गोयंका, सत्यनारायण : (३० जानेवारी १९२४ — २९ सप्टेंबर २०१३). भारतातील विपश्यना संकल्पनेचे पुनर्प्रवर्तक, थोर आचार्य आणि एक प्रसिद्ध व्यापारी. त्यांचा जन्म ब्रह्मदेशातील (सध्याचे म्यानमार) मंडाले येथे एका व्यापारी कुटुंबात झाला. त्यांचे वंशज मूळचे चुरु (राजस्थान) येथील; पण व्यापारानिमित्त त्यांचे कुटुंबीय म्यानमारमध्ये गेले. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण मंडालेतच घेतले. विद्यार्थिदशेत असतानाच त्यांचा विवाह १९४१ साली इलायत्रीदेवी यांच्याशी झाला. दुसर्या महायुद्धात जपानी आक्रमणामुळे त्यांना मंडाले सोडावे लागले. तेव्हा गोयंका कुटुंबाने रंगून (सध्याचे यांगून) या राजधानीत स्थलांतर केले (१९४२) आणि तेथे वस्त्रोद्योग विकसित केला. सत्यनारायणांनी व्यापाराबरोबरच इंग्रजी व हिंदी भाषांचा अभ्यास केला. पाली भाषाही आत्मसात केली आणि वाचनाचा व्यासंग जोपासला. तेथे त्यांनी अनेक औद्योगिक संस्थांची स्थापना केली. बर्मा मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्सची पुनःस्थापना करून तीचे ते अध्यक्ष बनले. त्यांनी अखिल ब्रह्मदेश हिंदी साहित्य संमेलनाची स्थापना केली व अनेक वर्ष ते त्याचे अध्यक्ष होते. म्यानमारमध्ये त्यांनी बर्मा भारतीय कलाकेंद्राचीही स्थापना केली. त्यांचा अनेक सामाजिक संस्थांशी सक्रिय संबंध होता. त्यांची ६४ पुस्तके आणि २०० स्फुटलेख हिंदी, इंग्रजी, पाली व राजस्थानी भाषांमधून प्रकाशित झाले असून त्यांच्या अनेक पुस्तकांचा अनुवाददेखील अन्य भाषांमध्ये झाला आहे.
विपश्यनेकडे वाटचाल : यांगूनमध्ये व्यापार करीत असताना सत्यनारायणांना अर्धशिशी (मायग्रेन) या डोकेदुखी व्याधीने अस्वस्थ केले. त्यावर त्यांनी स्थानिक वैद्यांकडून हरएकप्रकारचा औषधोपचार केला; पण आराम पडेना. तेव्हा त्यांनी ब्रह्मी दूतावासाच्या सहकार्याने जर्मनी, इंग्लंड, स्वित्झर्लंड येथील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला. जपान-अमेरिकेचीही वारी केली; पण त्यावर रामबाण औषध नसल्याने केवळ मॉर्फिन इंजेक्शनचा उपाय सर्वांनी निर्देशित केला. आपणास मॉर्फिनचे व्यसन जडेल या विचाराने ते अस्वस्थ झाले होते. तेव्हा त्यांचे मित्र म्यानमारमधील अॅटर्नी जनरल उ छा ठून यांनी दहा दिवसीय विपश्यना शिबिरामध्ये सहभागी होण्याचा त्यांना सल्ला दिला. यांगूनमधील थोर आचार्य सयाजी उबाखीन (१८९९ — १९७१) यांच्याद्वारे संचालित असलेल्या विपश्यनेच्या इंटरनॅशनल मेडीटेशन सेंटरमध्ये एका दहा दिवसीय शिबिरात ते सहभागी झाले. आचार्यांचा बौद्ध धर्माचा गाढा अभ्यास आणि त्यांची विपश्यना साधना पद्धती यांचा प्रभाव सत्यनारायणांवर पडला. तसेच त्यांना विपश्यना साधनेमुळे त्यांच्या आजारापासून मुक्तीही मिळाली. नंतर ते उबाखीन यांचे पट्टशिष्य बनले. त्यांच्या आध्यात्मिक दृष्टिकोणातही बदल झाला आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण पूर्णपणे बदलला. त्यानंतर त्यांनी विपश्यनेचा पूर्ण अभ्यास सुरू केला. त्यांनी सयाजी उबाखीन यांच्या मार्गदर्शनाखाली १९५५ ते १९६९ दरम्यान विपश्यना साधना नित्यनियमाने करून विपश्यनेचा ध्यानविधी आत्मसात केला. सयाजी उबाखीन यांना हे ज्ञान अर्धशतकाहून जास्त काळ विपश्यनेचे आचार्य म्हणून म्यानमारमध्ये प्रसिध्द असलेले सयाताजी यांच्याकडून मिळाले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्यानमारमधील एक ज्ञानी भिक्षू म्हणून प्रसिध्द असलेले लेडी सयाडो हे सयाताजी यांचे गुरू होते. या पूर्वीच्या गुरूंबद्दल नोंदी उपलब्ध नाहीत; पण विपश्यना साधनेचा अभ्यास करणार्यांना असा विश्वास आहे की, लेडी सयाडो यांना ही विद्या म्यानमारमध्ये जेव्हा ‘विपश्यना‘ ही साधना व गौतम बुध्दांची शिकवण प्रथम शिकविली जाऊ लागली, तेव्हापासून चालत आलेल्या गुरुशिष्यपरंपरेतूनच प्राप्त झाली आहे.
सत्यनारायणांच्या हे लक्षात आले की, विपश्यना ही ध्यानपद्धती केवळ शारीरिक वेदनांवर उपाय करणारी नाही; तर सांस्कृतिक व सांप्रदायिक बंधनांच्या पलीकडे नेणारी, ती तत्त्ववेत्त्याची भेदक दृष्टी आहे. तिच्यामुळे वस्तूंचे अनेकांगी यथाभूत ज्ञान होते. सर्व विश्व हे रूप, संवेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या पाच स्कंदांचा समुदाय असून हे पाचही स्कंद अनित्य आहेत. विपश्यनेने म्हणजे प्रज्ञेने वेध घेऊन अनित्यता, दु:खरूपता व अनात्मता यांचे दर्शन घेणे म्हणजे विपश्यना होय. जून १९६९ मध्ये सयाजी उबाखीन यांनी सत्यनारायणांना परंपरागत आचार्यपद प्रदान केले. सयाजी उबाखीन यांच्या मते, विपश्यना ही भारताची देणगी आहे आणि ती ब्रह्मदेशात मूळ स्वरूपात जपून ठेवलेली आहे. दि. २० जून १९६९ रोजी सत्यनारायण मातोश्रींच्या आजारानिमित्त गुरूंची अनुमती घेऊन भारतात आले आणि पुढे ते मुंबईला स्थायिक झाले. म्यानमारच्या तत्कालीन शासनाने उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केल्यामुळे (१९७१) त्यांचे सर्व कुटुंबीय भारतात आले; गुरूंच्या आज्ञेने त्यांनी विपश्यना शिबिरे घेण्यास सुरुवात केली आणि दिल्ली, चेन्नई, बोधगया वाराणसी, मुंबई इत्यादी शहरांतून शिबिरे घेतली. पुढे त्यांनी १९७६ मध्ये इगतपुरी येथे विपश्यना विश्व विद्यापीठ धम्मगिरी या प्रमुख विपश्यना केंद्राची स्थापना केली. त्यानंतर देशभरात आणि नेपाळ, इझ्राएल, जपान, मंगोलिया, म्यानमार, श्रीलंका, तैवान, थायलंड, कंबोडिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका, इत्यादी देशांत विपश्यना केंद्रांची स्थापना केली. तसेच त्यासाठी सहायक आचार्यांची नियुक्ती केली.
मुंबईमध्ये अलीकडे सत्यनारायणांच्या नेतृत्वाखाली १०२ मी. उंच व ६ मी. रुंद भिंतीचा स्तंभविरहित विशाल स्तूप (गोल्डन पॅगोडा) निर्मिला असून त्यात अंदाजे ८००० साधक एकत्र बसून ध्यानसाधना करू शकतात.
सत्यनारायणांच्या मते, विपश्यनेवर संशोधन होणे गरजेचे असून त्यासाठी त्यांनी विपश्यना विशोधन विन्यासेची स्थापना केली. या संशोधन केंद्राचा मूळ उद्देश पाली भाषेतील बौध्द साहित्याचे संपादन तसेच भाषांतर करणे आणि विपश्यनेचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग कसा होतो, यावर संशोधन करणे, हा होय.
‘विपश्यना’ म्हणजे विशेष प्रकारची पश्यना किंवा दृष्टी होय. हा शब्द केवळ बौद्ध संकरित संस्कृत साहित्यात आढळतो. ‘विपश्यना’ हे रूप पाली भाषेतील ‘विपस्सना’ या मूळ शब्दाचे संस्कृतीकरण आहे. निसर्गनियमांनी युक्त संप्रदायातीत असा वैश्विक धम्म (धर्म) म्हणजे विपश्यना असून तो सत्य व ज्ञान या पायांवर स्थित आहे. त्या साधकाने फक्त श्वासोच्छवासावर तटस्थ राहून मन एकाग्र करावयाचे आहे. या ध्यानधारणेत जप-ज्याप, मंत्र-तंत्र, मूर्ती वा वस्तू यांना स्थान नाही. हा साधनविधी म्हणजे स्वत:च्या शरीरात उत्पन्न होणार्या संवेदनांचे नि:पक्षपाती केलेले निरीक्षण होय. संवेदनाची अनित्यता समजून घेतल्याने त्याच्याविषयीची आसक्ती नाहीशी होते.
प्रचंड प्रभावी व्यक्तिमत्व असूनही सत्यनारायणांना स्वतःला गुरू म्हणून मानणारा मोठा शिष्यसंप्रदाय निर्माण करण्यात अजिबात रस नव्हता. याउलट, आत्मनिर्भर होऊन आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर स्वतःचे व्यक्तिमत्व कसे घडवावे यावरच त्यांचा भर होता.विपश्यनेची खरी कसोटी ती व्यवहारात उतरवणे हीच आहे, असे ते मानत. आपल्या शिष्यांना स्वतःच्या पायाशी बसवून घेण्यापेक्षा जगात पाठवून आनंदी, उत्साही व उपयुक्त जीवन जगण्यास ते प्रवृत करत. त्यांच्याबद्दल दाखविलेला भक्तीचा आविष्कार ते नेहमीच टाळत. आपल्यापेक्षा ह्या साधनाविधीशी एकनिष्ठ होऊन साधकांनी भक्ती व्यक्त करावी व आपल्या अंतर्गत सत्याचा शोध घ्यावा असाच सल्ला साधकांना ते देतात. त्यांच्या मते, विपश्यना साधना पूर्णपणे निर्दोष आहे.
विपश्यना ध्यानपद्धतीत प्रवेश करण्यासाठी प्रौढ साधकाला कमीतकमी दहा दिवसांचे शिबीर पूर्ण करावे लागते. त्यात मुख्यत: तीन साधना शिकविल्या जातात. १) आनापानस्मृतीभावना (नैसर्गिकपणे होणार्या श्वासोच्छवासाकडे जागरुकपणे लक्ष देणे), २) वेदनानुपश्चना (शरीरभर ठिकठिकाणी जाणवणार्या संवेदना तटस्थ निरीक्षण करणे) व ३) मेत्ताभावना (प्राणिमात्रांचे दु:ख नाहीसे होवो, ते सुखी होवोत सर्वांचे कल्याण होवो, अशी भावना व्यक्त करणे) या सार्यामागची व्यापक सैद्धांतिक बैठक सायंकालीन प्रवचनातून तयार केली जाते. साधनेवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टिकोनातून (या काळात वाचन-लेखनास बंधन असते) साधकाला पूर्णवेळ मौन पाळावे लागते. एकूण साधना शिस्तबद्धपणे होत असली, तरी त्यात कर्मकांड, व्यक्तिपूजा यांना स्थान नसते. विशेष साधनेकरिता साधकांसाठी वीस, तीस, पंचेचाळीस दिवस अशी दीर्घ मुदतीची शिबिरे असतात. गौतम बुध्दांनी दिलेली शिकवण, त्यांनी दाखविलेला मार्ग हा सार्वजनिक आहे. तो प्रत्येक माणूस आचरणात आणू शकतो‐ त्यांनी या मार्गास आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच एकमेकांशी संबंधित अशा आठ अंगांनी तयार झालेला मार्ग असे म्हटले आहे. त्यात अंतर्मनाच्या गाभार्यातून सुप्तावस्थेत दडून राहिलेल्या विकारांना आणि वासनांना नष्ट करून निर्मळ करावयाचे असते.
सत्यनारायणांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांना न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत आयोजिलेल्या सहस्राब्दि विश्वशांती संमेलनासाठी जगातील मान्यवर आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांबरोबर भाषणासाठी आमंत्रित केले होते (१९ ऑगस्ट २०००). तेथे ते म्हणाले की, “लोकांनी एका संप्रदायातून दुसर्या संप्रदायात रूपांतर किंवा धर्मांतर करण्याऐवजी लोकांना दुःखापासून सुखाकडे, बंधनातून मुक्तीकडे, क्रूरतेपासून करुणेकडे वळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” ते पुढे म्हणतात की, “जोपर्यंत व्यक्ती-व्यक्तींमध्ये आंतरिक शांती नसेल, तोपर्यंत विश्वामध्ये शांती स्थापन होऊ शकणार नाही. जगामध्ये शांती निर्माण करायची असेल, तर अंतःकरणातला क्रोध आणि द्वेष नष्ट केला पाहिजे”, असे त्यांनी प्रभावीपणे आपले मत मांडले. यावरून त्यांचा विश्वशांतीचा दृष्टीकोन स्पष्ट दिसून येतो.
सत्यनारायण हे आधुनिक युगात सबंध जगामध्ये विपश्यनेचा प्रसार करणारे एक महान व्यक्तिमत्व होते. श्रीलंकेच्या वतीने त्यांना अग्ग महा धम्म प्रचारक (अग्र महा धर्म प्रचार) ही पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच भारत सरकारतर्फे त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले (२०१२).
सत्यनारायणांच्या जीवनावर गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचंड प्रभाव होता. त्यांच्या मते गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे विज्ञानवादी आहे आणि मानवाला दुःखापासून मुक्त करण्यास मदत करते. हे तत्त्वज्ञान सांप्रदायिक वादाला प्रेरणा देत नाही. बुद्धविचारांच्या माध्यमातून त्यांनी मानवतावादी तत्त्वज्ञानाचा संपूर्ण जगात प्रसार केला. त्यांच्या मते, कोणत्याही संप्रदायातील किंवा कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने गौतम बुध्दांच्या तत्त्वज्ञानाचे आपल्या जीवनामध्ये पालन केले पाहिजे. गौतम बुध्दांनी सांगितलेल्या विपश्यनेचा अभ्यास सर्वांनी केला पाहिजे आणि आपल्या जीवनातील दुःखाचा नाश केला पाहिजे. त्यांनी गौतम बुध्दांचे विचार संप्रदाय म्हणून न सांगता एक तत्त्वज्ञान म्हणून सांगितले. त्यामुळे कोणत्याही संप्रदायातील व्यक्ती हे विचार अंगीकारू शकतो. त्यामुळेच आज जगातील अनेक धर्मांतील आणि संप्रदायांतील लोक विपश्यनेचा अभ्यास करताना दिसतात. त्यामुळे त्यांचे अनुयायी संपूर्ण जगामध्ये सातत्याने वाढताना दिसत आहेत.
सत्यनारायणांनी भारतातून पंचविशे वर्षांपूर्वी लूप्त झालेली गौतम बुध्दांनी प्रसृत केलेली विपश्यना साधना पुन्हा भारतात प्रस्थापित केली आणि ती परंपरा बहुसंख्यांकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्नपूर्वक ध्यास घेतला. त्यांच्या प्रयत्न-प्रेरणेतून शेकडो केंद्रांतून विपश्यना साधनेचा लाभ आज उपलब्ध आहे. महाराष्ट्रात इगतपुरीशिवाय मुंबई, पुणे, कोल्हापूर, धुळे, नागपूर, औरंगाबाद आदी बहुतेक शहरांमधून विपश्यना केंद्रे आहेत. सत्यनारायणांकडे प्रमुख आचार्यपद असून त्यांची साधी सोज्वळ राहणी, उच्च पवित्र विचारसरणी, सेवावृत्ती आणि नित्यनैमित्तिक विपश्यना यांमुळे ते शिबिरार्थींमध्ये आदरणीय व पूज्य मानले जात असत. त्यांनी विपश्यना पत्रिका मासिक सुरू केले. त्यातील लेखन बहुतेक तेच करीत असत. लुप्त विपश्यना साधनेचे पुनरुज्जीवन हे त्यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांनी विपश्यनेला बौध्द धर्माच्या एका मर्यादित क्षेत्रातून बाहेर काढून तिला तिच्या सार्वजनिक धर्मातीत सत्यधर्मीय वैज्ञानिक प्रणालीच्या स्वरूपात स्थापित केले आणि प्रसारित केले. त्यांचे हे योगदान बौध्द तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे.
वृद्धापकाळाने त्यांचे मुंबईत निधन झाले.
समीक्षक – प्रदीप गोखले