एरिना : प्राचीन ग्रीक कवयित्री आणि संगीतकार. ग्रीकमधील रोड्झजवळच्या टीलॉस बेटावर ती राहत असे. युसीबिअस या ग्रीक साहित्य अभ्यासकाच्या मताप्रमाणे ती इ. स. पू. चौथ्या शतकाच्या मध्यात होऊन गेली असावी. तिचा जन्म रोड्स किंवा टीलॉसच्या आसपास झाला असावा असे अभ्यासकांचे मत आहे. एरिनाच्या नावात काही ठिकाणी वेगळेपण आढळून येते. लेस्बिया या नावाने देखील ती ओळखली जाते ; कारण ती लेस्बॉस बेटावरून आली होती असाही विचारप्रवाह आहे. एरिनाने तिची मैत्रीण सप्पो हिने स्थापित केलेल्या मायटाईलिनमधील कला विद्यालयात शिक्षण घेतले. असे म्हटले जाते की ती तेथील सर्वात हुशार विद्यार्थिनी होती. विशेषत: कवितेच्या माध्यमातून येथे तिची प्रतिभा समोर आली होती. बॉसिस ही एरिनाची जिवलग मैत्रीण होती. बॉसिस तिच्या लग्नाच्या नंतर लगेच मरण पावली. या तिच्या मैत्रिणीच्या विरहपर तिने हेक्झॅमीटर या वृत्तामधील ३०० कडव्यांची दि डिस्टॅफ किंवा द स्पिन्डल शीर्षक असलेली विलापिका (दीर्घकाव्य) लिहिली. ही विलापिका ग्रीकमधील स्थानिक डोरियन या बोलीभाषेत लिहलेली आहे. आयोनियन आणि डोरियन ह्या ग्रीकमधील तत्कालीन साहित्य अभिव्यक्तीच्या लोकप्रिय बोलीभाषा आहेत. अनेक महाकाव्य लेखनात या भाषांचा आणि डॅक्टिलिक हेक्झॅमीटर या वृत्ताचा वापर केला गेला आहे.
एरिना वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच मृत्यू पावली आणि त्याच काळात तिच्या कविता आणि रचनांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले गेले.
संदर्भ :