मेंदू हा माणसाचा शिकण्याचा अवयव आहे. जन्मापासून अखेरच्या क्षणापर्यंत मेंदूचे शिकण्याचे काम चालूच असते. मेंदूचे शिकण्याचे काम अल्पशा प्रमाणात बालकाच्या जन्मापूर्व अवस्थेतही होत असते. शिकायचे कसे, हे मेंदूला उपजतच माहीत असते; मेंदूची स्वतःची अशी शिकण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया असते. शिकण्याची प्रेरणाही मेंदूला उपजतच असते. जेव्हा आपण स्वप्रेरणेने शिकत असतो, तेव्हा मेंदूमध्ये एंडॉरफिन्स (endorphins) नावाचे संप्रेरक (hormone) निर्माण होते आणि ते आनंदाची जाणीव निर्माण करते. त्यामुळेच मेंदूमधील शिकण्याची प्रक्रिया ही आनंदाची, आनंदमय प्रक्रिया असते.

मेंदू हा अवयव स्वतःहून शिकण्यासाठी लागणारी अंतर्गत साधनसामुग्री आपल्याबरोबर घेऊन आलेला असतो. उदा., जशी त्याची एक शिकण्याची नैसर्गिक आणि उपजत प्रक्रिया असते, तशीच एक स्वतःची अशी तार्किकता मेंदूकडे असते. त्यामुळे अर्थपूर्ण वाक्ये मेंदू सहजपणे उलगडतो व निरर्थकतेकेडे तो डोळेझाक करतो. मेंदू हा सतत आकृतीबंधाचा (pattern-seeking) शोध घेत असतो. आपण पाहिलेला चेहरा ओळखतो, एखादी कविता, एखादी कलाकृती आपल्या लक्षात राहते; कारण त्याचे विशिष्ट असे आकृतिबंध आपल्या मनात ठसलेले असतात. मेंदूमध्ये मिळालेल्या माहितीचे संघटन, आकृतिबंधाच्या स्वरूपात होत असते. मेंदूमध्ये आणखी एक क्षमता उपजतच असते, ती म्हणजे प्रश्न सोडविण्याची, समस्या निवारणाची क्षमता होय. समस्या निवारणाच्या दोन यंत्रणा मेंदूमध्ये वसलेल्या असतात. पहिली, एखाद्या घटनेला तात्काळ प्रतिसाद देणारी भावनिक यंत्रणा. उदा., समोर एकदम नाग सर्प दिसल्यावर आपली तात्काळ भावना आपल्याला उलट्या दिशेने पळून जायला आणि आपला प्रश्न सोडवायला उद्युक्त करील. दुसरी, जरा विचारपूर्वक प्रश्नाला तोंड देण्याची बौद्धिकतेची यंत्रणा. जरा सवड घेऊन, विचार करून निर्णय घेणे हे अधिक उपयुक्त ठरते. जीवनातील बरचसे प्रश्न सोडविण्यासाठी मेंदू या दोन मार्गाचाच अवलंब करीत असतो.

मेंदू हा प्राणी जीवनाचा एक अवयव असल्यामुळे तो शिकत असताना त्यामध्ये काय आणि कसे घडते, काय काय बदल घडतात, हे आता बऱ्यापैकी स्पष्टपणे मांडता येते. अर्थात, हे समजावून घेण्यासाठी मेंदूच्या अंतर्गत असणाऱ्या महत्त्वाच्या इंद्रियांची आणि त्यांच्या कार्याची काहीशी माहिती असावी लागेल.

मेंदूमधील इंद्रिये : शिकण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणारी मेंदूमधील प्रमुख पाच इंद्रिये असतात आणि ती प्रत्यक्ष कार्य करतात.

  • १) चेतापेशी (Neuron) : मेंदूमध्ये अक्षरशः अब्जावधी चेतापेशी असतात. मेंदूचे सगळेच काम या चेतापेशींमुळे आणि चेतापेशींद्वारे चालते.
  • २) वृक्षिका (Dendrites) : आपण जेव्हा शिकत असतो, तेव्हा विशिष्ट ठिकाणच्या चेतापेशींच्या वृक्षिका वाढतात. जेवढे आपण अधिक शिकतो, तेवढ्या अधिक वृक्षिका वाढविण्याचे काम मेंदू करीत असतो. त्यामुळे ‘वृक्षिकांची वाढ = शिकणे’, असे म्हणण्याचा प्रघात आहे.
  • ३) अक्षतंतू (Axon) : शिकण्याच्या प्रक्रियेत अक्षतंतू हा आपल्या टोकाला असलेल्या पुटिकांतील चेताप्रसाराद्वारे दुसऱ्या संबंधित असलेल्या एक किंवा अनेक चेतापेशींच्या वृक्षिकांकडे विद्युत-रासायनिक संदेश पोचवितात. ही संदेशवहनाची क्रिया विदरांसह होत असते. थोडक्यात, अक्षतंतूंद्वारे चेतापेशी आपल्याकडील माहिती दुसऱ्या पेशींकडे सुपूर्त करीत असते.
  • ४) चेतापेशीजालिका (Neural network) : शिकण्याच्या प्रक्रियेत जेव्हा अक्षतंतूंच्या पुटिकांतील चेताप्रसारकांद्वारे दुसऱ्या अनेक चेतापेशींकडे संदेश पोचविले जातात, तेव्हा या विशिष्ट संदेशवहनात भाग घेणाऱ्या सर्व चेतापेशींच्या एकत्रित बांधणींतून चेतापेशीजालिका तयार होतात. विशिष्ट माहिती साठविलेले असे चेतापेशींचे एक कुटुंबच असते. पुढे नवे काही शिकताना, नवा विचार करताना, नवी कल्पना करताना किंवा पूर्वीची एखादी गोष्ट आठविताना विशिष्ट चेतापेशी विद्युत-रासायनिक संदेशवहन करीत असतात. हे संदेशवहन चेतापेशींच्या संपर्कस्थानांद्वारे म्हणजेच विदरांद्वारे होत असते.
  • ५) विदर (Synapse) : जेव्हा दोन चेतापेशी परस्परांशी त्यांच्या कामांसाठी जोडल्या जातात, तेव्हा अशी जोडणी किंवा चेतापेशींचा परस्पर संपर्क विदराद्वारे म्हणजेच एका पेशीचा अक्षतंतू व दुसऱ्या पेशीच्या वृक्षिका यांमधील अंतराने निर्माण होत असते. हे विदर शिकण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे कार्य बजावीत असतात. जेवढे नवीन शिकणे होते अथवा शिकताना सराव केला जातो, तेवढ्या चेतापेशींच्या जोडण्या वाढून विदरांची संख्या वाढत असते. त्यामुळे ‘शिकणे म्हणजे विदरांची संख्या वाढणे’, असेही म्हटले जाते.

मेंदूमधील शिकण्याची प्रक्रिया ही खूप गुंतागुंतीची असली, तरी स्थूलमानाने तिच्या तीन पायऱ्या सांगता येतात. एक, ज्ञानेंद्रियांद्वारे बाहेरील जगातील माहितीचे मेंदूत प्रवेश करणे; दोन, या माहितीवर अंतर्गत अपेक्षित प्रक्रिया घडून माहितीचे रूपांतर ज्ञानात होणे आणि तीन, हे ज्ञान मेंदूच्या दीर्घकालिक स्मृतीत साठत असल्यामुळे हवे तेव्हा ते बाहेर काढता येणे, हे आहेत.

मेंदूचे शिकणे ही अव्याहत चालणारी गोष्ट आहे. मेंदूशास्त्रज्ञांनी असे दाखवून दिले आहे की, आजूबाजूच्या वातावरणातील गरजांनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची अत्यंत विकसित अशी मूलभूत क्षमता मेंदूमध्ये असते. या प्रक्रियेला मेंदूची ‘रूपणीयता’ (Plasticity) असे म्हणतात. या रूपणीयतेमुळे वेळो वेळीच्या अनुभवांतून पेशीजालिकांमध्ये बदल घडत जातात आणि अशाप्रकारे शिकणे ही मानवाची दीर्घकालची किंवा आयुष्यभराची प्रक्रिया ठरते.

शिकण्यायोग्य वातावरण असणे किंवा नसणे, याचे बरे अथवा वाईट परिणाम मेंदूमधील शिकण्याच्या प्रक्रियेवर होत असतात. अगदी माणसाच्या दैनंदिन व्यवहारात असणाऱ्या घटनांचे असे परिणाम संशोधकांनी दाखविलेले आहेत. उदा., पोषक आहार, पुरेसे पाणी पिणे, शरीराची हालचाल व व्यायाम, पुरेशी झोप, घरात किंवा समाजातील इतर संबंधितांबरोबर घडून येणाऱ्या सहकार्याच्या आंतरक्रिया इत्यादींचे चांगले परिणाम मेंदूमधील शिकण्याच्या प्रक्रियेवर होत असतात. नवे शिकताना घ्यावी लागणारी आव्हाने ही मनावर ताण निर्माण करीत असतात; परंतु हा ताण आवश्यक असा म्हणजे सकारात्मक अथवा सुखकारक ताण असतो. तो विकासाला साहाय्यक ठरतो; परंतु तो ताण शरीराचे वा मनाचे नैसर्गिक संतुलन बिघडविणारा किंवा नकारात्मक किंवा आकलन ओझे लादणारा असेल, तर तो मात्र माणसाच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम करणारा ठरतो.

शिकण्याची प्रक्रिया ही सामान्यतः बौद्धिक प्रक्रिया जरी मानली जात असली, तरी तिचा घनिष्ठ संबंध मेंदूअंतर्गत रित्या भावनेशी जोडलेला असतो. चांगल्या रितीने होणाऱ्या शिकण्यात पूरक, स्थिर भावनेचे अधिष्ठान मेंदूशास्त्रज्ञ महत्त्वाचे मानतात. मेंदूविषयक शास्त्रात भावना हा बौद्धिक ज्ञान वा कौशल्ये प्राप्त होण्यासाठी असलेला द्वारपाल मानला जातो. भावनांच्या स्वरूपावरून त्या शिकण्याला पूरक आहेत किंवा घातक आहेत हे ठरते. शिकण्याच्या प्रक्रियेत अनेक मानसिक प्रक्रियांचा समावेश होत असतो. उदा., अवधान राखणे, लक्ष केंद्रित करणे, समस्या निवारण करणे, संकल्पनांचे नेमके आकलन होणे इत्यादी. विपरित ताणांचे आघात म्हणजे भीती वाटणे अथवा अगदी कंटाळा येणे होय. या भावना तीव्र झाल्यास शिकणे नीट होत नाही. याऊलट, प्रसन्न वातावरण, शिक्षक-विद्यार्थी व विद्यार्थी-विद्यार्थी यांचे स्नेहपूर्ण संबंध, कृतिशील शिक्षणपद्धती, स्वयंशिक्षणाच्या आव्हानात्मक संधी अशांसारख्या गोष्टी शिकण्याची प्रक्रिया आनंदमय व सघन करीत असतात.

मेंदूमधील शिकण्याची प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी शारीरिक व बौद्धिक क्रिया, भावना व आकलन आणि विश्लेषक व सर्जनशील अशा बाबींचा योग्य मेळ घालावा लागतो.

मेंदूमधील शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया समजली, तर त्यानुसार शालेय वर्गांमधील शिकविण्याची पद्धत अधिक प्रभावी करता येते. तसेच प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना मेंदू विकासाच्या नैसर्गिक प्रक्रियांना साजेशा अशा शिकण्याच्या व्यवस्था व पद्धती प्राप्त झाल्या, तर त्यांचे शिकणेही सुकर होते. त्यामुळे विद्यार्थी शिकण्यासाठी स्वयंप्रेरितही होतात.

संदर्भ :

  • CERI, OECD, Understanding the Brain : The Birth of a Learning Science, 2007.
  • Rita, Smilkstein; Gunn, Angus and Richburg, Robert, Igniting Student Potential : Teaching with the Brain’s Natural Learning Process, 2007.
  • Rita, Smilkstein, Were Born to Learn : Using the Brain’s Natural Learning Process to Create Today’s Curriculum, 2011.
  • Sylwester, Robert, How to Explain a Brain, 2005.

समीक्षक : कविता साळुंके