फडकुले, निर्मलकुमार जिनदास : (१६ नोव्हेंबर १९२८, २८ जुलै २००६). विचारवंत, शैलीदार वक्ते, ललितलेखक आणि समीक्षक. निर्मलकुमार फडकुले यांना वाणी आणि लेखणीचा वारसा घरातूनच मिळाला होता. वडील पंडित जिनदासशास्त्री फडकुले हे संस्कृततज्ज्ञ होते. धर्म, साहित्य आणि तत्त्वज्ञानावरील त्यांचे चाळीसहून अधिक ग्रंथ प्रकाशित आहेत. निर्मलकुमार फडकुले यांचे आजोबा पार्श्वनाथ गोपाळ फडकुले हे देखील संस्कृत पंडित होते. त्यांनीही ग्रंथलेखन केले आहे.
निर्मलकुमार फडकुले यांचे प्राथमिक शिक्षण सोलापुरातील जैन पाठशाळेत झाले. माध्यमिक शिक्षण त्यांनी मॉडेल इंग्लिश स्कूल व हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथे घेतले. त्यांच्यावर शालेय वयातच संस्कृतच्या अध्ययनाचे, साहित्याचे आणि वक्तृत्व गुणांचे संस्कार झाले. त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्यातील वक्ता आणि साहित्याचा अभ्यासक घडला. त्याविषयीच्या आठवणींची हृद्य नोंद त्यांच्या ललित लेखनांतून पाहायला मिळते. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातूनते बी. ए. झाले आणि सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून त्यांनी एम. ए. चे शिक्षण घेतले. १९७०साली त्यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. पदवी संपादन केली. लोकहितवादी: काल आणि कर्तृत्व’ हा त्यांच्या शोधप्रबंधाचा विषय होता. मराठीतील नामवंत कवी वि. म. कुलकर्णी हे त्यांचे संशोधन मार्गदर्शक होते. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना अनेक थोर विचारवंतांच्या व्याख्यानांचा श्रवणानंद घेण्याची संधी लाभली. आचार्य भागवत, बॅरिस्टर नाथ पै, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, गं. बा. सरदार, रा. श्री. जोग, पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या विचारांचे व प्रतिपादनशैलीचे संस्कार या काळात त्यांच्यावर झाले. समाजशास्त्राचे प्राध्यापक आणि राजर्षी शाहू या नवखंडात्मक ग्रंथाचे संपादक विलास संगवे (कोल्हापूर) यांच्या भगिनी मंदाकिनी या त्यांच्या पत्नी होत.
फडकुले यांनी नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून एक वर्ष कार्य केले आणि १९५६ पासून सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयात मराठी भाषा आणि साहित्याचे अध्यापनकार्य केले. विभागप्रमुखपदाची जबाबदारीही सांभाळली. ३२ वर्षांच्या सेवेनंतर १९८९ साली ते सेवानिवृत्त झाले. प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना आणि निवृत्तीनंतरही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच गोमंतक, बंगळूरू, धारवाड, कारवार, इंदूर, जयपूर, मीरत, बडोदे, दिल्ली, कोलकाता येथील उल्लेखनीय अशा व्यासपीठांवरून आपले विचार मांडले. केवळ मराठीतूनच नव्हे तर हिंदी भाषेतूनही त्यांनी अनेक व्याख्याने दिली. सामान्य श्रोत्यांपासून ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांपर्यंत अनेक जाणकारांनी त्यांच्या शैलीदार आणि विचारसंपन्न वक्तृत्वाला पसंती दिली. मराठी वक्तृत्वाची एक ठसठशीत अशी मुद्रा त्यांनी श्रोत्यांच्या मनावर उमटवली. भावगर्भता आणि विचारप्रवणता यांचे अनोखे मिश्रण त्यांच्या वक्तृत्वात असे. विचार हा वक्तृत्वाचा आत्मा असतो. शब्द हे शरीर असते. तेही शोभिवंत आणि सुंदर असावे यासाठी साधना करावी लागते, ही प्रगल्भ जाणीव त्यांच्या विचारांनी ओथंबलेल्या उत्कृष्ट व्याख्यानांतून होत असे. त्यांच्या वक्तृत्वकळेला त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचा, रसिकतेचा, विद्वत्तेचा स्पर्श असायचा. त्यात लय असायची, नाट्य असायचे, प्रसंगी वाणीला आलेला अभिनिवेशाचा मोहोर असायचा. आवाजात मधुर संगीत असायचे. त्यात मन:चक्षूसमोर चित्र उभे करण्याचे सामर्थ्य असायचे. त्यांच्या प्रसन्न वाणीला प्रबोधनाची धार असायची. ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत, आगरकरांपासून सावरकरांपर्यंत, प्राचीन वाङ्मयापासून आधुनिक साहित्यापर्यंत अनेकविध विषयांना त्यांनी आपल्या अमोघ, असाधारण वक्तृत्वाने न्याय दिला.
फडकुले हे शैलीदार वक्ते म्हणून प्रसिद्ध होते, त्याप्रमाणेच एक ललितलेखक आणि समीक्षक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांची २८ स्वतंत्र पुस्तके तर ११ संपादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. उपहासगर्भ, मिस्कील तरीही मन आणि बुद्धीला आवाहन करणारे ललितलेखन त्यांनी प्राचुर्याने केले. त्यात हिरव्या वाटा (१९८६), काही रंग काही रेषा (१९८६), आनंदाची डहाळी (१९८८), रंग एकेकाचे (१९९३), जगायचं कशासाठी?, अमृतकण कोवळे (१९९५), प्रिय आणि अप्रिय (१९९८), चिंतनाच्या वाटा (२०००),मन पाखरू पाखरू (२००१), दीपमाळ (२००५), अजून जग जिवंत आहे ! (२००५), काटे आणि फुले (२००७) यांचा समावेश आहे. हिरव्या वाटा या ललितलेखसंग्रहास महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. समाजसुधारणेच्या कार्यावर आणि सुधारकांच्या जीवनदृष्टीवर त्यांनी आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. लोकहितवादी : काल आणि कर्तृत्व, परिवर्तनाची चळवळ: काल आणि आज (१९९६), या ग्रंथांप्रमाणेच ललितलेखसंग्रहांतूनही प्रबोधनाच्या पाऊलखुणा त्यांनी अधिक सुस्पष्ट केल्या. लेखक, वक्ता आणि प्राध्यापक म्हणून प्रबोधनाच्या भाष्यकाराची भूमिका त्यांनी प्रभावीपणे बजावली. संतकवी तुकाराम: एक चिंतन (१९७८), संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना (१९९३), संतांचिया भेटी (१९९५), संत सहवास (१९९५), संतवीणेचा झंकार (१९९५), सुखाचा परिमळ (१९९७), संत तुकारामांचा जीवनविचार (१९९९), संत चोखामेळा : अश्रूंची कहाणी (२००३), संत साहित्य : सौन्दर्य आणि सामर्थ्य (२००५) यासारख्या पुस्तकांतून संतांच्या जीवनविचारांवर आणि त्यांच्या काव्यावर त्यांनी भाष्य केले. साहित्यवेध (१९७८), साहित्यातील प्रकाशधारा यासारख्या ग्रंथांतून त्यांनी साहित्यविषयक विचारांची चर्चा केली. ‘चिंतनशील प्रकृतीचा लेखक वाचकनिष्ठ असण्यापेक्षा विचारनिष्ठ असतो’ हे त्यांच्या लेखनातून निरंतर जाणवत राहते.
महाराष्ट्र राज्य पुरस्कार, आचार्य कुंदकुंद पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, परिवर्तन पुरस्कार, आचार्य विद्यानंद साहित्य पुरस्कार, भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार, प्रज्ञावंत पुरस्कार, चारित्र चक्रवर्ती पुरस्कार, यशवंतराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार, सहकारमहर्षी साहित्य पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांना लाभले. राष्ट्रीय बंधुता समाज साहित्य संमेलन, परिवर्तन साहित्य संमेलन, मराठी जैन साहित्य संमेलन अशा साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांना लाभला. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी कार्य केले. याखेरीज अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांवर ते कार्यरत होते.
मराठी भाषा आणि संस्कृतीच्या परंपरेत मराठी वक्तृत्वकलेला स्वतंत्र, देखणे, शैलीसंपन्न वळण लावणारे वक्ते म्हणून त्यांचे स्थान महत्वाचे आहे.‘साहित्याने समर्थ माणसाच्या निर्मितीचे साधन व्हावे’ या भूमिकेतून त्यांनी साहित्याचा विचार मांडला आणि जीवनवादी विचारांची पेरणी आपल्या ललितलेखनातून केली. ‘साहित्याचा सामाजिक अनुबंध त्यांच्या वाणी आणि लेखणीतून सातत्याने प्रकट होत राहिला. १६ नोव्हेंबर २००३ रोजी त्यांचा अमृतमहोत्सवी सत्कार झाला. या सत्कार सोहळ्यास ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित भारतीय कवी आणि लेखक अशोक वाजपेयी हे विशेष निमंत्रित होते. हे सोहळ्याचे औचित्य साधून साहित्य : सामाजिक अनुबंध हा डॉ.निर्मलकुमार फडकुले गौरवग्रंथ प्रकाशित झाला. तत्पूर्वी विवेकदर्शन हा गौरवग्रंथही प्रकाशित झाला होता.
सोलापूर येथे त्यांनी या इहलोकांचा निरोप घेतला. त्यांची स्मृती म्हणून सोलापूर येथे डॉ. निर्मलकुमार फडकुले संकुलाची उभारणी करण्यात आली आहे.
संदर्भ :
- पठाण, यु. म.आणि इतर (संपा.), विवेकदर्शन, (डॉ.निर्मलकुमार फडकुले गौरवग्रंथ), सोलापूर, २०००.
- ठकार, निशिकांत आणि इतर (संपा.), साहित्य : सामाजिक अनुबंध (डॉ.निर्मलकुमार फडकुले गौरवग्रंथ), सोलापूर, २००३.