श्टिफ्टर, आडालबेर्ट : (२३ ऑक्टोबर १८०५ – २८ जानेवारी १८६८). जर्मन – ऑस्ट्रियन कथा-कादंबरीकार आणि चित्रकार. शब्दामध्ये निसर्गाचे मुलभूत आणि अभिजात रूप शब्दबद्ध करण्यात तो प्रसिद्ध होता. त्याचे लेखन हे जर्मन भाषिकांमध्ये विशेष लोकप्रिय झाले. त्याचा जन्म ऑस्ट्रियातील ओबरप्लॅन येथे एका श्रीमंत विणकर कुटुंबात झाला. व्हिएन्ना येथे कायद्याचे शिक्षण त्याने पदवी न घेताच अर्धवट सोडले. त्यानंतर शिक्षक, चित्रकार म्हणून त्याने काम केले. काही काळ तो व्हिएन्ना येथील राजपरिवारातील मुलांना शिकविले. चित्रे विकून व्यवसाय केला. पुढे लिंझ येथील शाळा-तपासनीसाची नोकरी त्याला अनेक प्रकारच्या आजारांमुळे सोडावी लागली (१८६५).
तो विचाराने उदारमतवादी होता. १८४८ मध्ये झालेल्या क्रांतीला त्याने समर्थन दिले. त्याचे कथालेखन १८४० पासून प्रसिद्घ होऊ लागले. ह्या कथांत वाइल्ड फ्लॉवर्स (१८४१, इं. शी.) आणि माय गेट गँडफादर्स पोर्टफोलिओ (१८४१-४२, इं. शी.) ह्यांसारख्या कथांचा समावेश होतो. बिजिटा (१८४४) ह्या कथेपासून त्याला स्वतःचा नेमका घाट गवसला. आपण ज्या प्रदेशात राहतो, तो प्रदेश आणि तेथील लोक हेच आपल्या साहित्यकृतीचा आशय आणि घाट ठरवितात कारण त्यांच्यांत एक आंतरिक एकात्मता असते, ह्याची त्याला जाणीव झाली. ही जाणीव त्याच्या साहित्यातून उत्कटपणे प्रत्ययाला येते. श्टिफ्टरच्या साहित्यामध्ये एक सौंदर्यशोध दिसतो. त्याच्या कलाकृतीतील पात्रे ही जगण्याच्या नैतिकभावाचे प्रकटन करतात. त्यांचे विलासी आणि भव्य जीवन रेखाटताना त्याने मांगल्यचं शब्दांकित केले आहे. वाईट, क्रौर्य आणि दु:ख हे त्याच्या लिखाणात क्वचितच दिसते, परंतु समीक्षकांच्या मते त्याच्या साहित्यातील निसर्गावर्णनाच्या शांत, अंतर्निहित अचूकतेच्या मागे अतिरेक आणि आपत्तीची पूर्वदृष्टी आहे. जागतिक धर्म आणि जर्मन मानवतावाद या दोन संकल्पनांचे अधोरेखन त्याने त्याच्या साहित्यातून केले आहे.
स्टुडिएन (६ खंड, १८४४- ५०, इं. शी. स्टडीज), बुंटश्टाइन (१८५३, इं. शी. स्टोन्स ऑफ मेनी कलर्स) ह्या त्याच्या कथासंगहांना मोठी लोकप्रियता प्राप्त झाली. डेअर नारव्झोमर (१८५७, इं. शी. द इंडियन समर) ही त्याची कादंबरी जर्मन साहित्यातील एक अभिजात साहित्यकृती मानली जाते. दोन प्रेमी जीवांच्या जीवनात विलंबाने आलेल्या सुखाची ही कहाणी आहे. विटिको (१८६५-६७) ह्या त्याच्या कादंबरीत एका न्याय्य आणि शांततामय व्यवस्थेच्या स्थापनेसाठी माणूस करीत असलेल्या संघर्षाचे चित्रण आहे.
आजारपणाला कंटाळून त्याने लिंझ येथे आत्महत्या केली.
संदर्भ :
- Swales, Martin, Adalbert Stifter: A Critical Study, Cambridge University Press, 1984.