आकर्षक व घरेलू बागेत (Indoor), तसेच संपूर्ण सावली अथवा उन – सावलीत वाढणारे फुलझाड. यास पीस लिली (Peace lily) असेही म्हणतात. शास्त्रीय नाव स्पॅथिफायलम वॉलिसीआय (Spathiphyllum wallisii). हे अॅरेसी (Araceae) कुलातील फुलझाड असून याचे उगमस्थान अमेरिका व दक्षिण पूर्व आशिया आहे. याच्या ३६ प्रजाती आहेत. पाने गर्द हिरवी असून जमिनीलगत वाढतात. पानाच्या समूहातून उंच फुलदांडा येतो व टोकावर सुंदर पांढरे फुल तुऱ्यासह बाहेर पडते. हिरव्या पानाच्या पाश्वर्भूमीवर ते उठून दिसते. झाड सदाहरित असून हंगामी अथवा बहुवर्षायू लागवड करणे शक्य आहे. अलीकडे यात अनेक संकरीत वाण तयार केले आहेत.
वाढीसाठी सौम्य प्रकारचे हवामान योग्य असते. प्रखर सूर्यप्रकाश व अति उष्णता वाढल्यास पाने – फुले करपतात व वाढ खुंटते. वाढीसाठी वातावरणात आर्द्रता जास्त असावी. त्यासाठी वेळोवेळी भरपूर पाणी द्यावे व ओलावा कायम टिकून राहील याची काळजी घ्यावी; परंतु पाणी साठून राहता कामा नये. कुंडीतील लागवड असल्यास ओलावा टिकून राहण्यासाठी पाणी शोषण करणारे पदार्थ उदा., पिट, स्पँगनममॉस, लाकडी कोळसा यापैकी एक वरचे थरात भरावा. फुलदांड्यासह झाडाची उंची २-५ फुट असते. फुलासारख्या भासणाऱ्या भागास स्पॅथे (Spathe) म्हणतात, तर तुऱ्यावर अनेक फुले समूहाने एकसंध असतात. वर्षभर फुले येतात. लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन चांगली असते. लागवडीपूर्वी उत्तम दर्जाचे चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. जमीन भुसभुशीत असावी, त्यात ढेकळे व दगड-गोटे नसावेत.
झाडांना कायम नवीन बगल फुट येत असते व अशा फुटीवर फुले येतात. नवीन फुट येण्याची झाडाची क्षमता जोरात असल्यामुळे कमी काळात दाटी होते. त्यासाठी कुंडीत लागवड केली असल्यास कुंडी रिकामी करून पुन्हा भरणे आवश्यक असते. खूप दाटी झाल्यास झाडे वाढत नाहीत व फुले लहान येतात. जमिनीत लागवड केल्यास ही समस्या कमी येते; कारण झाडाचे व्याप्तीसाठी भरपूर जागा उपलब्ध असते. नवीन येणारी फुट लागवडीसाठी वापरणे शक्य असते. हे एक सुंदर घरेलू झाड असून बागेत, कुंडीत, परसबागेत, बाल्कनी, खिडकी इत्यादी ठिकाणी लावता येते. त्यामुळे हवा शुद्ध राखणेस मदत होते असा ‘नासा’ या अमेरिकन संस्थेचा दाखला आहे. झाडाची वाढ चांगली झाल्यास फारशी काळजी न घेता हे फुलझाड उत्तमपणे जोपासता येते. यावर रोग किडीचा प्रादुर्भाव होत नाही; परंतु हिवाळ्यात भुरी रोग पडू शकतो.
संदर्भ :
- Encyclopedia of Garden Plants & Flowers, Readers Digest. Association London, 1971.
- Randhawa, J.S.; Mukhopadhy, A. Floriculture in India, 1985.
- www.engledow.com
- www.ourhouseplants.com
समीक्षक : प्रमोद रसाळ