मंक, वॉल्टर : ( १९ ऑक्टोबर १९१७ – ८ फेब्रुवारी २०१९ )
वॉल्टर मंक यांचा जन्म ऑस्ट्रियातील व्हिएन्ना शहरात झाला. वॉल्टर मंक यांचे बालपण व्हिएन्नात गेले. त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना बॅंकिंग व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्क येथील प्रिपरेटरी स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. बँकिंग विषयाऐवजी त्यांचा ओढा विज्ञानाकडे होता. बँकिगचे प्रशिक्षण घेता घेता त्यांनी कोलंबिया विद्यापिठात विज्ञानाचा अभ्यास सुरू केला. त्यांनी बँकिग क्षेत्रापासून फारकत घेतली आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नावाजलेल्या संस्थेत पदार्थ विज्ञानाचा अभ्यासक्रम निवडला. बी.एस्सी.च्या पदवीनंतर त्यांनी भू-भौतिकी (Geo-physics) विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. नंतर त्यांनी स्क्रिप्स इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (Scripps Institute of Oceanography ) येथे संशोधन करून कॅलिफोर्निया विद्यापिठाची पीएच्.डी. मिळवली.
वॉल्टर मंक यांनी १९३९ साली अमेरिकेचे नागरिकत्व स्विकारले. हा काळ द्वितीय जागतिक महायुद्धाचा होता. त्यांनी सैन्यभरतीसाठी नाव नोंदविले. त्यांनी युद्ध काळात अमेरिकन आरमाराच्या रेडिओ व साउंड प्रयोगशाळेत संशोधन केले. या काळात स्क्रिप्स इन्स्टिट्यूटमधील इतर संशोधकांच्या मदतीने महासागरातील भरती-ओहोटी व लाटांचा त्यानी सखोल अभ्यास केला. या संशोधनाचा उपयोग करून दोस्त सैन्याने उत्तर आफ्रिकेचा किनारा, प्रशांत महासागरातील बेटे तसेच नॉर्मंडीत चढाई केली.
द्वितीय महायुद्धानंतरच्या काळात अमेरिका दक्षिण प्रशांत महासागरात अण्वस्त्रांची चांचणी करत असे. त्या काळात मंक यांनी बिकिनी कंकण-द्वीपाच्या परिसरातील सागरी प्रवाह, पाण्यातील देवाण-घेवाण,अभिसरण यांवर उपयुक्त संशोधन केले.
स्वेद्र्प तसेच स्टोमेल या शास्त्रज्ञांनी महासागरातील पाण्याच्या परिसंचरणाचा गणितीय अभ्यास करून मंक यांनी संशोधनपर लेख प्रकाशित केला. वार्यामुळे महासागरातील पाण्याचे परिसंचरण (circulation) कसे होते हे अधिक शास्त्रशुद्धपणे दाखवून दिले. दक्षिण गोलार्धात समुद्रतळाची संरचना वेगळी असल्यामुळे तेथील परिसंचरण उत्तर गोलार्धाहून वेगळ्या तत्त्वांवर घडते असे त्यांनी दाखवून दिले. या संशोधनातून आता वात निर्मित वलयांचा (Wind-driven Gyres) अभ्यास केला जातो.
मंक यांनी पृथ्वीच्या अक्ष फिरण्यामुळे होणार्या डगमगण्यावर (Wobble of Earth’s axis during Rotation) संशोधन केले. सागरातील प्रवाह आणि भूस्तर यांमधील संवेगाची देवाण-घेवाण तसेच सागरातील पाणी आणि ध्रुवीय प्रदेशातील बर्फ यांचा विनिमय अशा भू-भौतिक घडामोडींचा डगमगण्याशी असलेला संबंध दाखवून दिला.
अटलांटिक महासागरातील गल्फ स्ट्रीम या प्रवाहावर त्यांनी संशोधन केले. सागरातील प्रवाहांचा ग्रहमालीय/ग्रहीय घूर्णतेवर (Planetary Vorticity) होणारा नकारात्मक प्रभाव दाखवून दिला.
पृथ्वीच्या प्रावरणाचे नमुने मिळविण्यासाठी मोहोल प्रकल्प (Project Mohole) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची कल्पना त्यांनी मांडली. त्यांच्या या अपूर्ण प्रकल्पामधून विकसित केलेले तंत्रज्ञान खोल समुद्रातून खनिज तेलाचे उत्पादन करण्यास उपयोगी ठरले.
दक्षिण गोलार्धातील वादळांत निर्माण झालेल्या लाटा थेट उत्तर ध्रुवीय प्रदेशापर्यंत पोहोचतात असे त्यांच्या संशोधनातून सिद्ध झाले. लाटांचा अंदाज करण्याचे विज्ञान (Surf-forecasting) यातून विकसित झाले.
त्यांनी पुन्हा भरती-ओहोटीवर संशोधन केले, तर पुढे त्यांनी कार्ल वुंश यांच्या सहकार्याने ध्वनिकीय छेदचित्रण (Acoustic Tomography) तंत्रज्ञान विकसित केले. या संशोधनाची परिणिती पाण्यातून होणारा जगास वेढा घालणारा ध्वनीप्रवास (Sound Heard Around the World) या प्रयोगात झाला. हिंदी महासागरातील हर्ड बेटा जवळून पाण्यातून पाठविलेल्या ध्वनिलहरी अमेरिकेच्या पूर्व तसेच पश्चिम किनारपट्टीपर्यंत या प्रयोगातून पोहोचल्या. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आज सागरातील प्रवाह आणि तापमान यांचा अभ्यास केला. मंक यांचे संशोधन भरती-ओहोटी आणि सागराच्या विविध स्तरांतील पाण्याचे मिश्रण या विषयावर होते.
भौतिकशास्त्र, भू-भौतिकशास्त्र, गणित तसेच सांख्यिकी या विषयांवर मंक यांचे विशेष प्रभुत्व होते. आठ दशकांच्या काळात त्यांनी समुद्रविज्ञानाची अनेक दालने पुढील पिढीच्या संशोधकांना उघडून दिली.
त्यांनी १९५६ साली अमेरिकेत ला जोल्ला येथे स्थापन केलेली इन्स्टिट्यूट ऑफ जिओ फिजिक्स एंड प्लेनेटरी फिजिक्स (Institute of Geophysics and Planetary Physics) ही संस्था जगातील मान्यवर संस्था म्हणून गणली जाते. त्यांना आयुष्यात अनेक बहुमान मिळाले.
संदर्भ :
- https://www.britannica.com/biography/Walter-Munk
- scrippsscholars.ucsd.edu/wmunk
समीक्षक : मोहन मद्वाण्णा