कोनज्याकु मोनोगातारी : कोनज्याकु मोनोगातारी हा जपानी भाषेतला एक कथासंग्रह आहे. याच्या लेखकाबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. काही लोकांच्या मते उजिदाइनागोन मोनोगातारीचा लेखक मिनामोतो नो ताकाकुनी याने या कथांचे संकलन केले असावे. तर काही जणांच्या मते बौद्ध भिक्षु तोबाने सोज्यो हा लेखक असावा. काही अभ्यासकांना वाटते की त्या काळात क्योतो किंवा नाराच्या जवळपास राहणार्या बौद्ध भिक्षुने हेइआन कालखंडाच्या शेवटी लिहिले असावे. परंतु अशी कोणतीही शक्यता दर्शविणारा पुरावा आजपर्यंत उपलब्ध न झाल्याने लेखक, संकलकाबद्दल ठोस माहिती काहीही सांगता येत नाही.
११ व्या शतकाच्या मध्यापर्यंत हेइआन कालखंडांतील राजदरबाराच्या उत्कर्षाचा काळ होता असे म्हटले जाते. लष्करशाहीने जरी राजकीय सत्ता बळकाविली असली तरी संस्कृतीचा प्रमुख म्हणून सम्राटाचेच नाव घेतले जात होते. १२ व्या शतकामध्ये साहित्याच्या क्षेत्रात वेगळेपणा दिसून येऊ लागला. १२ व्या शतकाच्या सुरुवातीस लिहिलेल्या कोनज्याकु मोनोगातारीमध्ये फक्त जपानच्या नव्हे तर चीन आणि भारतामधल्या कथा पण आहेत. ह्या कथांमध्ये केलेले वर्णन हे सम्राट आणि राजदरबाराच्या वर्णनपेक्षा वेगळे असल्याने वाचकांना आकृष्ट करते. प्रत्येक कथेची सुरुवात आत्तापासून खूप पूर्वी अशी होते. चीनी भाषेतल्यां अक्षरांप्रमाणे 今は昔 असे लिहिले जाते आणि त्याचा उच्चार कोनज्याकु होतो. म्हणून ह्या साहित्यकृतीचे नाव कोनज्याकु मोनोगातारिश्यु असे आहे. परंतु पूर्ण नावाचा वापर न करता कोनज्याकु मोनोगातारी असे वापरण्याची पद्धत आहे.
ह्या कथांमधून प्राण्यांचे मनुष्य धर्माशी असेलेले साधर्म्य दाखवले गेले आहे. ह्या कथा ३१ खंडांमध्ये विभागलेल्या होत्या. आता मात्र फक्त २८ खंड उपलब्ध आहेत. पहिल्या ५ खंडांमध्ये तेनजिकु म्हणजे भारतामधल्या गोष्टींचा समावेश आहे. पुढच्या ५ खंडांमध्ये शिनतान या चीनमधल्या गोष्टींचा समावेश आहे. उरलेल्या खंडांमध्ये होनच्यो म्हणजेच जपानमधील गोष्टींचा समावेश आहे. मोनोगातारीमध्ये बौद्धधर्माचा भारतापासून सुरू झालेला प्रवास जपानपर्यंत कसा गेला ह्याचा मार्ग दाखविला आहे. भारतातून चीनमध्ये गेलेला बौद्धधर्म चीनमध्ये स्वीकारला गेला. जपानने नारा कालखंडामध्ये बौद्ध भिक्षु आणि विद्यार्थ्यांना चीनमध्ये पाठवले. त्यांनी चीन मधून कला, संस्कृती बरोबरच बौद्ध धर्म पण जपानमध्ये आणला. जपानने पूर्वापार चालत आलेल्या शिंतो धर्माबरोबर बौद्ध धर्माचा पण स्वीकार केला. मोनोगातारीमध्ये समाविष्ट केलेल्या बहुतांशी कथा एकतर बौद्धधर्मातल्या आहेत किंवा निधर्मी आहेत. मात्र जपानच्या पूर्वापार असलेल्या शिंतो धर्माच्या कथा अथवा शिंतोचा उल्लेख फारसा दिसत नाही. ह्या कथांमधून वाईट काम केलेल्याला शिक्षा आणि चांगल्या कामाचे बक्षीस अशी नीतीतत्वे सांगितली आहेत. धार्मिक कथांमधून बौद्ध धर्माबद्दल सखोल अर्थबोध आणि जपानी लोकांसाठी असलेले बौद्ध धर्माचे महत्त्व हयाबद्दल संगितले आहे. सर्वसामान्य लोकांना कळतील अशा ह्या गोष्टी सोप्या शब्दात लिहिल्या आहेत. निधर्मी गोष्टी वाचून वाचकांची करमणूक होते. मानवी आणि अमानवी गोष्टींमधील द्वंद्व हा विषय यात प्रामुख्याने दिसून येतो. त्या काळातील व्यक्तिरेखा उदाहरणार्थ योद्धे, विद्वान, बौद्ध भिक्षु, शेतकरी, भिकारी, मासेमारी करणारे इत्यादींचा मानवी गटामध्ये समावेश असून अमानवी गटामध्ये राक्षस आणि मोठ्या नाकाचे तेनगु ह्यांचा समावेश आहे. मोनोगातारीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये येणारे प्राणी. विचार करणे, बोलणे, संवेदना होणे अशांसारख्या माणसाला ज्ञात असलेल्या अथवा आकलन होणार्या गोष्टींचे ज्ञान प्राण्यांनाही दिले आहे. प्राण्यांना अशी स्वभाव वैशिष्टे दिल्यामुळे त्यांच्या तर्फे वाचकांपर्यंत बोधपर गोष्टी पोहचविण्यात लेखक नक्कीच यशस्वी झाला आहे. यामध्ये विशिष्ट्य प्राण्याच्या विशिष्ट्य स्वभावधर्माचा वापर केला गेला आहे. तो स्वभावधर्म सर्वांना माहिती असल्याने तात्पर्य कळणे सोपे जाते.
कोनज्याकु मोनोगातारीमध्ये लिहीलेल्या गोष्टी इतर संकलित पुस्तकांमध्ये पण आल्या आहेत. उदाहरणार्थ भूतांच्या गोष्टी. ह्या सर्व गोष्टी अनेक पिढ्यांकडून पुढील पिढ्यांकडे अनेकवेळा तोंडी सांगितल्या गेल्या आहेत. तसेच सध्याच्या लेखकांनी सुद्धा ह्या गोष्टींचा वापर केला आहे. प्रसिद्ध लेखक आकुतागावा र्यूनोसुके यांच्या ‘बांबूचे बेट’ ह्या कथेवर बेतलेल्या राशोमोन ह्या चित्रपटाची कथा कोनज्याकु मोनोगातारीमधून घेतली गेली आहे. कोनज्याकु मोनोगातारीची जुन्या प्रतीमधली अस्तित्वात असलेली प्रत सुझुका हस्तलिखित आहे. १९९६ मध्ये तिला राष्ट्रीय वारसा म्हणून दर्जा देण्यात आला आहे. कामाकुरा कालखंडामध्ये शिंतो गुरू त्सुरुताने सुझुका ह्याने ती हस्तप्रत तयार केली. कोनज्याकु मोनोगातारिचे इंग्रजी मध्ये Tales of now and then, Tales of ages ago, Tales of now past अशा नावांनी अनुवाद झाला आहे.
संदर्भ :
समीक्षक : निसिम बेडेकर