कदम, राधाकृष्ण राजारामबापू  : ( १५ फेब्रुवारी १९२० – १८ जानेवारी २०१६ ). महाराष्ट्रातील प्रसिद्ध गोंधळ महर्षी. ते पारंपरिक गोंधळी म्हणून परिचित होते. त्यांनी गोंधळ या शक्तिदेवतेच्या विधिनाट्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक प्राप्त करून दिला आहे. त्यामुळे त्यांना गोंधळ महर्षी नामाभिधानाने संबोधित करण्यात येते. राधाकृष्ण कदम यांचे नाव राधाकृष्ण राजारामबापू कदम. त्यांचा जन्म परभणी येथे झाला. राधाकृष्ण यांना गोंधळाचा वारसा आपले वडील राजारामबापू, आजोबा रामचंद्रबापू यांच्या कडून प्राप्त झाला. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षांपासून राजारामबापू यांच्या कडक शिस्तीत त्यांचे गोंधळाचे शिक्षण सुरू झाले. यामध्ये संबळ वाजविणे, तुणतुणे वाजविणे तसेच विविध कथा जसे पांडवप्रताप, हरिविजय, देवीभागवत, राजा हरिश्चंद्राचे आख्यान, स्कंद पुराण, शिवलीलामृत, जांभूळ आख्यान, कार्तिक पुराण, नवनाथ सार, बहीण – भावाची कहाणी अशा विविध पुराणे व कथांचे पारायण राधाकृष्ण यांनी राजबापूंच्या मार्गदर्शनाखाली केले. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षांपासून पिता राजारामबापू यांच्या सोबत कार्यक्रमास सुरुवात केली. पंचवीस हजारापेक्षा जास्त कार्यक्रमांची नोंद त्यांच्या नावावर झाली आहे.

गोंधळ सादर करण्याच्या त्यांच्या शैलीला कदमराई गोंधळ अथवा हरदासी गोंधळ असे संबोधले जाते. पिता राजारामबापूंच्या पश्चात राधाकृष्ण हे आपल्या आंतरराष्ट्रीय कलासंचाचे प्रमुख बनले. त्यांनी आपल्या पिता बापूंच्या पावलावर पाऊल ठेवत गोंधळाची परंपरा पुढे चालू ठेवली. त्यांचे सादरीकरणात त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण पोशाख म्हणजे लांबलचक अंगरखा, मुंडासे (पागोटे), झुपकेदार मिशा याला जोड त्यांच्या पहाडी आवाजाची असे. राधाकृष्ण यांनी सुरुवातीच्या काळात राजारामबापूंसोबत गोंधळाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. १९८१ साली मुंबई येथील छबिलदास सभागृहात झालेल्या गोंधळाच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर चार पिढ्यांनी मिळून सादरीकरण केले होते. या कार्यक्रमापासून त्यांचा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवरील कला कारकिर्दीला सुरुवात झाली. १९८२ साली पंढरपूर येथे आयोजित भक्ती संगीत महोत्सवाचे उद्घाटनाचा मान या पिता – पुत्रांना मिळाला होता.

पुणे आकाशवाणी, औरंगाबाद आकाशवाणी, जळगाव आकाशवाणी तसेच दूरदर्शन वरील कार्यक्रमांनी अख्खा महाराष्ट्र त्यांनी दणाणून टाकला होता. तसेच राष्ट्रीय स्तरावर भोपाळ, जयपूर, लखनऊ, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगळूरू, हैद्राबाद आणि पणजी असे भारतातील मोठमोठ्या शहरातून कार्यक्रम सादर केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर १९८६ मध्ये पॅरिस (फ्रान्स) तर हॉलंड, युरोप मध्ये जवळपास दोन महिने त्यांनी गोंधळाचे सादरीकरण केले. १९८९ साली मुंबई येथे आयोजित अपना उत्सव या राष्ट्रीय उत्सवात सादरीकरण केल्याबद्दल भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांचा गौरव केला होता. १९९५ ते २०१० या प्रदीर्घ कालखंडात आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये राधाकृष्ण कदम यांनी वेळोवेळी गोंधळाचे सादरीकरण केले. मुंबई विद्यापीठ आणि लोकसाहित्य संशोधन मंडळ औरंगाबाद, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, वेरूळ – अंजिठा महोत्सव यांसारख्या अनेक संस्थांच्या महोत्सवात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलावंतासोबत त्यांनी गोंधळाचे सादरीकरण केले आहे. परभणी आकाशवाणी उद्घाटन प्रसंगी राधाकृष्ण कदम यांनी पारंपरिक गोंधळाचे सादरीकरण केले. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांचे विशेष कौतुक केले होते. सन १९८६ फ्रान्स मध्ये भारतीय उच्च आयुक्त आय. एच. लतीफ यांनी भारत सरकारच्या वतीने त्यांचा खास सत्कार सोहळा केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर सफल सादरीकरण केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय दौऱ्यावरून आल्यावर मुंबई येथील तत्कालीन महापौर छगन भुजबळ यांनी मुंबई शहराचे प्रथम नागरिक म्हणून पिता – पुत्र राजारामबापू आणि राधाकृष्ण यांचा सत्कार केला होता. तसेच सन २००१ मध्ये औरंगाबाद येथे स्व.शंकरराव चव्हाण, स्व.जवाहरलालजी दर्डा व स्व.बाळासाहेब पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘राष्ट्रीय लोककला महोत्सवा ‘ मध्ये राधाकृष्ण कदम यांचा विशेष गौरव करण्यात आला होता.

राधाकृष्ण कदम यांनी पारंपरिक गोंधळाच्या सादरीकणासोबतच गोंधळ या लोककलांच्या सहाय्याने समाज प्रबोधन व जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. समाजातील अनेक ज्वलंत प्रश्न जसे दारूबंदी, हुंडाबंदी, स्त्रीभ्रूण हत्या अशा अनेक विषयावर जनजागृती व समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन शासनाच्या एम. एस. ए. सी. ने तसेच भारत सरकारच्या नाको ने एच.आय.व्ही निर्मुलनासाठी जनजागृती म्हणून गोंधळ सम्राट राजारामबापू कदम आंतरराष्ट्रीय कलासंचाची निवड करण्यात आली. याचाच भाग म्हणून नाशिक, परभणी, नांदेड येथे एच.आय.व्ही निर्मुलनासाठी जनजागृतीचे जवळपास शंभर कार्यक्रम पार पाडले. पारंपरिक लोककलेचे जतन व संवर्धन व्हावे म्हणून पारंपरिक गोंधळ कार्यशाळेचे आयोजनही त्यांच्यामार्फत करण्यात आले होते. सन २००७ – २००८ मध्ये दक्षिण मध्य सांस्कृतिक क्षेत्र नागपूरच्या वतीने परभणी येथे गुरु – शिष्य परंपरेचे आयोजन करून राधाकृष्ण कदम यांनी शंभर विद्यार्थ्यांना गोंधळ लोककलेचे प्रशिक्षण दिले. लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ येथे प्रकाश खांडगे आणि राधाकृष्ण कदम यांनी विद्यार्थ्यांना गोंधळ लोककलेचे मार्गदर्शन केले आहे.

राधाकृष्ण कदम यांना अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अपना उत्सव मुंबईचे सन्मानपत्र (१९९९), महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२००९), मराठवाडा कला तपस्वी पुरस्कार (२०११), भारत सरकारचा संगीत नाटक अकादमीचा टागोर सन्मान पुरस्कार (२०१२), तेलंगणातील हैद्राबाद येथील लोक आलाप महोत्सवाचा विशेष सन्मान, गोदातीर समाचारचा परभणी भूषण पुरस्कार (२०१५) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.

परभणी येथे त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले .

संदर्भ : क्षेत्रसंशोधन