जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर डवान्सड सायंटिफिक रिसर्च : ( स्थापना – १९८९ )

जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्सड सायंटिफिक रीसर्च (JNCASR) या संस्थेची स्थापना १९८९ साली पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने करण्यात आली. भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्यावतीने ही संस्था सुरू करण्यात आली. या संस्थेस अभिमत विद्यापीठाचा (Deemed University) दर्जा मिळालेला आहे. उत्तर बेंगलोरमधील जक्कुर या गावातील सुंदर भव्य परिसरात ही संस्था वसली आहे. या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट विज्ञानाच्या विविध विषयातील नवनवीन जागतिक संशोधनांचा प्रसार व पाठपुरावा करणे हे आहे. उच्च दर्जाच्या संशोधनासाठी आवश्यक असे अनेक विषयांचे विभाग संस्थेत आहेत. पन्नास संशोधक या संस्थेतील विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. एका वेळी येथील अनेकविध प्रयोगशाळेतून तीनशे विद्यार्थी संशोधन करीत असतात. सध्या भौतिकीविज्ञानापासून ते अत्याधुनिक जनुकीय संशोधनापर्यंत अनेकविध विषय येथील संशोधनात अंतर्भूत  आहेत.

संस्थेतील नऊ प्रमुख विभागामध्ये रसायनशास्त्र, पदार्थ भौतिकी, शिक्षण तंत्रज्ञान, यंत्रअभियांत्रिकी, उत्क्रांती व  एकात्मिक  जैवतंत्रज्ञान, भूशास्त्र तंत्रज्ञान, आण्विक जीवविज्ञान, अनुवंशशास्त्र, नवरसायनशास्त्र, चेतासंस्था विज्ञान व सैद्धांतिक विज्ञान यांमधील संशोधन करण्यात येते.

येथे प्रामुख्याने एम. एससी. व पीएच्.डी. या दोन अभ्यासक्रमांसाठी  विद्यार्थी निवडले जातात. आजपर्यंत या संस्थेत दोनशे पीएच्.डी., ९० एम.एस. आणि ६० एम.एस्सी. विद्यार्थी शिकून बाहेर पडलेले आहेत. ते विविध जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांमधून कार्यरत आहेत.

येथील प्राध्यापकांचे संशोधन निबंध अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रंथातून प्रसिद्ध झाले असून त्यांना अनेक पारितोषिकेही मिळाली आहेत.

रसायनशास्त्र व पदार्थ भौतिकी विभागांतर्गत (केमिस्ट्री अँड फिजिक्स ऑफ मटेरियल्स युनिट) अत्याधुनिक नवनवीन पदार्थांची निर्मिती, त्यांचे गुणधर्म व त्यांची उपयोजितायासाठी विविध प्रकल्प व प्रयोग केले जातात. त्यांची निरीक्षणे व अनुमान यासाठी संगणकीय प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अब्जांश तंत्रज्ञान (नॅनोटेक्नॉलॉजी ), चुंबकविरोधी ऑक्साईड्स, सूक्ष्म पटलं, वायू संवेदक (गॅस सेन्सर), मेसो पोरस मटेरियल्स (Mesoporous material- ज्यामध्ये 2 एनएम किंवा त्याहून कमी आकाराची छिद्रे आहेत असे फिल्टर बनवण्याचे तंत्रज्ञान), विद्युत वाहक बहुवारिके (पॉलिमर), सेंद्रिय विद्युतवाहक पदार्थ, जैव प्रकाशीय पदार्थ अशा नवनवीन पदार्थांचे भौतिक, रासायनिक, विद्युतचुंबकीय, प्रकाशीय गुणधर्म अभ्यासून त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करता येईल याचे संशोधन या विभागात होते.

यासाठी आवश्यक जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा येथे आहेत. तरंगत्या स्तरांची भट्टी, आण्विक बल यंत्र, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी, प्रचंड दाब निर्माण करणारे यंत्र, क्ष-किरण, अवरक्त किरण यांच्या पंक्तीमापी अशी अत्याधुनिक उपकरणे या प्रयोगशाळेत आहेत.

यंत्र अभियांत्रिकी (इंजिनीरिंग मेकॅनिक्स) विभागात वेगवेगळ्या वेगाने व दाबाने वाऱ्याचा झोत बोगद्यातून सोडण्याची व्यवस्था आहे. याचा उपयोग करून कीटक हवेच्या प्रवाहात उडतात कसे ? विमान व त्यांच्या उडण्यात काय फरक आहे ? हवेचा झोत प्रथम संथ (लॅमिनार) व नंतर हळूहळू अवखळ (टर्ब्युलॅन्ट) केल्यास त्यांच्या उडण्यावर काय परिणाम होतो यांचा अभ्यास येथे केला जातो.

रासायनिक द्रव्य, जैविक द्रव (रक्त, प्लास्मा ), पाणी यांचे प्रवाह सूक्ष्म (मायक्रो ) व अब्जांश झाल्यास पदार्थावर त्याचा काय परिणाम होतो, वाळवंटातील वाळूचा प्रवाह, हवेतील भोवरे, वातावरण व अवकाशातील हवेचा प्रवाह यांचा तापमान बदल व पर्जन्यमान यांच्यावर काय परिणाम होतात यांचे संशोधन या विभागात होते.

उत्क्रांतिवादी व एकात्मिक जैव विज्ञान विभाग (इव्होल्युशनरी अँड इंटेग्रेटीव्ह बायोलॉजी युनिट) यात प्राण्यांना दिवस व काळाचे भान कसे असते (Biological clock) मेंदूतील चेतापेशींच्या परस्पर प्रक्रियेचा प्राण्यांच्या दिनक्रमावर काय परिणाम, विशिष्ट मृत्युदर असल्यावर काही प्राण्यांच्या जीवनमानाचे स्थिरीकरण किंवा अस्थिरीकरण, भक्ष्याच्या उपलब्धतेनुसार प्राण्यांच्या अनुवांशिक हालचाली व त्यांची समूह मानसिकता यातील बदल, अनुवंशिकता आणि पर्यावरणशास्त्र यांच्या परस्पर प्रक्रियांमुळे उत्क्रांतीमध्ये झालेला बदल अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रयोग, प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलेली निरीक्षणे यांचे संगणकीय विश्लेषण करून संशोधन केले जाते. संख्यात्मक अनुवंशिकता, प्राण्यांच्या वर्तनाचे नमुने (पॅटर्न), उलट जनुकशास्त्र (रिव्हर्स जिनोमिक्स), जैव शरीरचनाशास्त्र या सर्वांचा अंतर्भाव यात असतो.

मुंग्या, फळमाशी, तसेच सस्तन प्राण्यामध्ये उंदीर व हत्ती यांच्यावरही प्रयोग केले जातात.

संवेदनावहन प्रक्रियेला नियंत्रित (लोकोमोटिव्ह मॉनिटरिंग सिस्टिम) करेल अशी अतिप्रगत आणि जगातील सर्वात मोठी यंत्रणा या विभागात आहे.

रेण्वीय जीवशास्त्र व अनुवांशिकता/जनुकशास्त्र विभाग (मोलेक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक्स युनिट) या विभागात प्रामुख्याने जैववैद्यकीय उपयोजितेच्या दृष्टीने संशोधन केले जाते. सध्या संसर्गजन्य रोगावर उपचार शोधण्यासाठी शरीररचनाशास्त्र, गुणसूत्र रचना, जनुकशास्त्र यांच्या दृष्टिकोनातून संशोधन केले जात आहे.

नवरसायनशास्त्र विभाग (न्यू केमिस्ट्री युनिट) याला या विभागातील संशोधनाची जोड मिळते. या विभागात जैविक रसायने, त्यांच्यातील परस्पर प्रक्रिया व त्यांचा विविध भौतिक व जैविक पदार्थांवर होणारे परिणाम यांचा अभ्यास केला जातो.

चेतासंस्था विज्ञान विभागात (न्यूरोसायन्सेस युनिट) सारभूत विचार  क्षमता, बौद्धिक क्षमता अथवा बौद्धिक अपंगत्व यानुसार प्राण्यांच्या वर्तनातील बदल आणि हे सारे चेतासंस्थेच्या अनुवांशिकतेच्या रचनेनुसार कसे नियंत्रित होते यावर या विभागात संशोधन चालते. विविध इंद्रियांमधील संवेदनांची देवाण-घेवाण, मज्जासंस्थेचे कार्य यांच्यावर मेंदूतील पेशी रचना, तसेच विविध जीवरसायनांचे परिणाम या सर्वांचा, प्राणी व मानव यांच्या दृष्टीने संशोधन होते.

सैद्धांतिक विज्ञान विभागात (थिअरॉटिकल सायन्सेस युनिट) सांख्यिकी गतिशास्त्र, अतिघन पदार्थ भौतिकी आणि पदार्थ विज्ञान (भौतिकशास्त्र) हे प्रमुख विषय या अंतर्गत येतात. आधुनिक संशोधनाला अनुसरून पदार्थांचे पृष्ठभाग, त्यांच्या अवस्था बदलातील आण्विक रचना संक्रमण, सौम्य चुंबकीय अर्धवाहक, अब्जांश पुंजके, अब्जांश तार, अतिशीत द्रावण, जैव-आण्विक पदार्थ त्यांच्यातील इलेक्ट्रॉन, प्रोटॉन कणांची देवाण-घेवाण या व अशा अनेकविध विषयांवरील संशोधन या विभागात चालते.

संदर्भ :

  • jncasr.ac.in 

 समीक्षक : मोहन मद्वाण्णा