रायमाने, ल. बा. : (२४ जानेवारी १९३६). मराठी व कानडी साहित्याचे गाढे अभ्यासक, लेखक आणि समीक्षक अशी त्यांची ओळख आहे. दलित साहित्य, शरण साहित्य इत्यादींचे भाष्यकार म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांचा जन्म अंकली तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण अंकली गावातच झाले. सर आप्पाजीराव इंग्लिश स्कूल अंकली येथून एसएससी चे शिक्षण पूर्ण केले (मार्च १९५६). पुणे विद्यापीठातून मराठी व संस्कृत हे विषय घेऊन बी. ए. पूर्ण केले (एप्रिल १९६०). एम. ए. मराठी राणी पार्वती देवी कॉलेज बेळगाव कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथून पूर्ण केले. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद कला महाविद्यालय औरंगाबाद येथे १९६३ पासून ते १९९५ पर्यंत मराठीचे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. काही काळ मिलिंद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अभ्यासू व चिंतनशील ल. बा. रायमाने यांच्यावर सानेगुरुजी तसेच राष्ट्र सेवा दलाचे संस्कार आहेत. आंबेडकरवादी विचारसरणीचे ते कृतिशील विचारवंत आहेत. त्याचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून व त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमातून येतो. त्यांनी राबवलेला पहिला अभिनव प्रयोग म्हणजे मिलिंदचे हस्तलिखित भित्तीपत्रक  होय. मिलिंदचे पहिले हस्तलिखित भित्तीपत्रक रायमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निघाले. यातून अनेक विद्यार्थी, शिक्षक, दलित जीवनाच्या कथा, कविता, आठवणी व स्व अनुभव लिहीत होते. अशा सामुहिक सर्जनशील उत्थानपर्वाचे फलित म्हणजे दलित साहित्य संस्कृतीची निळी पहाट होय. रायमाने दलित साहित्याच्या या प्रारंभिक पर्वाचे एक शिल्पकार होते. दलित साहित्य निर्मितीच्या क्षेत्रातील त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अस्मिता  त्रैमासिकाचे ते सहसंपादक होते. त्याच बरोबर मिलिंद साहित्य परिषद या संस्थेचे ते सरचिटणीस होते. नंतर अस्मिताचे या नियतकालिकाचे अस्मितादर्श  असे नामकरण झाले. यानंतर अनुभूती  या नियतकालिकाचे त्यांनी संपादन केले.

रायमाने यांनी अनेक पुस्तकांचे संपादन केलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचे इंदुमती मनोहर चिटणीस यांचे आमचे डॉक्टर, राधाबाई बळवंतराव वराळे यांचे मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या सहवासात, बाबासाहेब माने यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सावलीत  ही पुस्तिका आणि बाळू धोंडीबा रायमाने यांचे आत्मवृत्त उणे-अधिक, बळवंत वराळे यांचे डॉ. आंबेडकराचा सांगाती  व भालचंद्र वराळे यांचे परिस स्पर्श  इत्यादी पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे. त्यांनी काशीनाथ पोतदार लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र ग्रंथाचे विद्यार्थीदशेतच कानडीत भाषांतर केले आहे (१९६२).

ल. बा. रायमाने यांचे लेखन हे आंबेडकरी चळवळ विद्यार्थी केंद्रित व जात-धर्म यांची चिकित्सा करणारे आहे. ‘डॉ.  बाबासाहेब आंबेडकर: एक दर्शन’ या लेखामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घेतलेले शेवटचे दर्शन व मुंबईतील बाबासाहेबांच्या शेवटच्या प्रवासाचे भावपूर्ण वर्णन केले आहे (१९६३-६४). त्यांचा ‘बौद्ध विद्यार्थी: नवभारताचे एक आशास्थान’ हा लेख आंबेडकरी चळवळीमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या बदलांची मांडणी करणारा आहे (१९७२). ‘मी, माझी जात आणि माझा धर्म’,  ‘स्पृश्यास्पृश्यांची दास्ये’ (१९७०), ‘चर्मकार समाजाचे संघटन: एक प्रतिक्रिया’ (१९७४), ‘अस्पृश्यांनी समाज परिवर्तनात सहभागी व्हावे’, (नोव्हेंबर १९७०), ‘जीवनातील अनपेक्षित पान’ (दुष्काळ दिवाळी अंक, १९७३), ‘रूढिंच्या निर्मूलनाचे नवे जंग’ (ऑगस्ट, १९७२)  असे विविध लेख त्यांनी साधना  या नियतकालिकातून प्रकाशित केले आहेत. ‘दुष्काळी कामाच्या केंद्रावरील दलित बौद्ध: एक दृष्टिक्षेप’ (१९७२-७३) ‘म्हणून तर एवढी वाटचाल झाली’ (राष्ट्र सेवा दल पत्रिका, १९६५) ‘साने गुरुजींचे स्मरण’ (१९९२) ‘मला झालेले विनोबांचे विविध दर्शन’ (१९५८-५९), भारत आदर्श करणार! (बालमित्र  पाक्षिक, १९५५)  असे इतरही त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. ‘आमचे कवी- आमचे लेखक'(एप्रिल १९६९),’दलित- बौद्ध प्राध्यापक: एक मुक्त संवाद’ (१९७२-७३),’महात्मा गांधी आणि समाजपरिवर्तन: एक मुक्त चर्चा शिबिर'( १९७२-७३), दलित – बौध्दातील सुशिक्षित वर्ग आणि सामाजिक समस्या : एक चर्चा (१९७४-७५), ‘विद्यार्थी साहित्य शिबिर’ (१९७५-७६),’मिलिंद मॅक्झिनच्या निमित्ताने एक चर्चा’ (१९७७-७८),’समाजवाद आणि दलित’ (१९७३) ‘प्राचार्य म. भि. चिटणीस १’  (१९७३-७४), गुरुवर्य प्राचार्य म. भि. चिटणीस: २’ (साम्ययोग १६ एप्रिल १९८४), ‘माननीय डी. जी. जाधव’ (१९७३-७४) उपरोक्त मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स हस्तलिखित मॅगझीन मधील रायमाने यांनी केलेले शब्दांकन खूप महत्त्वाचे आहे. ‘गावकुसाबाहेर’ (महाराष्ट्र टाइम्स, १९७०) ‘समता अभियानातील अनुभव’ (दैनिक मराठवाडा, १९९१) इत्यादी विषयांवरचे त्यांचे लिखाण मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे.

ल. बा. रायमाने यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थांकडून त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे पुरस्कार (२०१०)  पंच्याहत्तरी निमित्त मानपत्र, (२०११), वृत्तरत्न सम्राट गौरव पुरस्कार (२०१५), पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई (२०१६), बळवंतराव वराळे स्मृती प्रतिष्ठान विशेष गौरव, औरंगाबाद (२०२०) इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेले आहे.

संदर्भ :

  • डोळस, अविनाश ; दोतोंडे, राम (संपा)., आधारस्तंभ प्राचार्य ल. बा. रायमाने, लोकवाङ्मय गृह, मुंबई, २०१२.