पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या सरासरी तापमानवाढीची प्रक्रिया म्हणजे जागतिक तापमानवाढ होय. याचबरोबर हवामानातील आताचे बदल व त्यामुळे होणारे भविष्यात होणारे बदल यांचाही उल्लेख यासंदर्भात करण्यात येतो.
हरितवायूंचे उत्सर्जन : पृथ्वीवर यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिकातील बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्या वेळेसची तापमानवाढ ही पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व पृथ्वीच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याचे तापमानवाढ पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वे हरितवायू परिणामामुळे होत आहे. जागतिक तापमानवाढीस मुख्यत्वे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, यूरोप, चीन, जपान हे देश जबाबदार आहेत. याचे मुख्य कारण त्यांचा मोठ्या प्रमाणावरील ऊर्जेचा वापर व मोठ्या प्रमाणावरील हरितवायूंचे उत्सर्जन. यातील अमेरिका हा सर्वाधिक हरितवायूंचे उत्सर्जन करणारा देश आहे.
इतिहासातील तापमानवाढीच्या घटना : गेल्या शंभर वर्षांत यापूर्वी कधीही झालेली नाही एवढ्या झपाट्याने तापमानवाढ झाली आहे. विषुववृत्तीय भागातील जी थोडी पर्वत शिखरे हिमाच्छादित आहेत, त्यातील किलिमांजारो हे पर्वत शिखर प्रसिद्ध आहे. या पर्वत शिखरावरील हिमाच्छादन १९०६ च्या तुलनेत २५ टक्केच उरले आहे. आल्प्स आणि हिमालयातील हिमनद्या मागे हटत चालल्या आहेत आणि हिमरेषा म्हणजे ज्या ऊंचीपर्यंत कायम हिमाच्छादन असते ती रेषा वर वर सरकत चालली आहे. एव्हरेस्टवर जाताना लागणारी खुंबू हिमनदी १९५३ ते २००३ या ५० वर्षांत पाच किमी. मागे सरकली आहे. १९७०च्या मध्यापासून नेपाळमधील सरासरी तापमान १००से.ने वाढले, तर सैबेरियातील कायमस्वरूपी हिमाच्छादित प्रदेशात गेल्या ३० वर्षांत म्हणजे १९७५-७६ पासून १.५० से. तापमानवाढ नोंदवण्यात आली असून येथील हिमाच्छादन दरवर्षी २० सेंमी.चा थर टाकून देत आहे. इत्यादी जागतिक तापमानवाढीची अनेक उदाहरणे आहेत.
हरितगृह परिणाम : हरितगृह हे खास प्रकारच्या वनस्पती वाढविण्यासाठी बनवलेले काचेचे घर असते. हे घर वनस्पतींना बाह्य हवामानाचा परिणाम होऊ नये म्हणून बंदिस्त असते व ऊबदार असते. हे घर काचेचे बनविलेले असते व त्यातून आत आलेली उष्णता बाहेर जाण्यास मार्ग नसल्याने आतील तापमान ऊबदार राहत असल्याच्या संकल्पनेमुळे ही संज्ञा जागतिक तापमान वाढीत वापरतात. काही वायूंच्या रेणूंची रचना अशा प्रकारची असते की ते अवरक्त लहरी (infra-red waves) परावर्तित करू शकतात. कार्बन डाय-ऑक्साइड, मिथेन, डायनायट्रोजन ऑक्साइड व पाण्याची वाफ हे प्रमुख वायू असे आहेत जे अवरक्त लहरी परावर्तित करू शकतात. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या ऊर्जेत या लहरींचा समावेश असतो. पृथ्वीवर येणाऱ्या बहुतेक अवरक्त लहरी व इतर लहरी दिवसा भूपृष्ठावर शोषल्या जातात. त्यामुळे पृथ्वीवर दिवसा तापमान वाढते. सूर्य मावळल्यावर ही शोषण प्रक्रिया थांबते व उत्सर्जन प्रक्रिया सुरू होते व शोषलेल्या लहरी अंतराळात सोडल्या जातात. परंतु काही प्रमाणातील या लहरी वर नमूद केलेल्या वायूंमुळे पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात परावर्तित होतात व रात्रकाळात पृथ्वीला ऊर्जा मिळते.
खालील वायू मुख्यत्वे पृथ्वीवरील तापमान उबदार ठेवण्यास मदत करतात
वरीलप्रमाणे वाफ, कार्बन डाय-ऑक्साइड हे प्रमुख वायू आहेत ज्यामुळे हरितगृह परिणाम पहावयास मिळतो. पृथ्वीवर पाणी प्रंचड आहे व त्यामुळे वातावरणातील वाफेचे प्रमाणदेखील खूप आहे व त्यामुळेच हरितगृह परिणामात वाफेचा मोठा वाटा आहे. परंतु वाफेचे अथवा बाष्पाचे प्रमाण हे वातावरणात निसर्गनिर्मित असते. सूर्य समुद्राच्या पाण्याची वाफ तयार करतो व त्या वाफेचा पाऊस पडतो. ही प्रक्रिया निसर्गात अव्याहतपणे चालू असते त्यामुळे वातावरणातील वाफेचे प्रमाण हे बऱ्यापैकी एकसारखे असते. तसेच वाफेची हरितगृह वायू म्हणून ताकद इतर वायूंपेक्षा कमीच असते. त्यामुळे सध्याच्या जागतिक तापमानवाढीमध्ये वाफेचा फारसा वाटा नाही.
कार्बन डाय-ऑक्साइड व तापमानवाढीचा संबंध : वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे हरितगृह परिणामात दुसरा महत्त्वाचा वायू म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइड हा आहे. जग विकसित देश व विकसनशील देश या प्रकारात विभागले आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर विकसित देशात मोठ्या प्रमाणावर कोळसा व खनिज तेलावर आधारित ऊर्जेचा वापर सुरू झाला व ज्वलन प्रकियेमुळे कार्बन डाय-ऑक्साईडचे मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन सुरू झाले. १९७०च्या दशकानंतर विकसनशील देशांनीही विकसित देशांच्या पावलांवर पाऊल टाकून ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू केला. अति प्रमाणात कोळसा व पेट्रोल यांचा वापर व त्याचवेळेस कमी झालेली जंगले यामुळे वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण अजून जोमाने वाढण्यास मदत झाली. औद्योगिक क्रांती यूरोपमध्ये १७६० च्या सुमारास झाली त्यावेळेस वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण २६० पीपीएम (Parts per Million) इतके होते. १९९८ मध्ये हेच प्रमाण ३६५ पीपीएम इतके होते तर २००९ मध्ये ४०० पीपीएम च्या जवळ पोहोचले आहे. हे प्रमाण वाढण्यास केवळ मानव जवाबदार आहे. केवळ कार्बन डाय-ऑक्साइड नव्हे तर मानवी कृत्यांमुळे मिथेनचेही वातावरणातील प्रमाण वाढत आहे. मिथेन हा कार्बन डाय-ऑक्साइडपेक्षा २१ पटीने जहाल हरितवायू आहे.
संदर्भ :
- Joseph J. Romm, Climate Change, 2016.
- Naomi Klein, This Changes Everything : Capitalism vs. the Climate, Canada.