सजीवांनी (वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इत्यादी) आपल्या विविध शारीरिक भागात निर्मिलेल्या नायट्रोजनयुक्त (Nitrogen containing) पदार्थांना अल्कलॉइडे असे संबोधिले जाते. याची सर्वसमावेशक व्याख्या केलेली नाही. ह्या पदार्थातील नायट्रोजन हा अतिसौम्य अल्कधर्मी असावा आणि वलयी सांगाड्याचा भाग असावा (Heterocyclic) असे काही संकेतमात्र आहेत. सजीवांत अस्तित्वात असलेल्या डीएनए, आरएनए, प्रथिने तसेच ॲमिनो अम्लातसुद्धा नायट्रोजन अणू असतो परंतु ह्या सर्वांचा समावेश अल्कलॉइडांमध्ये केला जात नाही. उलट प्रथिने किंवा ॲमिनो अम्ले ह्यांच्यापासून अल्कलॉइडांसारखी इतर द्रव्ये तयार होतात. प्रथिने आणि ॲमिनो अम्ले हे ‘साहित्य’ आणि त्यापासून बनलेली अल्कलॉइडे हे ‘अंतिम उत्पादन’ असे त्यांचे नाते आहे .
आजपर्यंत साधारणतः १६,००० अल्कलॉइडांची त्यांच्या रासायनिक रचनेनुसार सूची केली गेली आहे. यांपैकी बहुतेक अल्कलॉइडे सुमारे ४,००० वेगवेगळ्या वनस्पतीमधून विलग करून त्यांची रासायनिक रचना सिद्ध केली गेली आहे. साधारणतः ३० कुलातील (Families) वनस्पतींमध्ये अल्कलॉइडे विशेषत्वाने आढळतात.
अल्कलॉइडांचे वर्गीकरण त्यांच्या रासायनिक सांगाड्यातील मूळ घटकांप्रमाणे करण्याची पद्धत प्रचलित आहे. परंतु गेल्या ५० वर्षांत अनेक नवनवीन रासायनिक सांगाडे उपलब्ध झाल्याने हे वर्गीकरण फारच ढोबळ झाले आहे. सर्वसाधारणपणे मूळ अल्कलॉइडे, भ्रामक अल्कलॉइडे, प्रयोगशालानिर्मित अल्कलॉइडे आणि अल्कलॉइड-समान गुणधर्म असलेले पदार्थ असे वर्गीकरण जास्त योग्य आहे.
गुणधर्म : बहुतेक अल्कलॉइडे पाण्यात विरघळत नाहीत परंतु अल्कोहॉलामध्ये तसेच अनेक सेंद्रिय विद्रावकामध्ये (Organic solvents) विरघळतात. बहुतेक सर्व अल्कलॉइडे ही सौम्य अल्कधर्मी असल्याने अम्लाबरोबर संयोग करून त्यांचे क्षार बनवता येतात. हे क्षार पाण्यात विरघळत असल्याने औषधनिर्मितीत त्यांचा उपयोग करून घेता येतो. काही अपवाद वगळता सर्व अल्कलॉइडे ही घन आणि स्फटिक स्वरूपात मिळतात. अनेक अल्कलॉइडांना वास नसतो तर अनेकांची चव अतिशय कडू असते.
अल्कलॉइडे सजीवांपासून विलग करण्याच्या पद्धती : पूर्वापार चालत आलेली विद्रावक निष्कर्षण (Solvent extraction) हीच पद्धत अजूनही अल्कलॉइडे सजीवांपासून विलग करण्यासाठी वापरात आहे. एकेकाळी रासायनिक निष्कर्षणाने (Chemical extraction) अल्कलॉइडे विभक्त केली जात असत परंतु ती पद्धत आता विशेष वापरात नाही. वनस्पतीचे विविध भाग प्रथम सुकवून ते विविध विद्रावकांत भिजवून ठेवले जातात . त्यानंतर द्राव आणि चोथा वेगळे करून द्रावातील विद्रावक (Solvent ) वेगळे केले जाते. उरलेल्या भागाचे विविध मार्गांनी विलगीकरण करून अल्कलॉइडे आणि इतर द्रव्ये शुद्ध स्वरूपात प्राप्त केली जातात. अल्कलॉइडांचे रासायनिक सूत्र आणि संरचना (Chemical formula and structure) शोधण्यासाठी पूर्वी अशी अल्कलॉइडे खूपच मोठ्या प्रमाणात विलग करावी लागत. अलीकडे मात्र उच्च दाब द्रव वर्णलेखन / संपीडित द्रव वर्णलेखन (High Pressure Liquid Chromatography=HPLC ) तसेच वायुवर्णलेखन ( Gas Chromatography=GC) आणि वायुवर्णलेखनासह द्रव्यमान वर्णपटलेखन (Gas chromatography with Mass Spectrocopy=GCMS ) अशा साधनांमुळे अगदी सूक्ष्म प्रमाणात उपलब्ध झालेल्या अल्कलॉइडांचाही संपूर्ण अभ्यास शक्य झाला आहे .
उपयुक्तता : अल्कलॉइडांची उपयुक्तता गेल्या काही वर्षात मूलतः बदलली गेली आहे. एकेकाळी विषारी म्हणून गणली गेलेली अल्कलॉइडे आता औषध म्हणून उपयुक्त ठरली आहेत. अनेक रोगांवर अल्कलॉइडे प्रभावी आणि गुणकारी ठरत आहेत. अजूनही बाणांना लावण्याचे विष म्हणून अनेक अल्कलॉइडांचा उपयोग जगाच्या विविध भागातील आदिवासी आणि वनवासी करीत आले आहेत . मानवाच्या दैनंदिन आहारातील टोमॅटो, बटाटा, वांगी , ढोबळी मिरची , कढिलिंब अशा अनेक वनस्पतिजन्य पदार्थांत अनेक अल्कलॉइडे असतात. त्यांचा शरीरावर आणि आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो हे ज्ञात नाही . परंतु पिढ्यानपिढ्या असा वापर होत असल्याने त्यांचे अनिष्ट परिणाम होत नसावेत असे मानावे लागेल .
रासायनिक सूत्रे किंवा नावांपेक्षा साधी सुटसुटीत नावे अल्कलॉइडांना देण्याची प्रथा वनस्पतींपासून प्रथमतः विलग केलेल्या मॉर्फीन ह्या द्रव्यापासून आजतागायत पाळली जात आहे. ज्या वनस्पती किंवा प्राण्यांपासून अल्कलॉइडाची व्युत्पत्ती झाली त्या सजीवाच्या वैज्ञानिक नावातील काही भागाचा उपयोग करून ही नावे ठेवली जावीत अशी प्रथा आहे. उदा., सर्पगंधा ह्या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव राऊवोल्फिया सर्पेंटिना ( Raulfia serpentine ) असे आहे. त्यातून विलग केलेल्या अल्कलॉइडाचे नावे रेसर्पिन असे ठेवले गेले. कढिलिंबाचे वैज्ञानिक नाव मुराया कोनिजी ( Murraya koenigii ) आहे. त्यातील विविध अल्कलॉइडांना कोईनिंबीन, कोईनिडीन, कोईनिगीन अशी नावे दिली गेली. याचबरोबर कधीकधी वनस्पतीच्या व्यवहारातील नावावरूनही अल्कलॉइडांना नाव दिले गेले. कढिलिंबापासून विलग केलेले अल्कलॉइड महानिंबीन नावाने प्रसिद्ध आहे .ज्या वैज्ञानिकाने एखादे अल्कलॉइड शोधले त्याचे स्वतःचे नावही काहीवेळा अल्कलॉइडांना दिले गेले. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वैज्ञानिक अजमल उझ्झमान सिद्दीकी ह्यांच्या नावाने अजमलिन हे अल्कलॉइड परिचित आहे. देशप्रेमाने किंवा स्थानिक प्रेमानुसारसुद्धा अल्कलॉइडांना नावे दिली गेली आहेत. पाकिस्तानीन, भारतअमीन किंवा कराचीनीन ही नावे त्याची द्योतक आहेत. इंग्लिश भाषेत ही नावे लिहिताना त्यांच्या शेवटी -ne लिहिण्याची पद्धत आहे.
काही महत्त्वाची अल्कलॉइडे : (अ) अगदी साधे रासायनिक सूत्र असलेली अल्कलॉइडे : वर दिलेल्या परिभाषेनुसार यांचा समावेश पूर्ण अल्कलॉइड म्हणून करता येत नसला तरी काही वैज्ञानिक ही अल्कलॉइडे आहेत असे मानतात. प्राणी मृत झाल्यावर शरीरातील प्रथिनांचे पृथक्करण होऊन प्युट्रीसीन (आ. १) आणि कॅडॅव्हरीन (आ. २) ही अल्कलॉइडे तयार होतात. मृत शरीराला येणारा कुबट असह्य गंध या अल्कलॉइडामुळे येतो. शुक्राणूंपासून विलग केलेले स्पर्मिडीन (आ. ३) ह्याच मालिकेतील आहे .
(आ) सस्तन प्राण्यांत तयार होणारे ॲड्रिनॅलीन (आ. ४) हे हृदयक्रियेसाठी अतिशय महत्वाचे आहे .
(इ) औषधी म्हणून उपयुक्त असलेली अल्कलॉइडे : तंबाखूपासून विलग केलेले निकोटीन (आ. ५), अफूमधून विलग केलेले मॉर्फीन
(आ. ६), रक्तदाबावर गुणकारी असलेले सर्पगंधापासून विलग केलेले रेसर्पिन (आ. ७), डोळ्यातील बाहुली मोठी व्हावी म्हणून वापरात असलेले बेलाडोनापासून प्राप्त झालेले ॲट्रोपीन (आ. ८), सदाफुलीपासून अलग केलेले कर्करोगावर गुणकारी ठरलेले व्हिनक्रिस्टीन (आ. ९) आणि व्हिनब्लास्टीन (आ. १०), अनेक रोगांसाठी उपयुक्त परंतु जास्त मात्रामध्ये अतिशय विषारी असलेले तसेच बाणांना विष म्हणून लावण्यात येणारे कुचलीतील स्ट्रिक्नीन (आ. ११) , हिवतापावर (मलेरिया) रामबाण म्हणून प्रसिद्ध असलेले क्विनीन (आ. १२).
समीक्षक – बाळ फोंडके