार करून ती नेवगाव बांधलाच अनेक जलतज्ञांच्या उपस्थितीत सादर केली. शिवाय कोहळी विवाहगीतांवर आधारित रुख्मिणी स्वयंवर हे त्यांचे दंडारनाट्य देखील दखलपात्र ठरले आहे. त्यांनी रचून सादर केलेली रावणाघरी रामाचा पाहुणचार ही खडीगंमत नागपूर पासून तर मुंबईपर्यंत रसिकांची मने जिंकून गेली. तिचे हिंदी रूपांतर रावण के घर रामजी मेहमान हे थेट प्रयागराज येथे उत्तर मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या रवींद्र भवनात सादर झाले आहे. तेथील या प्रयोगाचा प्रभाव स्थानिक लोककलावंतांवर असा पडला की आता ते आपल्या रामलीलेत या प्रसंगाचा समावेश करायला लागले आहेत. बोरकरांनी नाटकांसोबत अनेक एकांकिकादेखील प्रकाशित केल्या असून त्यांचाही मूळ गाभा लोककला आहे. त्यांच्या वात्सल्य या एकांकिकेला शासनाने उत्कृष्ट एकांकिका म्हणून गौरविले आहे. बोरकरांनी विपुल कथालेखन केले आहे. त्यांपैकी अनेक कथांना लोकसाहित्याची झालर लाभली आहे. त्यांनी लिहिलेल्या दुर्गाबाई, मांडोबाई, असा रंगला विडा ही स्थानिक लोककथांची दीर्घ रूपांतरे आहेत. एखाद्या घटनेवर त्वरित कथा रचण्यात ते प्रसिद्ध आहेत. कोरोनाची साथ येताच त्यांनी त्या विषयावर मंथन करून तात्काळ कोरेानाचा कोप ही लघुकादंबरी प्रकाशित केली. समग्र मराठी साहित्यात या विषयावर सर्वप्रथम लेखन प्रकाशित करण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
कविता व गीते यांची रचना त्यानी विपुल प्रमाणात केली आहे. बालकवितेपासून तर क्रांतिगीतांपर्यंत त्यांनी सर्वच प्रकारची रचना केली आहे. प्रमाण मराठीसोबत झाडीबोलीतही या रचना आहेत. त्यांची अनेक गीते शाळांत तर गायली जातातच; शिवाय दंडार व खडीगंमत यांतही शाहीर गात असतात. त्यांत त्यांनी वेळोवेळी रचलेल्या गौळण, भारूड, लावणी, पाळणा, फटका इत्यादी प्रकारांतील लोकगीतांचा समावेश आहे. विनोद हा देखील त्यांच्या रचनांचा एक गुण आहे. प्रसिद्ध गीतरामायण वर त्यांनी रचलेले गीतहास्यायन हे एका काव्यसंग्रहावर संपूर्ण विडंबन केलेले पहिले विडंबनकाव्य ठरले आहे. त्यांचे केवळ मराठीवरच नाही तर संस्कृतवरही तेवढेच प्रभुत्व आहे हे त्यांनी केलेल्या भगवतगीतेच्या भावगीतमय अनुवादावरून सिद्ध होते. सुरसंगीता हे मराठीतील भगवतीचे एकमेव भाषांतर होय. विद्यार्थीदशेत त्यांनी आपल्या अभ्यासक्रमातील क्रमिक इंग्रजी पुस्तकांतील कवितांचा अनुवाद केला होता. तो त्यांनी आता अनुनाद शीर्षकांतर्गत प्रकाशित केला.
संशोधन क्षेत्रात त्यांचा लौकिक आहे. नागपूरच्या विदर्भ संशोधन मंडळाने त्यांना संशोधन महर्षी (२०१७) ही पदवी देऊन गौरविले. त्यांनी विविध कोश निर्माण केलेत. त्यांचा झाडीबोली मराठी शब्दकोश हा मराठी प्रादेशिक बोलीचे सामर्थ्य प्रकट करणारा कोश आहे. ग्रामगीतेची शब्दश्रीमंती या त्यांच्या कोशग्रंथाने आधुनिक काळातील संतांच्या भाषिक अभ्यासाच्या दिशा ठरवून दिल्या आहेत. विवेकसिंधू च्या संपादनाने ग्रंथातील बोलीवरून कवीच्या स्थानाचा शोध हा नवीन मार्ग त्यांनी संशोधकांना दिला आहे. तर त्यांचा मराठी अंत्याक्षरी कोश मराठीतील पहिला आणि एकमेव अंत्याक्षरी कोश आहे. झाडीबोलीचे प्रणेते म्हणून बोरकरांचे नाव सर्वश्रुत व सर्वमान्य झाले आहे. ‘बोली वाचवा, मराठी वाचवा; बोली वाचवा, भाषा वाचवा’ असा घोष करीत त्यांनी तीस वर्षापूर्वी स्थापन केलेली ही चळवळ आता केवळ झाडीपट्टी पुरतीच मर्यादीत राहिली नसूंन मराठी बोली साहित्य संघाच्या रूपाने महाराष्ट्रस्तरीय झाली आहे. शिवाय ती सर्वदूर भारतभर पोहोचली. त्यांचा झाडीबोली : भाषा आणि अभ्यास हा ग्रंथ शासकीय पुरस्काराशिवाय पुण्याचे मराठी अभ्यास परिषद आणि नागपूरचे विदर्भ साहित्य संघ यांच्या पुरस्कारांचा मानकरी ठरला असून भाषा शास्त्रीय संशोधन करणार्यांना तो आदर्श ठरला आहे. भाषिकभ्रमंती हा त्याच विषयावरील ग्रंथही शासकीय पुरस्कारासह नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाच्या पुरस्कराने सन्मानित असून त्याने मराठी अभ्यासकांना समाजभाषा विज्ञानाचा मार्ग उपलब्ध करून दिला आहे.
बोरकरांनी लोकसाहित्यविषयक लिखाणदेखील विपुल प्रमाणात केले आहे. झाडीपट्टीच्या लोकरंगभूमीचा इतिहास कथन करणारा झाडीपट्टीची लोकरंगभूमी आणि झडीपट्टीतून अस्तंगत होत चाललेल्या लोककलांचा शोध घेण्याारा लुप्तप्राय लोकाविष्कार हे दोन्ही ग्रंथ या संदर्भात महत्वाचे आहेत. १९८०-९० या दशकात संपलेले दंडार लोकनाट्य त्यांनी प्रयत्नपूर्वक पुन्हा उभे केले. त्यावर अनेक संशोधनपूर्ण लेख लिहिलेत. त्यातूनच झाडीपट्टीची दंडार हा ग्रंथ आकारास आला. खडीगंमतीचे स्वरूप व प्रदर्शन यावर त्यांनी रचलेला खडीगंमत : विदर्भाचे लोकलेणे हा ग्रंथ अनेकांना पथदर्शक आहे. या दोन्ही ग्रंथांचे हिंदी अनुवाद दंडार : नृत्य नाट्य का लोक आविष्कार (२००९) आणि खड़ी गंमत : विदर्भ की लोक विधा (२००८) प्रकाशित झाले असून त्यामुळें बोरकरांचं नाव लोकसाहित्यिाचे अभ्यासक म्हणून संपूर्ण भारतभर पोहोचण्यास मदत झाली. त्यांनी संपूर्ण मराठवाडा-विदर्भासह दक्षिण मध्यप्रदेश धुंडाळून सिद्ध केलेला विदर्भाचा डाहाका हा ग्रंथ डाहाका वादकांना संजीवनी देऊन गेला आहे. याच डाहाक्यातील गीतांना अनुकूल संवाद टाकून त्यावरून त्यांनी सिद्ध केलेला नवीन डाहाका ‘बोरकरांचा खडा डाहाका’ या नावाने नावारूपाला आला आहे. डाहाका वादनाला प्रयोगरूप प्राप्त झाले असल्याने त्यामुळे लोककलाकारांना व्यवसायाचे नवीन साधन उपलब्ध झाले आहे. बोरकरांच्या नवनिर्मितीक्षमतेमुळे ही अपूर्व किमया घडून आली. त्यांनी कोहळी विवाहगीते संकलित करून त्यांचाही विवाहगीते आणि मंगलाष्टके हा संग्रह प्रकाशित केला आहे. त्यांनी महादेवाची गाणी, पोळाच्या झडत्या, श्रमगीते, पाळणे, बडबडगीते इत्यादी लोकगीते झाडीपट्टीची लोकगीते या संग्रहातून प्रकाशित केली आहेत. समग्र झाडीपट्टीचे सांस्कृतिक दर्शन घडविणारा झाडीपट्टीची लोकरंगभूमी हा ग्रंथ समृद्ध वारशाचा साक्षात्कार देतो. दोन दशकांत उपलब्ध झालेल्या नवीन तथ्यांचा उपयोग करून सिद्ध झालेला दंडारीची लोकसंपदा या ग्रंथात दंडारीचे अनेक अकथित पैलू दर्शविले आहेत. झाडीपट्टीतील अनेक गीतांतून केवळ रामायणाशी संबंधित गीते निवडून त्यावरून साकारलेला झाडीपट्टीचे लोकरामायण हा ग्रंथ संशोधनाची वेगळी वाट दर्शविणारा ग्रंथ आहे.
परंपरागत लोकनाट्याच्या मूळ स्वरूपाला किंचितही धक्का लागू न देता त्यास रसिकप्रिय असे प्रयोगरूप देण्यावर बोरकरांचा नेहमी भर असतो. त्याकरिता त्यांनी दंडारीपासून सुरुवात केली. पात्रबाहुल्य हा दंडारीतील मोठा दोष आहे, हे त्यांनी ओळखले. ३०-३५ व्यक्तींना एकत्रित आणणे व त्यांच्याकडून मनासारखे कामे करवून घेणे अतिशय जिकिरीचे ठरायचे. त्यामुळेच हळूहळू दंडार लयाला गेली हे खरे कारण त्यांनी ओळखले आणि पात्रांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला. आज केवळ १२ ते १५ नटांवर ते आपले काम आटोपतात. दंडारीत फार पूर्वी गोफाचा नाच असायचा. पण आता तो केवळ कथेचा विषय झाला होता. बोरकरांनी अनेक ठिकाणी क्षेत्र संशोधन करून वृद्धांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्याकडून तो नाच बसविण्याचे आश्वासन घेतले. बोरकरांनी स्वत:च्या चिकित्सक बुद्धीतून तो नाच बसविला. आज झाडीपट्टीतील अनेक दंडारमंडळे तो नाच दाखवीत असतात. एकदा लयास गेलेली लोककला पुन्हा जिवंत करता येत नाही असे म्हणतात ; पण बोरकरांनी आपल्या प्रयत्नाने दंडार जिवंत करून त्या परंपरागत नियमाला छेद दिला आहे. दंडारीतील प्रदीर्घ गीतांतील केवळ तीन कडवी स्वीकारून आणि त्यातील संवादांचा पाल्हाळ दूर करून त्यांनी आपल्या गावात एक आदर्श दंडार उभी केली. तिची ध्वनिचित्रफीत तयार करून अनेक दंडार मंडळांना दाखविली. त्यांना तशी दंडार बसवायला लावली. त्यानंतर कामगार कल्याण केंद्राच्या सहकार्याने दंडार महोत्सवाचे आयोजन करून दंडार लोकप्रिय केली. एकेकाळी नामशेष झालेली दंडार आज पुन्हा सजीव झाली असून १०० च्यावर मंडळे कार्यरत आहेत. कित्येक शतके गावाच्याबाहेर न गेलेली दंडारकारांनी या विविध परिवर्तनामुळे केवळ नागपूर, मुंबई या महानगरांतच नाही तर राजस्थनातील उदयपूरच्या शिल्पग्राम महोत्सवामध्ये त्यांची दंडार अनेकदा सादर केली गेली आहे. मुलुंड, मुंबई येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात दंडार सादर करून अभिजनांना वैदर्भीय लोकनाट्य पाहण्याची संधी प्रथमच प्राप्त करून दिली. लोकसाहित्याच्याच नव्हे तर नाटकाच्याही इतिहासात नोंद घेतली जावी अशी ही घटना बोरकरांमुळे प्रत्यक्षात घडून आली.
त्याचप्रमाणे खडीगंमतमधील अर्वाच्य प्रकारांना फाटा देउन ती सहकुटुंब पहाता येईल असे सोज्वळ रूप तिला प्रदान करण्याचे यशस्वी प्रयत्न त्यांनी केले. प्रत्येक लोकनाट्याला विशिष्ट पोषाखाची आवश्यकता प्रतिपादन करून एक वेगळा कलावंत वर्ग बोरकांनी तयार केला. त्यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले. शासनाशी वेळोवेळी संपर्क साधून विशेष अनुदानाची सोय करावयास लावली. दरवर्षी खडीगंमत महोत्सवाचे आयोजन करण्याची देखील योजना कार्यान्वित करून एक वेगळे परिवर्तन घडविले. त्यामुळेच गुरुशिष्यपरंपरा योजनेनुसार नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने त्यांना दंडार लोकनाट्याचे गुरू म्हणून मान्यता दिली असून उदयपूरच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने खडीगंमतीचे गुरू मनोनित केले आहे. राज्य आणि केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयाशी ते विविध नात्याने संबंधित असून लोककला व लोककलावंत यांच्या उत्थानार्थ अधिकाधिक मदत मिळविण्याकरिता सतत प्रयत्न करत असतात. वृद्ध कलावंतांना मदत मिळवून देणे, अर्धवट मदत मिळून ती खंडित झाली असल्यास पूर्ववत मिळवून देणे, मृत कलावंताच्या पत्नीला त्यांची पेन्शन पूर्ववत प्राप्त करून देणे अशा कामात त्यांनी स्वत:ला सतत गुंतवून ठेवले आहे. भारतीय लोककला संघ, प्रयाग या संस्थचे उपाध्यक्ष या नात्याने संपूर्ण भारतभर त्यांची भ्रमंती चालू असते. त्यामुळे देशभर त्यांची ओळख आहे. झाडीपट्टीमध्ये सर्वसमावेशक लोककलाकार संघाच्या वतीने त्यांचा जन्मदिवस ११ आक्टोबर ‘लोककला दिवस’ म्हणून उत्साहाने दरवर्षी साजरा होत असतो.
बोरकरांचा संस्थाप्रपंच मोठा असून झाडीबोली साहित्य मंडळ व मराठी बोली साहित्य संघाचे ते संस्थापक, अध्यक्ष आहेत. भारतीय लोककला महासंघाचे उपाध्यक्ष असून महाराष्ट्र लोककला संघाचे समन्वयक आहेत. शिवाय महाराष्ट्रातील अनेक लोककलाविषयक संस्थांचे ते मार्गदर्शक आहेत. या संस्थांच्या लोकपीठांवर त्यांचे सदैव कार्य सुरू असून ते दरवर्षी लोकोत्सवांचे आयोजन करीत असतात. लोककलाकारांच्या अडचणी सोडविण्यात ते सदैव तत्पर असतात. बोरकरांना संपूर्ण भारताील प्रतिष्ठित प्रतिष्ठानांकडून सन्मानित करण्यात आले असून या पुरस्कारांची संख्या पन्नासाच्यावर गेली असून महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार त्यांना चार वेळा प्राप्त झाला आहे. त्यापैकी दंडार : नृत्य नाट्य का लोक आविष्कार ग्रंथ असून त्यास महाराष्ट्र हिंदी अकादेमीचा फणीश्वरनाथ रेणू लोकसाहित्य पुरस्कार देउन गौरविण्यात आले आहे. लोकसाहित्याच्या क्षेत्रांत मिळालेल्या पुरस्कारांपैकी काही पुरस्कार पुढीलप्रमाणे डॉ. गंगाधर मोरजे स्मृती लोकगंगा पुरस्कार (२०१०), श्री कृष्णा लोक सांस्कृतिक विकास संस्थान, सागर, मध्यप्रदेशचा लोककला रत्न सम्मान (२०११), जोतिबा फुले झाडीपट्टी दंडार मंडळ, म्हसवानीचा दंडार महर्षी पुरस्कार (२०१४), स्वर्ग सांस्कृतिक संस्थान, अलाहाबाद, उत्तर प्रदेशचा लोककला सदिच्छादूत पुरस्कार (२०१५), लोककला संस्थान, गुजराथचा राष्ट्रीय कलागुरु पुरस्कार (२०१८), स्वर्ग सांस्कृतिक संस्था, अलाहाबादचा लोककला महर्षी सम्मान (२०१८), झी चोवीस तास, नागपूरचा अटल सन्मान (२०१८) याशिवाय बोरकरांना २०१९ ला महाराष्ट्र शासनाने मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
संदर्भ :
- आरेकर,नरेंद्र, शब्दयोगी : डॉ. हरिश्चंद्र बोरकर साहित्यादर्शन, २०१९.
- जयस्वाल, राजन, झाडीपट्टीचा झंझावात, २००१.
- बोढेकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत, हरिश्चंद्राची फॅक्टरी, २०१८.
- रंगारी ,मिलिंद, झाडीचा राजा हरिश्चंद्र, २०१७.