लाडीस्लस, मार्टन एल. : ( १५ ऑगस्ट, १९०१ – २० जानेवारी, १९७९ )
मार्टन एल. लाडीस्लस हे भौतिकशास्त्रज्ञ होते, त्यांनी विशेषकरून इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी आणि इलेक्ट्रॉन ऑप्टीक्स, इलेक्ट्रॉन इंटर्फेरेन्सिस या क्षेत्रात त्यांनी संशोधन केले. १९२८ ते १९३८ या काळात मार्टन हे बेल्जियम येथील ब्रुसेल्स युनिव्हर्सिटीचे सदस्य होते. १९३८-१९४१ मध्ये आर.सी.ए. उत्पादन करणाऱ्या कंपनीत ते सामील झाले. १९४१-१९४६ साली स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रॉन ऑप्टिक्स विषयाचे सहायक प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर १९४६-१९७० या काळात त्यांनी वॉशिंग्टन येथील राष्ट्रीय मानांकन संस्थेमध्ये म्हणून काम केले. मार्टन यांच्या नावावर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी, इलेक्ट्रॉन ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रॉन इंटर्फेरेन्सिस या क्षेत्रातील एकस्वे आहेत. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपखाली पहिल्यांदा जीवाणूचे छायाचित्र घेण्याचा मान मार्टन यांना दिला जातो. ही छायाचित्रे सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासासाठी भविष्यात अत्यंत उपयोगी पडली. पुढे काही वर्षातच स्टुअर्ट म्युड आणि त्याच्या सहकाऱ्यांना विस्तृत आकाराची छायाचित्रे मिळवण्यात यश प्राप्त झाले. १९३९ साली जी. ए. कौशे (G A Kausche), इ. फान्कुच (E. Pfankuch) आणि हेल्म्युट रुस्का (Helmut Ruska) यांनी टोबाको मोसाईक व्हायरसचे (TMV) दंडगोलाकार छायाचित्र प्रकाशित केले. याच त्रिकुटाने पुढे जीवाणूच्या पेशीत वाढणारा व्हायरस (Bacteriophage) हा शुक्रजंतुंसारखा दिसतो हे छायाचित्राद्वारे दाखवून दिले. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपखाली घेतलेल्या छायाचित्रांना शास्त्रीय परिभाषेत ‘फोटोमायक्रोग्राफ’ असे संबोधले जाते. जीवाणू आणि व्हायरसच्या पेशींची आंतररचना विस्तृतपणे समजून घेणे ‘फोटोमायक्रोग्राफ’च्या सहाय्याने शक्य झाले. १९३०-१९५० मध्ये मार्टन यांनी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा सखोल आराखडा तयार केला आणि त्यावर काम करायला सुरुवात केली. सूक्ष्मजीवाशास्त्राच्या प्रगतीतील हे महत्त्वपूर्ण वळण मानले जाते. मार्टन हे स्मिथसोनियन संस्थेमध्ये (Smithsonian Institution) १९७० -१९७९ या काळात संशोधन सहकारी होत.
संदर्भ :
- https://physicstoday.scitation.org/doi/10.1063/1.2995568
- http://snaccooperative.org/ark:/99166/w6cz6c2m
- https://sova.si.edu/record/NMAH.AC.0100
- http://worldcat.org/identities/lccn-n79133207/
समीक्षक : रंजन गर्गे