शोअर, सर जॉन : ( ८ ऑक्टोबर १७५१ – १४ फेबुवारी १८३४ ). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १७९३ ते १७९८ ह्या काळातील गव्हर्नर जनरल. ह्याचा जन्म लंडनमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तो हॅरो येथे शिक्षण घेऊन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत लेखनिक म्हणून मे १७६९ मध्ये कोलकात्यात रूजू झाला. १७८७ ते १७८९ या काळात कंपनी सरकारच्या सर्वोच्च मंडळाचा तो वरिष्ठ सदस्य बनला. गव्हर्नर जनरल कॉर्नवॉलिसने १७९३ मध्ये बंगालमध्ये कायमधाऱ्याची पद्धती चालू केली; परंतु या धोरणामुळे त्याच्यावर बरीच टीका झाली आणि तो इंग्लंडला परतला. नंतर शोअरची गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली (१७९३).
शोअरने एतद्देशीय राज्यांच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप न करण्याचे धोरण अंमलात आणले. या निर्हस्तक्षेपाच्या धोरणानुसार त्याने निजामास मराठ्यांविरुद्ध मदत नाकारली आणि खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला (१७९५). पुढे अयोध्येचा नबाब असफउद्दौला याच्या मृत्यूनंतर (१७९७) शोअरने त्याचा मुलगा वजीरअली यास नबाब म्हणून प्रथम मान्यता दिली; पण नंतर हा निर्णय बदलून मृत नबाबाचा भाऊ सादतअली यास गादीवर बसविले. त्या मोबदल्यात नबाबाने वार्षिक खंडणी कबूल करून अलाहाबादचा किल्ला कंपनीला दिला.
शोअरला उर्दू, फार्सी, अरबी, लॅटिन इ. भाषांचे ज्ञान होते. मूलत: तो एक सनदी अधिकारी होता. त्याच्या भारतातील कारकिर्दीच्या अखेरीस इंग्लंडच्या राजाने त्याला उमराव केले. तत्पूर्वी बंगालमधील काही इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी इ. स. १७९५ मध्ये संघर्ष सुरू केला आणि कामावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली, तेव्हा त्याने काही सवलती दिल्या; परंतु हे प्रकरण हाताळण्यात त्यास अपयश आले, म्हणून त्याला इंग्लंडला परतावे लागले.
लंडन येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ :
- Mahajan, V. D. British Rule in India and After, Delhi, 1969.
- Morris, Henry, The Governors-General of British India, Vol. 1, Delhi, 1984.