महालनोबीस, प्रशांत चंद्र : ( २९ जून १८९३ – २८ जून १९७२ )
महालनोबीस यांचा जन्म कोलकत्यात झाला. १९१२ मध्ये भौतिकशास्त्रातील बी.एस्सी. पदवी त्यांनी प्रेसिडेंसी महाविद्यालयातून मिळवली. १९१५ मध्ये इंग्लंडच्या केंब्रिजमधील किंग्ज महाविद्यालयामधून गणित व भौतिकशास्त्र घेऊन ते ट्रायपॉस उत्तीर्ण झाले. ट्रायपॉसच्या दुसऱ्या भागात भौतिकशास्त्रात प्रथम वर्ग मिळविल्यामुळे त्यांना ज्येष्ठ संशोधन शिष्यवृत्ती मिळाली. मात्र संशोधन सुरू करण्यापूर्वीच्या भारतातील मुक्कामात त्यांची भेट कोलकत्याच्या प्रेसिडेंसी महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी झाली आणि तात्पुरत्या काळासाठी ते तेथे भौतिकशास्त्र शिकवू लागले. यात रमल्यामुळे संशोधन करण्यासाठी केंब्रिजला ते परत गेले नाही.
महालनोबीस यांच्या संख्याशास्त्रातील कामगिरीची सुरुवात किंग्ज कॉलेजच्या ग्रंथालयातील ‘बायोमेट्रिका’ (Biometrika) या नियतकालिकाच्या खंडांच्या वाचनामुळे झाली. त्यांनी तो संपूर्ण संच खरेदी केला आणि त्याच्या वाचनातून सांख्यिकी हे नवीन शास्त्र, मापने आणि त्यांच्या विश्लेषणावर आधारित असून त्याची उपयुक्तता व्यापक असल्याचे महालनोबीसांच्या लक्षात आले. १९२२ पासूनची तीस वर्षे प्रेसिडेंसी महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे प्राध्यापकपद निभावतानाच त्यांनी संख्याशास्त्रात इतके काम केले की त्याचा अमीट ठसा भारतीय संख्याशास्त्राच्या विकासावर उमटला.
कोलकत्यातील झूलॉजिकल ॲण्ड ॲन्थ्रॉपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे संचालक, नेल्सन अन्नानडेल (Nelson Annandale) यांनी मानववंशीय-मापनांच्या उपलब्ध आधारसामग्रीचे विश्लेषण करण्याचे काम महालनोबीसांवर सोपविले. मोजक्याच आधारसामग्रीच्या विश्लेषणावरून त्यांनी १९२२ मध्ये ‘Anthropological observations on the Anglo-Indians of Calcutta, part I: Male stature’ हा शोधलेख प्रसिद्ध केला. तो वाचून वेधशाळेचे सरसंचालक सर गिल्बर्ट वॉकर (Gilbert Walker) यांनी महालनोबीसांना हवामानशास्त्रातील काही समस्यांचा पद्धतशीर अभ्यास करण्याची विनंती केली. यातून महालनोबीसांनी एक महत्त्वाचा शोध लावला : हवामानातील बदलाचे सर्वोच्च नियंत्रक क्षेत्र पृथ्वीच्या वातावरणात, समुद्रसपाटीपासून ४ कि.मी. वर असते. यामुळे त्यांची अलिपोर वेधशाळेत हवामानतज्ज्ञ म्हणून नियुक्ती झाली (१९२२-२६). हवामानासंबंधात त्यांनी १९२३ मध्ये ‘On the seat of activity in the upper air’; ‘On errors of observation and upper air relationships’ आणि ‘Correlation of upper air variables’ हे शोधलेख प्रसिद्ध केले.
पर्जन्यमान आणि पूर या संदर्भातील ५०-६० वर्षांचे ओडिशा आणि बंगालच्या उपलब्ध विशाल आधारसामग्रीचे विश्लेषण करुन त्यांनी काही मार्गदर्शक निष्कर्ष काढले. त्यांच्याधारे हिराकूड धरण आणि दुर्गापूर बंधारा यांची निर्मिती झाली. १९२७ मध्ये महालनोबीस लंडनमधील कार्ल पिअर्सन (Karl Pearson) यांच्या प्रयोगशाळेत मानववंशीय-मापनांच्या आधारसामग्रीचे सखोल विश्लेषण आणि पिअर्सन यांच्या कुळसाधर्म्य गुणांकाचे (Coefficient of Racial Likeness) परीक्षण करण्यासाठी गेले. त्यात त्यांना जीवशास्त्रीय जवळीक शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कुळसाधर्म्य गुणांकात काही उणीवा जाणवल्या. त्या दूर करण्याच्या पद्धती सांगणारा D2-नमुनाफलावरील (sampling function) ‘Tests and Measures of Group Divergence’ हा महत्त्वपूर्ण शोधलेख त्यांनी १९३० मध्ये प्रसिद्ध केला. आता D२-नमुनाफल हे ‘महालनोबीस अंतर’ म्हणून ओळखले जाते. आधारसामग्रीतील एखादे निरीक्षण सर्व चलांच्या सामाइक बिंदूपासून किती अंतरावर (अवशिष्टाचे) आहे, ते हे वर्णनात्मक नमुनाफल सांगते. या फलामुळे अज्ञात नमुन्याची ज्ञात नमुन्याशी तुलना करून आणि साम्य शोधून, अज्ञात नमुन्याचे मापन करता येते. हे नमुनाफल एककरहित (unit less) असते. यामुळे महालनोबीस अंतर आपोआपच ‘बहुचल कार्य संख्या’ (multivariate effect size) बनते, जे मानववंशशास्त्राच्या अभ्यासात वंशांची जवळीक तपासताना अतिशय उपयुक्त ठरते.
महालनोबीस यांच्या निर्देशनाखाली दोन महाकाय मानववंशीय सर्वेक्षणे, संयुक्त प्रांत (United Provinces, आजचे उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड) आणि बंगालमध्ये पार पडली. या सर्वेक्षणांमधून निघालेले निष्कर्ष, काळाच्या ओघातही अचूक ठरले आणि मान्यही झाले. उदाहरणार्थ, बंगाली ब्राह्मणांचे कुळसाधर्म्य भारताच्या इतर प्रदेशांतील ब्राह्मणांपेक्षांही बंगालमधीलच इतर जातींशी अधिक आहे.
‘विशाल प्रमाण नमुना सर्वेक्षणे’ (largescale sample surveys) हे महालनोबीस यांचे आणखी एक महत्त्वाचे सांख्यिकी योगदान आहे. १९३७ मध्ये या नमुना सर्वेक्षणाची सुरुवात बंगालमधील ज्यूटच्या पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन यांचा अंदाज वर्तविण्यातून झाली. त्याधारे वर्तविलेले अंदाज किमान दोष असलेले सिद्ध झाले आणि सर्वमान्य झाले. या योगदानासाठी १९४४ मध्ये लंडनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना वेल्डन पदक (Weldon Medal), तर १९४५ साली रॉयल सोसायटीने सदस्यत्व दिले.
महालनोबीसांनी १९३७-४४ दरम्यान घेतलेल्या विविध सर्वेक्षणांत ग्राहकांचे खर्च, चहापानाच्या सवयी, लोकमत, दर एकरी पीक उत्पादन, आणि वनस्पती रोग असे विषय होते. याकरिता त्यांनी काटेकोरपणे निवडलेल्या यादृच्छिक नमुन्यांचा वापर केला होता. आधारसामग्री गोळा करण्याच्या एकूणच पद्धतीला त्यांनी पूर्णपणे शास्त्रीय वळण लावून, निष्कर्षांत अचूकपणा राहिल याची काळजी घेतली. उदाहरणार्थ, पीक उत्पादनाच्या आकलनासाठी त्यांनी फक्त चार फूट व्यासांच्या मोजक्याच शेतखंडांची नमुना म्हणून निवड केली होती. अशा विविध प्रकारच्या सर्वेक्षणांतून मिळालेल्या अनुभवांवरून त्यांनी दोनशेहून अधिक शोधनिबंध नमुना निवडीवर लिहिले.
आपली सर्व पुंजी पणाला लावत १९३१ मध्ये इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट (आय.एस.आय.) या संस्थेची अधिकृत स्थापना महालनोबीस यांनी केली. तिने भारतातील सांख्यिकीच्या विकासाला गती दिली. संस्थेत रुजू होण्यासाठी त्यांनी राज चंद्र बोस, समरेंद्रनाथ रॉय आणि सी. राधाकृष्ण राव यांसारख्या, पुढे जगविख्यात झालेल्या, बुद्धिमान तरुण भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितींची मने वळवली. १९३३ पासून इन्स्टिट्यूटतर्फे ‘संख्या’ हे संख्याशास्त्रावरील नियतकालिक प्रसिद्ध होऊ लागले, जे अल्पावधीतच जागतिक प्रतिष्ठेचे झाले. १९५९ पासून संस्थेला ‘महत्त्वाची राष्ट्रीय संस्था’ म्हणून कायदेशीर दर्जा मिळाला आहे. संख्याशास्त्रातील शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन यासाठी आय.एस.आय. ही जगभरातील एक अग्रगण्य संस्था मानली जाते. त्यांनी १९५६ मध्येच पहिला संगणक आयएसआयमध्ये आणला तसेच ‘आंतरराष्ट्रीय सांख्यिकी शिक्षण’ केंद्रही स्थापन केले.
भारताची पहिली पंचवार्षिक योजना (१९५१-५६) प्राथमिक क्षेत्रांच्या (कृषी, वनीकरण, मासेमारी आणि खाणकाम) आर्थिक-विकास प्रतिमानावर आधारलेली होती. दुसरी पंचवार्षिक योजना (१९५६-६१) मात्र औद्योगिक विकासावर भर देणारी होती, जी महालनोबीस यांच्या ‘चार-क्षेत्र प्रतिमानावर’ (Four-sector model) बेतलेली होती. त्यांच्या प्रतिमानात देश स्वावलंबी होईल अशा मूलभूत अवजड उद्योगांतल्या गुंतवणुकीवर भर आणि वाढती उपभोक्ता मागणी पूर्ण करण्यासाठी, तसेच रोजगार निर्मितीसाठी गृह, कुटीर आणि लघु उद्योगांवर तसेच सेवांवर भर; असे सूत्र होते.
सांख्यिकीय आधार हा राष्ट्रीय नियोजनाच्या सर्वच बाबींचा अविभाज्य भाग असला पाहिजे, असा महालनोबीसांचा आग्रह होता. म्हणून प्रत्येक आर्थिक आणि सामाजिक बाबीबद्दल संपूर्ण भारताची सर्वसमावेशक आकडेवारी मिळविण्यासाठी त्यासाठी १९५० मध्ये त्यांनी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था (National Sample Survey Office) सुरू केली. तसेच भारतभरातील सांख्यिकी कार्यक्रमांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘मध्यवर्ती सांख्यिकी संस्था’ (Central Statistical Organization) ही शीर्ष संस्था उभारण्यात महालनोबीस यांनी मोलाची मदत केली. त्यांचे ‘Experiments in Statistical Sampling in the Indian Statistical Institute’ हे १९६२ साली प्रसिद्ध झालेले पुस्तक त्यांच्या नमुना सर्वेक्षणाच्या कामाचा आढावा देते.
आयुष्याच्या अखेरच्या दशकातही महालनोबीसांनी नवीन सांख्यिकी पद्धती शोधल्या. उदाहरणार्थ, विभिन्न गटांतील लोकांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीची तुलना करण्यासाठी त्यांनी भागक आलेखी (fractile graphical) विश्लेषणतंत्र विकसित केले, जे विज्ञानाच्या अनेक शाखांतून आजदेखील वापरले जाते. आय.एस.आय.च्या भाषाविषयक संशोधन विभागात त्यांनी संख्यात्मक भाषाशास्त्र आणि भाषा नियोजन यात संशोधन केले. वाणीविकारशास्त्रात संशोधन करून त्यांनी भाषासुधार क्षेत्रातही योगदान दिले.
महालनोबीसांना बहुविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळाले. ते इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटचे मानद अध्यक्ष बनले. अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनचे अधिछात्र (Fellow) म्हणून त्यांची निवड झाली. त्यांना ‘पद्मविभूषण’ हा मानाचा भारतीय पुरस्कार देण्यात आला. २००६ पासून, २९ जून हा महालनोबीसांचा जन्मदिवस, भारतभर ‘सांख्यिकी दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
संदर्भ :
- Ghosh J. K., Prasanta Chandra , In Statisticians of the Centuries (Eds. C.C. Heyde and E. Seneta). New York, Springer-Verlag, 2001, pp.434-438.
- http://www-history.mcs.st-and.ac.uk/Biographies/Mahalanobis.html
- https://www.livemint.com/Opinion/ouXwRwEnWJ8wqiOW3T03LK/The-statistical-legacy-of-PC-Mahalanobis.html
समीक्षक : विवेक पाटकर