महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पुरातन स्थळ. ते गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर वसले असून ते नाशिक जिल्ह्याचे ठाणे आहे. नाशिक शहराला सु. २५०० वर्षांचा इतिहास आहे. संस्कृत महर्षी पतंजली यांच्या महाभाष्य  या प्राचीन ग्रंथात ‘नासिक्यʼ असा उल्लेख आढळून येतो, तेच गाव म्हणजे नासिक होय. तदनंतर अनेक जैन, बौद्ध आणि हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये नासिकचा उल्लेख शहर, देश अथवा जनपद असा येतो. येथील कुंभारवाडा किंवा मातीची गढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात १९५०-५१ साली ह. धी. सांकलिया यांनी डेक्कन कॉलेज, पुणे ह्यांच्यामार्फत उत्खनन काम हाती घेतले. उत्खननाच्या आधी भगवानलाल इंद्रजी आणि एच. कझिन्स ह्यांनी सदर ठिकाणाचे गवेषण केले होते. शहरापासून १५ किमी. दक्षिण पश्चिमेस गंगावाडी येथे दगडी हत्यारे आढळून आली होती. त्याशिवाय उत्खननात एकूण पाच स्तरातून विविध कालखंडाचे पुरावे सापडले. पहिला कालखंड पुराश्मयुग, त्यानंतर ताम्रपाषाण युग, प्रारंभिक ऐतिहासिक कालखंड, इंडो-रोमन कालखंड आणि मोगल-मराठा कालखंड. नासिकमध्ये झालेल्या उत्खननात जोर्वे संस्कृतीचे अवशेष ऐतिहासिक युगाच्या आधीच्या स्तरात सापडल्याने त्याचा कालखंड काढणे सोपे झाले आणि ही ताम्रापाषणयुगीन संस्कृती नव्याने उजेडात आली. ताम्रापाषाणयुगीन संस्कृती बरोबरच प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे स्थळ आहे.

नाशिक येथील उत्खननात आढळलेले मौर्यकालीन मृद्भांड्यांचे पुरावशेष.

प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडाचे मिळालेले अवशेष हे दोन काळातील होते. एक कालखंड इ. स. पू. २०० ते इ. स. ५०, तर दुसरा इंडो-रोमन कालखंड इ. स. ५० ते इ.स. २००. पहिला कालखंड सुद्धा दोन भागांमध्ये विभागला गेला होता. पहिल्या कालखंडामध्ये पोलादी निळसर रंगाची चमक (एन.बी.पी.डब्ल्यू) असलेली अशी भांडी, काळी आणि तांबडी मृद्भांडी, जाड काठ असलेली तांबड्या रंगाची मृद्भांडी अशा प्रकारचे विविध मृद्भांड्यांचे पुरावे मिळाले. त्या काळातील घरे ही मातीची बांधलेली होती, ज्यांची जमीन ही हिरव्या रंगाच्या मुरुमाचा वापर करून सारवलेली होती. दाराची लाकडी चौकट खोबणीत बसवून लाकडी दारे लोखंडी बिजागऱ्यांनी पक्की करीत. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी कूपाची सोय करण्यात आलेली होती. घराचे छत सुद्धा लाकडाचे बनलेले होते. मोठ्या आकारचे खिळे सदर उत्खननातून समोर आले. पहिल्याच कालखंडाच्या दुसऱ्या भागात साच्यात ओतून बनवलेली कोणताही लेख नसलेली अशी लेखरहित तांब्याची टंकित नाणी सुद्धा आढळली आहेत. ह्याच बरोबर शंखापासून तयार केलेल्या बांगड्या, गळ्यातले दागिने आढळून आले.

ह्या कालखंडानंतर वरच्या स्तरावर इंडो-रोमन व्यापार काळातील महत्त्वाचे पुरावे होते. त्या काळात होत असणाऱ्या व्यापारामुळे रोमन बनावटीच्या अनेक वस्तू येथील लोकांच्या वापरात आलेल्या आढळून आल्या. त्यामधे अर्चनाकुंडे आणि अनेक रोमन बनावटीची मृद्भांडी आढळून आली. यामध्ये लाल तकाकीयुक्त (Red polished ware), काळ्या रंगाची रूलेटेड मृद्भांडी (Rouletted ware), लाल रंगाची सुबक बनावटीची आणि चाकावर घडवलेली, मेगारॉन (Megaron ware) मृद्भांडी ज्यांत प्रामुख्याने थाळ्या आणि वाडगे आढळून आले. ह्या काळातील घरे ही पक्क्या भाजलेल्या विटांची, लाकडी छप्पर असलेली असावीत. विटांचा आकारही मोठा होता. पश्चिमी क्षत्रप राजा नहपान आणि सातवाहन कालखंडाशी जुळणारा हा कालखंड असावा, असा अंदाज सांकलिया ह्यांनी मांडला. काही मातीच्या भांड्यांवर ब्राह्मी लिपीतील अक्षरे आढळून आली. नासिक शहरात असलेली पांडव लेणी ही सातवाहन काळाशी निगडित असल्याचे पुरावे लेणीमध्ये असलेल्या लेखांमुळे समोर आलेले आहेत.

ह्या दोन्ही कालखंडांत लोह आणि तांबे ह्या धातूंचा वापर विविध प्रकारची हत्यारे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झालेला आढळून येतो. हत्यारे, मृद्भांडी ह्यांच्याबरोबरच मातीची खेळणी, काही आकृत्या, तसेच काही कमी मौल्यवान दगडांपासून बनवलेले विविध अलंकार आढळून आले.  ह्या अवशेषांवरून हे शहर प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडातील एक महत्त्वाचे असे सामाजिक, आर्थिक केंद्र असल्याचे लक्षात येते.

संदर्भ :

  • Ghosh, A. Ed., An Encyclopedia of Indian Archaeology, Vol. 2, New Delhi, 1989.
  • Sankalia, H. D. & Deo, S. B. Report on the Excavations at Nasik and Jorwe (1950-51), Deccan college, Pune, 1955.
  • देव, शांताराम भालचंद्र, महाराष्ट्रातील उत्खनने, माहिती आणि प्रक्षेपण मंत्रालय, प्रकाशन विभाग, भारत सरकार, मुंबई, १९६१.

                                                                                                                                                                                  समीक्षक : प्रमोद जोगळेकर