पृष्ठभागाची मुख्यत: घर्षणाद्वारे झीज घडवून आणणाऱ्या क्रियेला अपघर्षण म्हणतात. वाळू, रेती, खडकाचा चुरा किंवा इतर डबरयुक्त जलप्रवाह, हिमनदी, वारा, सागरी लाटा यांच्यामुळे अशी झीज होते. वाऱ्यातील रेती, वाळू तसेच हिमनदी व हिमस्तर यांतील गोठलेली डबर यांच्याद्वारे अपघर्षण होते. बर्फाच्या तळातील गोठलेला डबर किंवा बर्फ वितळून बनलेल्या उच्च दाबाच्या पाण्यातील डबर आधारशिलेवरून किंवा अन्य पृष्ठभागावरून झपाट्याने वाहत गेल्याने त्याची घर्षणाने झीज व संनिघर्षण (घासले, तासले व खरवडले जाण्याची क्रिया) होते. यामुळे त्या पृष्ठभागावर सूक्ष्म चरे (ओरखडे) व रेखांकने निर्माण होतात. अगदी गुळगुळीत पृष्ठभाग हा जलदपणे झालेल्या झिजेचा पुरावा आहे. डबरातील दगडगोटेही झिजून सपाट व रेखांकित होतात. सूक्ष्म डबर घासकागदाप्रमाणे कार्य करते. त्यामुळे खडकाचा पृष्ठभाग गुळगुळीत व झिलईदार होतो. रांजण खळगे किंवा कुंभगर्त हे अपघर्षणाचे एक रूप आहे. अपघर्षण प्रभावी होण्यासाठी बर्फाच्या तळात डबर चांगला एकत्रित झालेला असावा लागतो किंवा बर्फ वितळून बनलेल्या उच्च दाबाच्या पाण्यात डबराचे प्रमाण जास्त असावे लागते. तसेच त्यासाठी तीक्ष्ण कडा असलेला अणकुचीदार व पृष्ठभागातील खडकांपेक्षा अधिक कठीण डबर, तसेच तळातील बर्फाचा उच्च दाब आणि अपघर्षणाने निर्माण झालेला डबर हलविला जाण्याचा प्रभावी मार्ग असावा लागतो. या सर्व घटकांमुळे अपघर्षणाची क्रिया अखंडपणे चालू राहते. असा अपघर्षणजन्य डबर हिमनदीच्या दुधी प्रवाहाच्या अनस्रोते (खालच्या दिशेतील) भागात प्रचंड प्रमाणात निर्माण होतो. हा प्रवाह मोठ्या प्रमाणातील सूक्ष्म डबरामुळे निळसर किंवा निळसर हिरवा दिसतो. या सूक्ष्म डबराला ‘हिमनदीय दूध’ वा ‘खडकाचे पीठ’ (चूर्ण) म्हणतात.
वेगवेगळ्या प्रदेशातील अपघर्षणाची गती अगदी भिन्न असते. उदा., उत्तर ग्रीनलंडमधील शक्तिशाली हिमनद्या या आल्प्स पर्वतातील मंदगती हिमनद्यांपेक्षा अपघर्षणाच्या बाबतीत तीसपट प्रभावी आहेत. तीव्र उतार असलेल्या दरीत जास्तीत जास्त अपघर्षण होते. खंडावरचे हिमस्तर मंदपणे हलतात. त्यांच्यामुळे भूपृष्ठावरची मृदा व गौण स्वरूपाचा खडबडीतपणा सावकाशपणे निघून जाऊन पृष्ठभाग गुळगुळीत होतो.
वाऱ्यातील रेती व वाळू यांच्या झोतामुळेही अपघर्षण होते. वाळवंटातील आधारशिलेचे स्वरूप व पृष्ठभाग या अपघर्षणाने आगळेवेगळे झालेले दिसतात. रेती व वाळूयुक्त वाऱ्यातून जाणाऱ्या मोटारगाडीची वातरोधक काच खरखरीत होऊ शकते व मोटारगाडीचा रंग निघून जाऊ शकतो. उघड्या खडकावरील रेतीयुक्त वाऱ्याचा परिणाम वेचकपणे होतो. उदा., खडकातील आधारद्रव्य त्यामुळे निघून जाऊन त्यातील दगडगोटे, जीवाश्म वर आलेले दिसतात. भिन्न स्वरूपाचे व गुणधर्माचे सांधले गेलेले खडक अशा वाऱ्याने कुरतडले जाऊन त्यांवर मधमाश्यांच्या पोळ्यासारखे कोरीवकाम झालेले दिसते. एकाआड एक मऊ व कठीण खडकांतील मऊ थर या वाऱ्याने खरवडला जाऊन अधिक प्रमाणात निघून जातात व तेथे खोल चर तयार होतात. कमी झीज होणारे कठीण थर उंचवट्यांच्या रूपात मागे राहतात. अशा खडकांवर वारा एकाच दिशेत व एकाच गतीने वाहत राहिल्यास अशाच प्रकारची झीज होते. यातून भूछत्रखडकासारखी वैशिष्ट्ये तयार होतात. वाळवंटातील उंचवटे, खडक, दूरध्वनीचे खांब यांचे खालचे भाग रेतीयुक्त वाऱ्याने कापले जात असतात. तसेच आधारशिला तिच्या संरचनेनुसार गुळगुळीत होते. तिच्यावर खाचखळगे तयार होतात किंवा फरसबंदीसारखा वाळवंटी पृष्ठभाग तयार होतो. दगडगोटे झिजून त्यांना पैलू पडू शकतात व वैचित्र्यपूर्ण आकाराचे दगड तयार होतात. तसेच वाळूचे गोल व बाजरीसारख्या लहान कणांत रूपांतर होते. अभ्रकाचा चुरा होऊन ते निघून जाते. या लक्षणांवरून प्राचीन काळी साचलेले वालुकाश्म पाण्याखाली साचलेत की, वाळवंटात साचलेत हे कळू शकते.
सागरी लाटांमुळे, विशेषत: किनारी भागांत, झीज व भर होत असते. याला लाटांच्या पाण्यातील रेती व वाळूमुळे होणारे अपघर्षण कारणीभूत होते. या अपघर्षणामुळे किनाऱ्याचे स्वरूप सतत बदलत असते. परिणामी किनाऱ्यावर अनेक भूमिरूपे, तरंगचिन्हे, रोधक भित्ती, वाळूचे दांडे निर्माण होतात. याबाबतीत वारा व भरती-ओहोटी यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या लाटा महत्त्वाच्या आहेत.
समीक्षक : वसंत चौधरी