नंदा, के. के. : ( १ जानेवारी १९१७ – १३ डिसेंबर १९८३ ) 

आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन शैक्षणिक क्षेत्रात सतत उच्च श्रेणी प्राप्त करणारे कृष्णन कुमार नंदा यांची उच्च शैक्षणिक कारकिर्द वनस्पतीशास्त्र विभाग, दिल्ली विद्यापीठापासून सुरू झाली. याच विद्यापीठामधून त्यांनी एम. एस्सी., प्लॅन्ट फिजिऑलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर पीएच्.डी. प्राप्त केली आणि वनस्पतीशास्त्र विभागात व्याख्याता म्हणून रुजू झाले. नंदा प्लॅन्ट फिजिऑलॉजीमधील उच्च संशोधनासाठी ‘स्मिथ संशोधक’ म्हणून कॅलिफोर्निया विद्यापीठात रुजू झाले. विदेशी विद्यार्थ्यांसाठी अपवाद म्हणून त्यांना संशोधनासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा मिळाली आणि येथेच त्यांना ऑक्सिन या संप्रेरकावर संशोधन करण्यासाठी एफ.सी. वेन्ट यांचे मार्गदर्शन मिळाले. आपल्या अमेरिकेमधील वास्तव्यात त्यांनी वनस्पतींची वाढ आणि तिची अवयव विकास प्रणाली त्यावर होणारा दिवस रात्र, काळोख आणि विविध संप्रेरकांचा परिणाम यांचा सविस्तर अभ्यास केला. संप्रेरकावरील उच्च संशोधनाच्या आधारे त्यांना कॉलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी मिळाली असतानाही त्यांनी मायदेशी परत येण्याचा निर्णय घेऊन १९५६ साली वनस्पतीशास्त्र विभाग, दिल्ली विद्यापीठ येथे व्याख्याता म्हणून परत आपल्या मूळ जागी रुजू झाले आणि येथे चार वर्ष अध्यापन आणि संशोधनाचे कार्य करुन वरिष्ठ संशोधक म्हणून भारतीय वन संस्था (Indian Forest Research Institute) डेहराडून येथे रुजू झाले. १९६३ पर्यंत या पदावर संशोधन करून ते भारतीय कृषी अनुसंधान संस्था, (Indiana Agricultural Research Institute) नवी दिल्ली येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून विशेष आमंत्रणावरुन गेले. याच कालावधीत त्यांची पंजाब विद्यापीठ चंडीगढ येथे प्लॅन्ट फिजिऑलॉजी या विषयात प्राध्यापक म्हणून निवड झाली. भारतामधील एखाद्या विद्यापीठात एका विशेष विषयासाठी निर्माण केलेली ही पहिलीच जागा होती आणि ती प्राप्त करण्याचा बहुमान के. के. नंदा यांना त्याच्या संप्रेरक क्षेत्रामधील बहुमोल संशोधनामुळे प्राप्त झाला होता. वनस्पतीशास्त्र विभाग, पंजाब विद्यापीठामध्ये नंदा यांनी १९६३ ते १९७९ या कालावधीत ऑक्सिन्स, (Auxin) जिबरेलीक ॲसिड (Gibberllic Acid) या संप्रेरकावर बहुमोल संशोधन करुन त्याला आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालीकामध्ये प्रसिद्धी दिली. वनस्पतीच्या वाढ कळीमध्ये (Growth bud) संप्रेरकाच्या सहाय्याने होणारे बदल आणि त्यामध्ये विकारांचा सहभाग हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य गाभा होता. वनस्पतींच्या मुळांची संप्रेरकांच्या नियंत्रणाखाली होणारी वाढ यावरही त्यांनी विपुल संशोधन केले. त्यांच्या अनेक संशोधन पत्रिका Physiologia Plantarum आणि Planta या जगप्रसिद्ध संशोधन पत्रिकामध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. वनस्पतीशास्त्रामधील संशोधनास चालना मिळावी म्हणून त्यांनी भारतीय वनस्पतीशास्त्र संस्थेस (Indian Botanical Society) बिरबल सहानी सुवर्णपदक स्वखर्चाने देण्याची व्यवस्था केली. प्रतिवर्षी हे पदक उत्कृष्ट तरूण संशोधकास संस्थेच्या वार्षिक संमेलनात सन्मानपूर्वक देण्यात येते. नंदा यांनी २०० च्या वर संशोधन पत्रिका प्रसिद्ध केल्या. Indian Society of Plant Physiology या १९५८ साली स्थापन झालेल्या संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. पंजाब विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात प्रतिवर्षी त्यांच्या स्मृती निमित्त व्याख्यान ठेवले जाते. याच कार्यक्रमात भारतामधील Plant Physiology या विषयात संशोधन करणार्‍या एका उत्कृष्ट संशोधकाचा के. के. नंदा स्मृतीचिन्ह देऊन गौरव केला जातो.

संदर्भ :

  • Nanda K.K. and Jain M. K. – ‘Utilization of Sugars and Starch as Carbon sources in the rooting of etiolated stem segments of Populous Nigra’. New Phytol. (1972), 71,825-828.
  • Nanda, K., Krishnamoorthy H. N., Anuradha T. A. and Lal, Krishan – ‘Floral Induction by Gibberellic Acid in Impatiens balsamina, a Qualitative Short Day Plant’. Planta (1967), 76,367-370.
  • Rupa S. Dhawan and K. K. Nanda ‘Stimulation of Root Formation on Impatiens balsamina cutting by Coumarin and Associated Biochemical Changes’. Biologia Plantarum (1982), 24(3):177-182.

 मीक्षक : शरद चाफेकर