व्यापारवादाच्या काळात अर्थशास्त्रीय विचारांना दिशा मिळाली असली, तरी त्यास सैद्धांतिक स्वरूप प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे व्यापारवादी विचार हे अर्थशास्त्रपूर्व विचार म्हणून ओळखले जातात. व्यापारवादाचा नेमका कालखंड निर्देशित करता येत नसला, तरी चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात सुमारे ३५० वर्षांचा कालखंड या विचारांनी प्रभावित होता, असे दिसून येते.

व्यापारवादी विचारसरणी ही एखाद्या देशात, एखाद्या व्यक्तिने अथवा गटाने जाणीवपूर्वक मांडलेली विचारसरणी नसून ती युरोपातील अनेक तत्कालीन विचारवंतांनी तेव्हाची आर्थिक स्थिती आणि आर्थिक प्रश्न यांना अनुसरून काही समान मते मांडलेली आढळून येतात. त्यावर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांनी केलेल्या टीकेमुळे अर्थशास्त्रीय विचारांच्या इतिहासात त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘व्यापारवृद्धी’ हा या सर्व धोरणांमधील जोडणारा दुवा असल्यामुळे त्यास व्यापारवाद असे संबोधणे समर्पक मानावे लागते. मध्ययुगात ‘कॅमेर’ हा जर्मनी शब्द ‘सरकारी खजिना’ या अर्थाने वापरला जात असल्याने जर्मनीत ही विचारसरणी ‘कॅमेरॅलिझम’ या नावाने ओळखली गेली; तर सुरुवातीच्या काळात सोने, चांदी या मौल्यवान धातूंना केंद्रस्थानी मानणारी ही विचारसरणी ‘धातुवाद’ म्हणुनही ओळखली जाते. फ्रान्समध्ये कोल्बर्ट यांनी तिचा प्रचार केला. त्यामुळे तिला फ्रान्समध्ये कोल्बर्टवाद असे संबोधले गेले. व्यापारातून देश संपन्न बनविण्यासाठी शासनाने व उद्योगसंस्थांनी बंधनांचा वापर करावा, अशी या विचारवंतांची शिफारस होती. त्यामुळे अर्थशास्त्रीय विचारांचे काही इतिहासकार त्यास ‘निर्बंधक पद्धत’ (रिस्ट्रिक्टिव्ह सिस्टिम) असेही संबोधतात.

व्याख्या : व्यापारवादाच्या व्याख्या अनेक विचारवंतांनी केल्या आहेत. त्यांपैकी काही महत्त्वाच्या व्याख्या पुढील प्रमाणे :

  • रॉबर्ट लेक्चमन यांच्या मते, ‘व्यापारवाद म्हणजे अडथळे निर्माण करणाऱ्या मध्ययुगीन विचार व परंपरा यांविरुद्ध केलेला संघर्ष होय’.
  • एच. एल. हॅने यांच्या मते, ‘सोळाव्या शतकापासून ते अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत जे आर्थिक विचार युरोपातील राजकारणी व्यक्ती, मुत्सदी यांनी मान्य केले, त्या सर्वांचा समावेश व्यापारवादात केला जातो’.
  • ओथ्मर स्पॅन यांच्या मते, ‘त्या काळच्या आर्थिक जीवनात राज्यकर्ते व व्यापारी यांनी ज्या तत्त्वांचा किंवा सिद्धांतांचा प्रयत्यक्ष व्यवहारात उपयोग केला, त्यांचा एकत्रित रित्या निर्देश करण्यासाठी स्थूलमानाने व्यापारवाद ही संज्ञा वापरली जाते’.

‘देशाची निर्यात वाढवून देश संपन्न व सामर्थ्यवान घडवावा’, अशी या विचारसरणीमागील प्रेरणा होती. हे विचार युरोपातील इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्पेन या देशांत वेगवेगळ्या विचारवंतांकडून मांडले गेले. ‘जास्त सोने व मौल्यवान धातू मिळवून जास्त शक्तीशाली बना’, हे व्यापारवादाचे घोषवाक्य होते. व्यापारवादी विचारवंतांच्या मते, देशाची आर्थिक संपन्नता अधिक असेल, तर देशाचा विकास होऊन देश शक्तीशाली बनतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय उद्देश साध्य करताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. देशांतर्गत शांतता राहून इतर देशांच्या आक्रमणांपासून देश सामर्थ्य राहून संरक्षण करतो. व्यापारवादाच्या सुरुवातीच्या काळात सरकार, राजकीय नेते, विचारवंत, प्रशासकीय अधिकारी, अर्थशास्त्रज्ञ आणि उद्योजक या सर्वांनी व्यापारवादाचे समर्थन केले होते.

जर्मनी व ऑस्ट्रियामध्ये आर्थिक मागासलेपणामुळे सरकारवरील अवलंबित्व अधिक होते. त्यामुळे तेथे व्यापाराच्या माध्यमातून देश संपन्न करण्याची व्यापारवादी विचारसरणी ही व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांसाठी मांडलेल्या विचारांच्या स्वरूपात पुढे आली नाही, तर ती तेथील सरकारी तिजोरीतील भरणा वाढविण्याची कल्पना म्हणून मान्यता पावली. व्यापारवाद्यांच्या निर्यात अधिक्यात फक्त वस्तुरूप निर्यातीचाच विचार केलेला नव्हता, तर वाहतुकीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सेवारूप उत्पन्नाचाही विचार केलेला आढळून येतो. तसेच निर्यातीचे उत्पन्न वाढविण्याचा प्रमुख मार्ग निर्यातमालाचे फक्त मूल्य बदलणे नसून निर्यातीचे प्रमाण वाढविणे हे आहे. याची जाणीव व्यापारवाद्यांनी होती.

व्यापरवादाच्या उदयाची कारणे : युरोपमध्ये चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात आर्थिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक या क्षेत्रांत अनेक मोठे बदल घडून आलेत. त्यामुळे व्यापारवाद उदयास आल्याचे दिसते.

  • सरंजामशाहीचा अस्त : सरंजामशाहीत राजाचा हक्क होता; मात्र व्यवहारात सरंजामदारालाच त्याच्या जहागिरीमध्ये सर्वाधिकार होते. त्यामुळे शेतकरी त्यांच्या पारतंत्र्यात होते. शेती करण्याची पारंपारिक पद्धत होती. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण उपजिविकाप्रधान अर्थव्यवस्था होती. कालांतराने सरंजामशाहीचा ऱ्हास होऊन बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था, शास्त्रशुद्ध शेती, शेतकऱ्यांची मुक्ती, व्यापारात वाढ इत्यादी व्यापारवादाला पोषक परिस्थिती निर्माण झाली.
  • धर्मसुधारणा चळवळ : युरोपमध्ये चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात सर्वबाबतींत धर्माचे व धर्मगुरुंचे वर्चस्व होते. त्यामुळे धर्मसुधारणेची चळवळ सुरू होऊन रोमन कॅथलिक धर्मतत्त्वांना विरोध व नवीन प्रोटेस्टंट विचारसरणी मान्य होऊ लागली. व्यापारवाद्यांनी धर्मगुरुंविरुद्ध बंड करून अनियंत्रित राज्यसत्ता, साम्राज्यवाद, लष्करीसामर्थ्यवाद, वसाहतवाद इत्यादींचा पुरस्कार केला व राजाची सत्ता मान्य केली.
  • ज्ञानाचे पुनरुज्जीवन : आधुनिक युगाच्या सुरुवातीच्या काळात साहित्य, कला, शिल्प, संगीतशास्त्र इत्यादी ज्ञानक्षेत्रांत बदल होऊन एकप्रकारे ज्ञानाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपारिक गोष्टी विसरून शास्त्रीय निष्कर्षाला महत्त्व देणे, राष्ट्रीय भावनांना चालना देणे, व्यापार व उद्योगांत असलेले निर्बंध कमी करणे, शास्त्रीय साधनांची निर्मिती व वाढ करणे, स्वातंत्र्य व मानवतावाद ही विचारसरणी वाढविणे इत्यादींमुळे व्यापारवादी विचारसरणीचा उदय झाला.
  • पैशाचे महत्त्व : विनिमयाचे वाढत्या प्रमाणामुळे पैशाला महत्त्व प्राप्त होऊन सोने, चांदी, हीरे इत्यादी मौल्यवान धातू यांचाही चलन म्हणून वापर होऊ लागला. याच्या वापरामुळे व्यापारवृद्धी होऊन ती फायदेशीर ठरली आणि पैसा म्हणजेच संपत्ती अशी समाजात विचारधारणा निर्माण झाली.
  • राजकीय परिवर्तन : या काळामध्ये व्यापारवाढीकरिता वसाहतवाद व साम्राज्यवाद यांची आवश्यकता असून लष्करी सामर्थ्य वाढविणे हे महत्त्वाचे मानण्यात आले. त्यामुळे सार्वभौम राष्ट्र, बलशाली राष्ट्र इत्यादी कल्पना समोर येऊन सरंजामशाहीचा ऱ्हास झाला आणि प्रबळ राष्ट्र राज्ये उदयास आली. आर्थिक संपत्तीचा विचार महत्त्वाचा ठरला आणि व्यापारवाढीतून आर्थिक संपन्नता आली व व्यापारवादी विचारसरणीला प्राधान्य मिळाले इत्यादी.
  • व्यापारवाद व सरकार : आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या संस्थांना उत्तेजन देणे हे सरकारचे महत्त्वाचे कर्तव्य आहे, असे व्यापारवाद्यांनी म्हटले आहे. निर्यात मालावर सरकारने शक्यतो कर लादू नयेत किंवा लादायचे झाल्यास त्यांचे प्रमाण अत्यल्प असावे, अशी व्यापारवाद्यांची भूमिका होती. वस्तुंची करमुक्त निर्यात करून ती परदेशात स्वस्त किंमतीला विकली गेल्यास तेथे विक्रीवृद्धी होईल, असा त्यांचा दृष्टिकोन होता.
  • व्यापारवाद व वसाहतवाद : कच्च्या मालाच्या खात्रीशीर पुरवठ्यासाठी व्यापारवाद्यांनी जसा वसाहतींचा पुरस्कार केला, तसा त्यांना तयार मालास हुकमी बाजारपेठ म्हणूनही वसाहती उपयुक्त वाटत होत्या. म्हणजेच सरकारने साम्राज्यविस्ताराचे धोरण स्वीकारावे, असे व्यापारवाद्यांचे मत होते. त्यामुळे अर्थशास्त्रज्ञ स्मॉलर यांनी व्यापारवाद हा राष्ट्र निर्मितीच्या आर्थिक बाजुने विचार करतो, असे मत व्यक्त केले.

व्यापारवादी विचारवंत राष्ट्राच्या सामर्थ्याचा व त्यासाठी सुबत्तेचा विचार करीत होते. हे सामर्थ्य संपन्नता मिळविण्याचा महत्त्वाचा मार्ग म्हणून मौल्यवान धातूंच्या संचयाला त्यांनी अग्रस्थान दिले. देशात मौल्यवान धातूंच्या खाणी नसतील, तर ते धातू मिळविण्याचा एकमात्र मार्ग म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार; मात्र ते या व्यापारामध्ये निर्यातीस अनुकूल, तर आयातीस अगदी सावध होते; कारण त्यातून व्यापार शेष अधिक राहून देशाकडे मौल्यवान धातूंची आयात होईल आणि देश संपन्न होईल, असा त्यांचा विश्वास होता. त्या दृष्टीने सरकारने निर्यात उत्तेजनाचे व आयात निर्बंधाचे धोरण स्वीकारावे, असे व्यापारवादी विचारवंतांचे प्रतिपादन होते.

व्यापारवादाची वैशिष्ट्ये : सोळा ते अठराव्या शतकात राजकीय नेते, व्यापारी, आणि नोकरशहा यांनी कामकाजाच्या नोंदीचा एक भाग म्हणून केलेले काम दस्तावेज स्वरूपात तयार केले. तेच दस्तावेज व्यापारवादी तत्त्वज्ञानाचा भाग ठरले. त्यानुसार व्यापारवादाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :

  • पैसा व मौलिक धातू हीच राष्ट्राची संपत्ती : विनिमयासाठी पैशाची/चलनाची निर्मिती करण्यासाठी सोने, चांदी, हीरे इत्यादी मौल्यवान धातू अधिकाधिक प्राप्त करणे ही व्यापारवाद्यांची भूमिका होती. सरंजामशाहीत स्थावर मालमत्तेला महत्त्व होते; मात्र सरंजामशाहीनंतर व्यापारी भांडवलशाही उदयास येऊन पैसाविनिमयपद्धत अस्तित्वात आली आणि पैशाला महत्त्व प्राप्त झाले.
  • परराष्ट्रीय व्यापार : व्यापारवाद्यांनी शेतीपेक्षा उद्योगांना आणि आयातीपेक्षा निर्यातीला प्राधान्य दिले. त्यांच्या मते, उद्योगधंदे शेती प्रमाणे निसर्गावर अवलंबून नसतात. उद्योगधंदे केव्हाही, कोठेही वाढविता येतात. त्यांपासून राष्ट्राला अधिक उत्पन्न मिळते.
  • अनियंत्रित राजसत्ता : राष्ट्रवादी विचारसरणीचा प्रसार होऊन राजाची लोककल्याणकारी प्रतिमा लोकप्रिय झाली; मात्र लोककल्याणासाठी पैसा महत्त्वाचा होता. त्यासाठी व्यापारवादी विचारवंतांनी अनियंत्रित राज्यसत्तेचा पुरस्कार केला. त्यामुळे उत्पादन वाढवून वस्तूच्या निर्यातीला वाव मिळून परकीय बाजारपेठा काबीज करता आल्या.
  • आर्थिक राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकता : सरंजामशाहीत अर्थव्यवस्थेबाबत एकवाक्यता नसल्याने व्यापार संघ, कारागीर संघ, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींनी स्वतंत्र आर्थिक धोरण आखले होते; मात्र व्यापारव्याद्यांनी राष्ट्रीय एकता व राष्ट्रीय हित यांवर भर देऊन व्यापक दृष्टिकोन स्वीकारला. व्यापारपेठा काबीज करणे, वसाहती व साम्राज्य स्थापन करणे, राष्ट्राचे लष्कर वाढविणे, शस्त्रे वाढविणे, मौल्यवान धातू वाढविणे यांवर त्यांनी भर दिला.
  • उद्योग व व्यापार नियंत्रण : व्यापारवाद्यांनी निर्यातीला प्राधान्य देऊन अनुकूल व्यापार शेष मिळविण्यासाठी योग्य औद्योगिक व व्यापारविषयक धोरण सांगितले. (१) देशातील उत्पन्न वाढवून वस्तुंच्या किमती कमी करणे, उद्योगांचे नियमन करणे. (२) सोने, चांदी, हिरे, मोती असे मौल्यवान धातुंची निर्यात करू नये. वस्तुंची पत वाढवावी. उत्पादनांना सवलती द्याव्यात. (३) देशातील उद्योग समृद्ध करण्यासाठी बाहेरील कारागिरांना व भांडवलदारांना देशात संधी द्यावी; मात्र देशातील कारागिरास विदेशात पाठवू नये. (४) कच्चा माल कमी किमतीत मिळावा, मजुरांचा पुरेसा पुरवठा व्हावा त्यासाठी लोकसंख्या वाढीला उत्तेजन द्यावे, आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या उद्योगसंस्थांना शासनातर्फे उत्तेजन मिळावे इत्यादी. (५) देशाचे सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी राजकीय दृष्ट्या राष्ट्र बलशाली असले पाहिजे; मात्र त्याहीपेक्षा आर्थिक दृष्ट्या देशाचे सामर्थ्य वाढले पाहिजे.

व्यापारवादी विचारसरणीमध्ये व्यावसायिक उत्पादकता, मूल्य विवेचन आणि विभाजनामध्ये कर, वेतन, व्याज, खंड, लोकसंख्या यांबाबतही आपले आर्थिक विचार स्पष्ट केले होते. व्यापारवादी विचारसरणीमध्ये राष्ट्रहित दिसत असला, तरी पैशाला व मौल्यवान धातुंना संपत्ती मानणे, केवळ निर्यातीवर भर देऊन आयात बंद ठेवणे, परराष्ट्र व्यापाराला अवास्तव महत्त्व देणे, स्वराष्ट्राचा विचार करताना इतर राष्ट्रांचा विचार न करणे, उद्योगांना अवास्तव महत्त्व देऊन शेतीकडे दुर्लक्ष करणे, अनियंत्रित राजेशाहीचा पुरस्कार करणे, केवळ साधनसंपत्तीच्या संचयाला जास्त महत्त्व दिल्यास कालांतराने व्यापारतोलामुळे तो संचय त्वरीत रिक्त होईल, संपत्तीबाबत वैचारिक गोंधळ इत्यादीमुळे व्यापारवादी धोरणाचा प्रभाव कालांतराने कमी होताना दिसून आला. असे जरी असले, तरी व्यापारवाद हा सुनियोजित, सुसंघटित व जाणिवपूर्वक विकसित केलेला गट नव्हता. त्यामुळे तत्कालीन आर्थिक परिस्थिती डोळ्यांसमोर ठेवून व्यवहारी दृष्टिकोनातून राष्ट्राचे हित समाजापुढे आणि इतर राष्ट्रांपुढे मांडण्याचा व्यापारवाद्यांनी प्रयत्न केले. तसेच राष्ट्र आर्थिक दृष्ट्या बलशाली करणे हा व्यापारवाद्यांचा महत्त्वपूर्ण हेतू होता.

संदर्भ :

  • कुलकर्णी, बी. डी.; ढमढेरे, एस. व्ही., आर्थिक विचार व विचारवंत, पुणे, २०१७.
  • खंदेवाले, श्री. वि.; नेरूरकर, अमरजा, अर्थशास्त्रीय मतप्रणालीचा इतिहास, औरंगाबाद, १९८४.

समीक्षक : श्रीराम जोशी