गोंदवलेकर, श्री ब्रह्मचैतन्य महाराज : (१९ फेब्रुवारी १८४५ — २२ डिसेंबर १९१३). महाराष्ट्रातील एक संत-सत्पुरुष. त्यांचे पूर्ण नाव गणपत रावजी घुगरदवे. त्यांचे घराणे हे गोंदवले गावाचे कुलकर्णी घराणे असून सुस्थितीत होते.

चरित्र : त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील, माण तालुक्यातील गोंदवले या गावी झाला. रावजी व त्यांच्या पत्नी गीताबाई हे श्रीमहाराजांचे आई-वडील होत. लहानपणापासूनच श्रीरामपरायण श्रीमहाराजांना सद्गुरूची ओढ लागली व गुरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी वयाच्या नवव्या वर्षीच गृहत्याग केला, पण वडिलांनी समजूत काढून त्यांना घरी परत आणले आणि त्यांचा विवाह केला. काही वर्षे घरी राहून ते परत बाराव्या वर्षी गुरूशोधार्थ बाहेर पडले या प्रवासात त्यांनी श्रीमहाराज देव मामलेदार, अक्कलकोटनिवासी श्रीसद्गुरू स्वामी समर्थ, हुमणाबाद येथील माणिकप्रभू यांच्या भेटी घेतल्या. श्रीमहाराज अनेक योगी, संन्यासी यांना अबूपहाड, काशी, अयोध्या, नैमिष्यारण्य, बंगाल, हैदराबाद अशा अनेक ठिकाणी भेटत राहिले. ह्या काळात श्रीमहाराजांनी योगविद्या हस्तगत केली होती; परंतु मनाचे समाधान होण्यासाठी भक्तीची गरज आहे, हे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा ते श्रीसमर्थांच्या परंपरेतील रामकृष्णांच्या सांगण्यानुसार नाथपंथीय गुरूपरंपरेतील येहळेगाव येथील तुकामाईंकडे गेले. तुकामाई म्हणजे योग आणि भक्ती यांचा अपूर्व संगम होता. तुकामाईंनी त्यांचे ‘ब्रह्मचैतन्य’ असे सांप्रदायिक नाव ठेवले. ‘श्रीराम जयराम जयजयराम’ हा त्रयोदशाक्षरी (तेरा अक्षरांचा) मंत्र जपून रामोपासना करण्यास सांगितले आणि त्यांनी श्रीमहाराजांना रामदासी दीक्षा दिली व अनुग्रह देण्याचा आधिकार दिला. श्रीमहाराज हे दख्खनके महाराज, गणुबुवा अशा नावांनी ओळखले गेले; परंतु ते सही मात्र ब्रह्मचैतन्य रामदासी अशीच करीत. तुकामाईंच्या उपदेशामुळे श्रीमहाराजांच्या पारमार्थिक व व्यावहारिक जीवनाला विलक्षण दिशा मिळाली, गती मिळाली. आपल्या गुरूंच्या रामनामोपासनेची साधना त्यांनी अंत:कालापर्यंत केली आणि रामनामोपासना सुलभ परमेश्वरप्राप्तीचा उपाय म्हणून सर्वसामान्यांना उपदेश करण्यात आयुष्य वेचले.

श्रीमहाराजांनी दिक्षा घेतल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारला. स्वपितृगृही राहणाऱ्या सरस्वती पत्नीला घरी आणून पतीचे कर्तव्य निभावले. पहिली पत्नी अकाली निवर्तल्यावर त्यांनी धर्मशास्त्रानुसार दुसरा विवाह आटपाडी येथील देशपांडे यांच्या आंधळ्या मुलीबरोबर केला. प्रपंचात रमलेले पाहून आईला बरे वाटले. आंधळ्या बायकोची सर्वतोपरी व्यवस्था त्यांनी ठेवली; परंतु त्यांची दोन मुलगे व मुलगी ही अपत्ये बालपणीच वारली; परंतु त्यांच्या पारमार्थिक जीवनावर त्याचा परिणाम झाला नाही.

समाजकार्य : इ. स. १८७६ व १८९६ या सालांतील दुष्काळ दरम्यान गोंदवल्यातील व आसपासच्या खेड्यातील लोकांसाठी त्यांनी आपली धान्याची कोठारे खुली केली. मजुरांना स्वत:च्या शेतावर कामे लावून अन्न दिले. दुर्बलांना, गरिबांना, वृद्धांना मोफत अन्नदान केले. श्रीमहाराजांचे एखाद्या राजाला शोभेल असे दुष्काळातील कार्य पाहून औंधचा राजा सुद्धा आश्चर्यचकित झाला, त्याने त्यांचे दर्शन घेऊन धन्यवाद दिले. श्रीमहाराजांनी जनावरांवरही माया केली. म्हसवड गावात भरणाऱ्या बाजारात कसायांकडून गायी विकत घेऊन त्यांना जीवदान तर दिलेच पण त्यांच्यावर अपत्यवत प्रेम केले. त्यांच्यासाठी गोशाळा बांधली. भारतात परकियांच्या राजवटीत स्वदेशी चळवळी चालू असताना त्याला अनुकूल असा स्वदेशी साखर निर्मितीचा कारखाना त्यांनी काढला. मंदिरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. त्यांनी तीन वेळा भारतयात्रा केली. आपल्या संपूर्ण आयुष्यभर त्यांनी रामदासी संप्रदायाचा प्रसार-प्रचार केला. अनेक ठिकाणी त्यांनी शनिमंदिर, दत्तमंदिर व राममंदिर बांधली आणि बांधण्यास प्रोत्साहन दिले. मंदिरे बांधण्यामागचा उद्देश ही मंदिरे रामनामजपांचे अधिष्ठान व्हावीत, असा होता.

श्रीमहाराजांचा रामनामाचा उपदेश त्यांची प्रवचने, भक्तगणांना पाठवलेली उत्तरादाखलची पत्रे, त्यांनी केलेली कथानिरूपणे, दृष्टांत यांमधून रामनामाचा उपदेश आपल्याला समजतो. त्यांच्या पारमार्थिक विचारांना संताच्या शिकवणुकीची पार्श्वभूमी होती. श्रीमद्भगवद्गीता हा त्यांच्या प्रवचनांतील उपदेशाचा आधारभूत ग्रंथ होय. श्रीमहाराजांचे ब्रह्मचैतन्य हे नाव त्यांच्या नामसाधनांच्या सिद्धांताची अद्वैत बैठक सूचित करते, असे म्हणता येईल. अद्वैत वेदान्ताचे आद्य आचार्य गौडपादाचार्य यांनी अद्वैत वेदान्त हे सर्वसमावेशक असून ते कोणाशीच वाद करीत नाही, हा अद्वैत वेदान्ताचा विशेष सांगितला. तो विशेष श्रीमहाराजांनी आपल्या एका प्रवचनात घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहानलहान खोल्या येतात, त्याप्रमाणे वेदान्तात इतर शास्त्रे येतात, असा सामान्य मनुष्यालाही समजेल अशा सोप्या भाषेत सांगितला आहे. प्रपंचावस्थेत ब्रह्मस्वरूप ज्ञात होत नाही; परंत ब्रह्मतत्त्वाचा साक्षात्कार झाला असता जीवाला स्वत:प्रमाणेच प्रपंचही ब्रह्मस्वरूप दिसतो. हीच जीवनाची जीवन्मुक्तावस्था होय. ह्या सिद्धांतांचा उपदेश महाराजांनी सामान्य लोकांना केला.

तात्त्विक विचार : श्रीमहाराज अद्वैत वेदान्तवादी होते. त्यांनी अद्वैत वेदान्ताच्या तत्त्वज्ञानाचा अर्थपरिष्कार शास्त्रीय परिभाषेत न करता लोकांसाठी केलेल्या प्रवचनांमधून केला आणि अद्वैत वेदान्ताच्या तत्त्वांचा, सिद्धांताचा परिचय सामान्य लोकांना समजेल अशा व्यावहारिक भाषेत करून दिला. वेदान्तानुसार अहंभाव हा प्रपंचाचे आणि परमेश्वराच्या अज्ञानाचे कारण आहे, हे मुख्य सूत्र त्यांनी प्रवचनांमध्ये मांडले. मनुष्याने आपल्या जीवनात परमेश्वराचे स्मरण करून प्रपंच आनंदमय परमार्थस्वरूप करण्यास सांगितले. अनासक्ती, वासनारहित होऊन कर्माचे कर्तेपण परमेश्वराकडे द्यावे. परमात्मा सर्वव्यापी आहे. तो आनंदस्वरूप आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये हे स्वरूप जाणण्याची शक्ती आहे व परमात्मस्वरूप जाणणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे. देहाची दु:खे मीपणाच्या अज्ञानात आहेत. देहाचे दु:ख नाहीसे केले असता, मी म्हणजे आनंद सत्स्वरूप परमात्मास्वरूप आहे, हा साधनचतुष्ट्यसंपन्न (ब्रह्मप्राप्तीचे चार प्रधान उपाय) मनुष्याला बोध होतो हे वेदान्ताचे मर्म जाणण्याचा उपाय श्रीमहाराजांनी सांगितला. तो म्हणजे परमात्म्याचे अनुसंधान होय. जपाने हे अनुसंधान साध्य होते. म्हणून भगवंताचे नाम हे साधन आहे. ते देहाचा मीपणा नाहीसा करते.

श्रीमहाराजांनी गृहस्थाश्रम स्वीकारला त्यामुळे त्यांना आध्यात्मिक कार्य, विशेषत: नामोपदेश करणे सुलभ झाले. त्यांना समाजातील विविध प्रकारच्या लोकांना नामोपदेश करून परमार्थसमाधानाचा अनुभव द्यायचा होता. म्हणून त्यांनी सर्व स्तरांतील दीन-दुबळ्या लोकांना प्रवचनांनी समाधान दिले. त्यांना त्यांच्या दु:खातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला. इतकेच नव्हे, तर तो मार्ग आचरणात आणावा म्हणून त्यांनी त्या लोकांना अन्नदान, वस्त्रे, निवारा ह्यांची सोय केली.

श्रीमहाराजांनी वेदाच्या आधारे नाम साधनेचे वैदिकत्व विप्रसभेत पटवून दिले. त्यांना वेदपरंपरा व वैदिक कर्माविषयी नितांत आदर होता; तथापि त्यांच्या समोर असा मनुष्य समज होता की, ज्याला वेदविषयक अज्ञान होते. अशा मनुष्यांना वेदांनीच सांगितलेला नामसाधनेचा वैदिक कर्मांपेक्षा सुलभ मार्ग श्रीमहाराजांनी सांगितला. नाम म्हणजे वेद होत. ते ओंकार असून ते भगवंताचे साक्षात संनिध (जवळ/समीप) आहे. प्रत्येक वेदाच्या आरंभी ‘हरि: ओंम्’ असते. ते नामच आहे. जसा वेद अनादी तसे नाम अनादी, जसा वेद अनंत तसे नाम अनंत आहे.

श्रीमहाराजांनी भगवंताचे नाम कर्माइतकेच वैदिक आहे हे विप्रसभेत सांगितले त्या नामाचे भगवत्स्वरूप, नामाचे विलक्षण माहात्म्य वेदान्तशास्त्रात निष्णात असलेल्या तुकारामबुवा वलव्हणकर ह्या विद्वानाबरोबर झालेल्या संवादात सयुक्तिक पटवून देऊन परमेश्वराचे नाम परमेश्वरप्राप्तीचे कर्म-योग-ज्ञान या मार्गांपेक्षा श्रेष्ठ आहे असे नाही; तर अर्चन, सेवन ध्यानादी सर्व भक्ती उपायांमध्ये भगवंताचे नामच श्रेष्ठ साधन आहे, हे मत दृढ केले. भगवंताच्या रूपापेक्षाही नाम भगवंताच्या निकटतर आहे. भगवंताची अनेक रूपे नाहीशी झाली, तरी त्याचे नाम देशकालातीत असते. जगामधल्या सर्व वस्तूचे मूलद्रव्य एकच आहे. अनेक रूपे आली तरी मूलद्रव्य कायमच राहते. म्हणून नाम श्रेष्ठ आहे. इंद्रियांनी रूपाचे ज्ञान होते, ते सूक्ष्म असते. ते ज्ञान नामात साठवले आहे. भगवंताचे नाम शब्दच आहे. भगवंताच्या नामात त्याचे रूप, गुण व लीळा साठवल्या आहेत. एका नामाने भगवंताचे समग्र रूप साक्षात्कृत होते. रूप भगवंताची जड खूण आहे, तर नाम ही त्याची सूक्ष्म खूण आहे. जड रूप व्यक्त आहे, तर नाम अव्यक्तरूपाने त्याला आपल्यात सामावणारे आहे. नामानेच भगवंताच्या रूपाचा बोध होतो. भगवंताचे शब्दरूप नाम नित्य आहे. रूप हे नामापेक्षा जड दृश्य, विकार पावणारे असल्याने त्याला कालादी मर्यादा असतात; परंतु नाम सूक्ष्म विकाररहित असल्याने ते कालातीत नित्य आणि सत् आहे. रूपे बदलली तरी त्यात नामाचा असणेपणा असतो. नाम नुसते सत् नाही ते विकाररहित असल्याने पूर्ण, दु:खरहित आहे, आनंदस्वरूप आहे. नामाने सर्व पापांचे क्षालन होते. नाम हा सर्व प्रार्थनांच्या सेवेचा राजा आहे. नामाने आनंदमय भगवंताचे सान्निध्य लाभल्याने त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही. ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे त्याच्या मुखात नाम येते. अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात. नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणतात. अशा प्रकारे नामासारख्या सूक्ष्म, अदृश्य संकल्पनेचे माहात्म्य सर्वांनाच त्यांनी पटवून दिले.

श्रीमहाराजांच्या सर्व प्रवचनांची लौकिककथांची, व्याख्यानांची परिसमाप्ती नामस्मरणाच्या माहात्म्य सांगण्याच्या तात्पर्यात होती. त्यांनी निरूपणात संस्कृतीची व्याख्या करताना म्हटले आहे — जी कृती सर्व बाजूंनी हिताची असते, तीच संस्कृती होय, आणि ‘सु’ म्हणजे शिव, चांगले, त्याची धारणा करणारी ती सुधारणा होय. भगवंताकडे नेणारी कृती सर्व बांजूनी हिताची असते; कारण हित म्हणजे कल्याण आणि भगवंत तर कल्याणाचे निधान (आगर/खजिना) आहे. म्हणून ज्या कृतीच्या आरंभी, मध्ये आणि शेवटी भगवंत भरलेला आहे ती कृती संस्कृती होय. ही व्याख्या पारमार्थिक दृष्टिकोनातून एका अनुभवसिद्ध भगवंतनिष्ठ भक्ताने केलेली आहे. तसेच खरी समता म्हणजे काय, हे एका लौकिक कथेच्या तात्पर्यामध्ये सांगितले आहे. —  ‘‘ज्याला जे योग्य आहे, त्याला ते देणे हीच खरी समता होय.’’ श्रीमहाराजांनी परमार्थावर दहा स्फुट प्रकरणे लिहिली असून ती सर्व ओवीबद्ध आहेत. त्यांची भाषा साधी व रचना सुलभ आहे. आनंदसागर, ब्रह्मानंद व डॉ. कुर्तकोटी (स्वामी) हे त्यांचे प्रमुख शिष्य होत.

श्रीमहाराजांनी संतांच्या उपदेशाप्रमाणेच भक्ती हे परमार्थाचे साधन असून रामनाम स्मरण हे भक्तिसाधन आहे, असे सांगितले. नामस्मरणभक्तीचा विशेष म्हणजे नाम हे परमार्थ साधन सिद्धांतरूप आहे. नाम हेच सर्वोत्तम मोक्षसाधन आहे. हा उपदेश प्रसृत करण्यात आपले जीवन समर्पित केले. इतकेच नव्हे, तर त्याची तर्कनिष्ठ मांडणीही केली. विद्वान तार्किकांपासून सामान्यांना नामाचे श्रेष्ठत्व स्वानुभवसिद्ध आचारांनी, तर्कनिष्ठ विचारांनी पटवून दिले. त्यांचे संवाद, त्यांची प्रवचने ह्यांचे सार म्हणजे नामसाधनाचे श्रेष्ठत्व होय. त्यांचे चरित्र, प्रवचने भक्तांना उत्तरांदाखल पाठवलेली पत्रे हे सर्व त्यांच्या नामसिद्धांताचा महिमा सांगताना दिसून येते. श्रीमहाराजांचा नामोपदेश हीच त्यांच्या जीवनाची, तत्त्वज्ञानाची ओळख होय. त्यांचे आचार, विचार व्याख्यान सर्वच हे रामनाममय होते. आजही श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर मंदिर श्रीमहाराजांच्या चैतन्यमय अस्तित्वाने भारले असून त्यांच्या भक्तगणांनी केलेल्या नामस्मरणाच्या गजराने दुमदुमते. तिथे अन्नछत्र आहे. रुग्णालय आहे आणि भक्तगणांना सवलतीत आरोग्य सेवाही उपलब्ध आहे.

संदर्भ :

  • गोखले, गो. सी. श्री. ब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर यांची प्रवचने २१ वी आवृत्ती, पुणे, २००१.
  • बेलसरे, के. वि. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, पुणे, १९७८.

समीक्षक – शुभदा जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा