हँडके, पीटर : (६ डिसेंबर १९४२). नोबेल पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध ऑस्ट्रियन लेखक. कादंबरीकार, नाटककार, अनुवादक, कवी, निबंधकार,चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून जगभरात त्यांची ओळख आहे. त्यांची मातृभाषा जर्मन आहे. भाषिक कल्पकतेने परिघ आणि मानवी अनुभवाची विशिष्टता शोधून काढलेल्या प्रभावी कार्यासाठी त्यांना २०१९ मधील साहित्यातील नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. स्लोव्हेनिया या देशाच्या सीमेजवळ असणाऱ्या ऑस्ट्रियातील स्टारा व्हास येथे त्यांचा जन्म झाला. बँक लिपीकाचा मुलगा असलेल्या हँडके यांनी १९६१ते १९६५ या काळात ग्रात्स विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी काही काळ मन्यूस्क्रीप्ट या वाड्मयीन नियतकालिकात योगदान दिले.
पीटर हँडके यांचे साहित्य : नाटक : Publikumsbeschimpfung ( इं.शी.ऑफेन्डिग द ऑडियन्स), Kaspar (१९६८), Das Mündel will Vormund sein (१९६९ इं.शी. द वॉर्ड वॉन्टस् टू बी ए गार्डियन), Der Ritt über den Bodensee (१९७१, इं.शी. द राइड अक्रॉस लेक कॉन्स्टन्स) ; कादंबरी : Die Angst des Tormanns beim Elfmeter (१९७०, इं.शी. द गोलीज एन्गझायटी एट पेनल्टी किक), Die linkshändige Frau (१९७६, इं.शी. द लेफ्ट हॅण्डेड वुमन),Langsame Heimkehr (१९७९, इं.शी.स्लो होमकमिंग), In einer dunklen Nacht ging ich aus meinem stillen Haus (१९९७, इं.शी. ऑन ए डार्क नाईट आय लेफ्ट माय सायलेंट हाऊस), Crossing the Sierra de Gredos (२००२), Der grosse Fall (२०११, इं.शी.द ग्रेट फॉल), Die Obstdiebin; oder, einfache Fahrt ins Landesinnere (२०१७, इं.शी. द फ्रुट थिफ; ऑर,द सिम्पल ट्रीप इन टू द इंटेरीयर) याशिवाय Wunschloses Unglück (१९७२; इं.शी. विशलेस अनलक ; इं.भा. अ सॉरो बियॉण्ड ड्रीम्स्) ही त्याची गाजलेली कलाकृती आहे.
१९६६ मध्ये रसिकांसमोर आलेल्या त्यांच्या ऑफेन्डिग द ऑडियन्स या पहिल्या महत्त्वपूर्ण नाटकाने ते एक विवादास्पद नाटककार म्हणून लोकांसमोर आले. त्यानंतरच्या काळातील पारंपरिक कथानक, संवाद आणि वैशिष्ट्यपूर्ण पात्रचित्रण असलेल्या नाटकांमध्ये कास्पार हे त्यांचे पहिले दीर्घ नाटक महत्वपूर्ण ठरले. हँडके यांच्या कादंबर्या या मानवी मनाच्या भिन्न स्थितीत असलेल्या जाणिवा व्यक्त करणाऱ्या आहेत. द गोलीज एन्गझायटी एट पेनल्टी किक ही त्यांची प्रख्यात कादंबरी एका माजी फुटबॉल खेळाडूविषयी कल्पनारम्य असा थरारक व्यक्त करणारी कादंबरी आहे. द लेफ्ट हॅण्डेड वुमन या कादंबरीत पतीपासून विभक्त झाल्यानंतर निरागस परिस्थितीला तोंड देणाऱ्या स्रीचे विवेकी वर्णन आहे. स्लो होमकमिंग ही तीन भागांची कथा आहे, जी पितृत्वावर आधारित आहे. ऑन ए डार्क नाईट आय लेफ्ट माय सायलेंट हाऊस यातून जीवनाचे अनुसरण करीत व्यथा – वेदनेतून माणसाचा प्रवास कसा बदलत गेला याचे चित्रण आले आहे तर Crossing the Sierra de Gredos (२००२) मध्ये इबेरियन पर्वतरांगा ओलांडणार्या महिलांच्या तीर्थयात्रा आणि त्यांच्या संघर्षमय जीवनाचा तपशील आहे. पीटर हँडके यांनी आपल्या आईच्या आत्महत्येने दुःखी होऊन ‘द सॉरो बियॉड ड्रीम्स’ हे महत्त्वाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाला जगभरात प्रसिद्धी मिळाली.
महायुद्धोत्तर काळातील जर्मन साहित्यातील कथनशैलीवर हँडके यांचे प्रभुत्त्व होते. त्यामुळेच त्यांच्या कलाकृतीतील कल्पनेपेक्षा त्यांच्या कल्पना मांडणीत नाविन्य आणि आवाहकता होती. या काळात जर्मन गद्यशैलीत हतबलता, निराशा, एकाकीपण या अस्तित्त्ववादी तत्त्वांची मांडणी झाली आहे. हा आशय पीटरच्या साहित्यातून समर्थपणे व्यक्त होतो. सहज सोप्या भाषेत भोवतालचे समकालीन वास्तव मांडणे आणि त्याच्या सोबतच्या तर्कसंगत व्यवस्थेचा मानवावर विवादास्पद आणि प्राणघातक प्रभाव कसा पडतो याचा शोध हेच त्यांच्या लेखनाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. हँडके यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही योगदान दिले. जागतिक साहित्यविश्वात जर्मन नाझीवाद हा निषेधाचा विषय आहे. पीटरच्या लेखनातून खुपदा तत्कालीन नाझीवादी तत्वांचे कळत नकळत उदात्तीकरण झाल्याची ओरड युरोपातील समीक्षाव्यवहारात केली जाते. त्यांच्या द गोएलीज अँक्झायटी ऍट द पेनल्टी किक व स्लो होमकमिंग या साहित्यकृती विशेष गाजल्या आहेत. २००६ मध्ये त्यांच्याच राजकारणामुळे हँडके यांची साहित्यिक ख्याती काहीशी झाकोळली गेली. युद्ध गुन्हेगाराचा ठपका असलेले युगोस्लाव्हियाचे माजी अध्यक्ष स्लोबोदान मिलोसेव्हिक यांच्या अंत्यसंस्काराला हँडके उपस्थित राहिल्याने व तेथे त्यांनी केलेल्या भाषणाने त्यांच्यावर टीका झाली होती. हँडके यांची युगोस्लाव्ह युद्धाविषयीची मतेही वादग्रस्त आहेत. स्रेबेनिया येथील मुस्लिम हत्याकांडासाठी स्वतः मुस्लिम समुदायच जबाबदार आहेत असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. त्यावर मोठाच वाद उफाळून आला होता.
अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लेखन केले. शिवाय काही चित्रपट आणि टीव्हीवरील कार्यक्रमासाठी आपल्याच काही पुस्तकांची रूपांतरे पटकथांमध्ये केली. याव्यतिरिक्त त्यांनीच पटकथा लिहिलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शनही हँडके यांनी केले. त्यांच्या जीवनावरील ‘पीटर हँडके’ हा माहितीपट २०१६ मध्ये प्रसिद्ध झाला होता. हँडके यांना मिळालेल्या पुरस्कारांमध्ये ओबी पुरस्कार – सर्वश्रेष्ठ विदेशी नाटक (१९७३), फ्रांट्स काफ्का पुरस्कार (२००९), ऑस्ट्रियाचा नेस्त्रोय रंगमंच जीवनगौरव पुरस्कार (२०१८) हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत. त्यांनी लिहिलेल्या एका चित्रपटाच्या पटकथेला कान फेस्टिवलमध्ये (१९८०) गोल्ड अवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Peter-Handke
- https://www.nobelprize.org/prizes/literature/2019/handke