नागपूर जिल्ह्यातील पुरातत्त्वीय स्थळ. हे स्थळ वैनगंगा नदीच्या खोऱ्यात वसले असून वाघोर नदीच्या उजव्या तीरावर आहे. या स्थळाचे क्षेत्रफळ उत्तर-दक्षिण ८०० मी. आणि पूर्व-पश्चिम ५०० मी. इतके आहे. हे पुरास्थळ सभोवताल तटबंदीने वेढलेले असून याची जमिनीपासून सरासरी उंची ८ मी. इतकी आहे. या स्थळाचे उत्खनन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, विभागाच्या नागपूर उत्खनन शाखेच्या वतीने सन १९८८ ते १९९२ या पाच सत्रांत अमरेंद्र नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अडम हे विदर्भातील आजपर्यंतचे सर्वांत विस्तृत पुरातात्त्विक उत्खनन आहे.

सातवाहनकालीन घरांची रचना, अडम.

अडम येथील उत्खननात मध्याश्मयुगापासून ते ऐतिहासिक काळापर्यंतचे प्रमाण प्राप्त झाले असून येथील सांस्कृतिक स्तरक्रमाचे विस्तृत विवरण खालीलप्रमाणे :

कालखंड – १ : मध्याश्मयुग. या कालखंडात दगडाची विविध प्रकारची पाती, वेधण्या, लहान भूमितीय आकाराची (त्रिकोण, समांतर-द्विभुज-चौकोन, चंद्रकोर इ.) सूक्ष्म दगडी हत्यारे प्राप्त झाली आहेत. ही हत्यारे चाल्सिडोनी, अगेट, कार्नेलिअन यांसारख्या उत्तम पोताच्या गारगोटीच्या छिलक्यांपासून बनलेली आहेत. मृद्भांड्याचे कोणतेही पुरावे या कालखंडात प्राप्त झाले नाहीत. वर्तुळाकार झोपडीचे वासे उभे करण्यासाठीच्या पाच खड्ड्यांचे पुरावे मिळाले. उत्खनकांनी मध्याश्मयुगीन कालखंड इ. स. पू. ५००० ते इ. स. पू. २००० इतका निश्चित केला आहे.

कालखंड – २ : विदर्भ ताम्रपाषाण संस्कृती. या स्तरामध्ये आढळलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मृद्भांड्यांवरून या कालखंडाला ‘विदर्भ ताम्रपाषाण संस्कृतीʼ असे नाव दिलेले आहे. ही मृद्भांडी प्रामुख्याने लाल रंगाची असून यावर विविध रंगाचा लेप दिलेला आढळतो, तसेच खापराच्या बाह्य भागावर पांढऱ्या आणि काळ्या रंगाने चित्रकाम केल्याचे दिसून येते. या सोबतच काळ्या-आणि-तांबड्या रंगाची व काळी लेपयुक्त खापरे देखील मिळाली आहेत. यांमध्ये मडकी, विविध आकाराची वाडगी, थाळ्या, लहान भांडी इ. प्रामुख्याने आढळतात. मध्याश्मयुगीन काळाप्रमाणेच ताम्रपाषाणयुगीन लोकांनी दगडी हत्यारांचा उपयोग केला होता. हे लोक साध्या लाकडी वासे आणि छप्पर असलेल्या कुडाच्या घरात राहात. उत्खननात एका वर्तुळाकाराच्या आकारच्या घराचे आणि मातीने सारवलेल्या जमिनीचे पुरावे मिळाले आहेत. नवाश्युगीन काळातील दोन दगडी कुऱ्हाडी मिळाल्या असून त्या बहुधा धार्मिक प्रयोजनाकरिता वापरण्यात येत असाव्यात. या काळातील पुरावशेषांमध्ये तांब्याच्या बांगड्या, हाडांची अवजारे इ. प्रमुख आहेत. रेडिओ कार्बन कालमापन तिथीनुसार या कालखंडाला इ. स. पू. १७५० ते इ. स. पू. १४२५ इतका ठरविण्यात आले आहे.

कालखंड – ३ : लोहयुग. उत्खननकर्त्यांनी लोहयुगाला दोन टप्प्यांत विभागले आहे. लोहयुगाच्या प्रथम टप्प्यात लोखंडाचा सर्वप्रथम वापर सुरू होऊन लोखंडाची अनेक अवजारे प्राप्त झाली आहेत. या टप्प्यातील खापरे प्रामुख्याने लाल रंगाची असून सोबत काळ्या रंगाची आणि महापाषायुगीन संस्कृतीची काळी-आणि-तांबड्या रंगाची खापरे देखील आहेत. खापरांवरील लाल लेपामध्ये अभ्रकाचा सर्रास वापर लक्षणीय आहे. लाल रंगांच्या भांड्यावर पांढऱ्या किंवा काळ्या रंगाने चित्रे काढलेली खापरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पुरावशेषांमधे तांब्याच्या, शंखाच्या आणि हाडांच्या वस्तू, अर्धमौल्यवान दगडी मणी, मृण्मय मणी, पांढऱ्या रंगात नक्षी केलेले कार्नेलिअनचे मणी इ. प्रमुख आहेत.

लोहयुगाच्या द्वितीय टप्प्यात काळ्या-आणि-तांबड्या रंगाच्या खापरांमध्ये वाढ झालेली दिसली व लाल रंगाच्या खापरांची संख्या कमी झाली होती. सोबतच पांढऱ्या रंगात चित्रे काढलेली खापरे या टप्प्यात मिळाली नाहीत. लाल लेपावर काळ्या रंगाने चित्रकारी केलेली खापरे, लोखंडाची बहुउपयोगी उपकरणे आणि हत्यारे, तांब्याची उपकरणे, अर्धमौल्यवान दगडी मणी, पांढऱ्या रंगात नक्षी केलेले कार्नेलिअनचे मणी, मृण्मय मणी आणि पक्षी शिल्पे, शंखाच्या बांगड्या इ. अवशेष बहुसंख्येने मिळाले आहेत. या कालखंडातील लोकांच्या आयताकृती आणि वर्तुळाकार आकाराच्या घरांचे अवशेष प्राप्त झाले आहे. काही वर्तुळाकार घरांसमोर मोकळी जागा (porch) असल्याचे प्रमाण आढळले आहेत. रेडिओ कार्बन कालमापन तिथीनुसार अडम येथील लोहयुगाचा कालावधी इ. स. पू. १४०० ते इ. स. पू. ७०० इतका निर्धारित केला आहे.

कालखंड – ४ : मौर्य आणि शुंग काळ. या कालखंडात अडमच्या सांस्कृतिक स्तरक्रमात विशेष बदल दृष्टिगोचर होत असून, काही नवीन वस्तू आणि पद्धतीचा प्रथमत: उपयोग दिसून येतो. या कालखंडात घरबांधणीकरिता पहिल्यांदा विटांचा वापर केलेला दिसला. या काळात घरांचा आकार वर्तुळाकार न राहता चौकोनी आणि आयताकृती झाला होता. पाण्याकरिता विटांनी बांधलेल्या विहीरी आणि छतावर कवेलूच्या आच्छादनाचा उपयोग याच काळात सुरू झाला असून, नाण्यांचा पुरावा याच काळापासून मिळतो. या कालखंडात मिळालेली उत्तरेकडील काळी झिलईदार खापरे वैशिष्ट्यपूर्ण असून सोबत काळी-आणि-तांबड्या रंगाची, काळ्या रंगाची खापरे सापडली आहेत. एकंदरीत या कालखंडामध्ये अडम येथील ग्रामीण अर्थव्यवस्थेचे रूपांतर शहरी अर्थव्यवस्थेमध्ये होतांना दिसून येते. या कालखंडाच्या महत्त्वपूर्ण पुरावशेषांमधे आहत नाणी, पाटे-वरवंटे, अर्धमौल्यवान दगडी मणी, पांढऱ्या रंगात नक्षीकाम केलेले कार्नेलिअनचे मणी, पदके, हाडांच्या आणि हस्तिदंताच्या वस्तू, मृण्मय मातृदेवता विशेष आहेत. मडक्यात पुरलेली शवाधाने या कालखंडातील स्तरांत मिळाली आहेत. या कालखंडाला इ. स. पू. ३५० ते इ. स. पू. १०० इतके ठरविण्यात आले आहे.

अडम उत्खननातून प्राप्त ‘असिकस जनपदसʼ अंकित मुद्रांक.

कालखंड – ५ : भद्र, मित्र, सातवाहन, महाराठी आणि सेनापती. या स्तरात प्राप्त खापरे, मुद्रा-मुद्रांक, पुरावशेष आणि नाण्यांच्या आधारावर हा कालखंड भद्र, मित्र, सातवाहन, महाराठी आणि सेनापती म्हणून निर्धारित केला आहे. या काळातील प्रमुख खापरे ही विविध लेप असलेली लाल रंगाची, काळी-आणि-तांबड्या रंगाची, अभ्रकमिश्रित लाल रंगाची, साध्या लाल रंगाची, राखडी  केओलिन आणि रौलेटेड प्रकारची असून यांमध्ये मडकी, थाळ्या, झाकण्या, विविध आकारचे वाडगे, रांजण इ. प्रमुख आहेत. खापरांवर विविध आकारचे त्रिरत्न, स्वस्तिक, पक्षी इ. अंकन मिळाले आहेत. मातीच्या खापरांव्यतिरिक्त दगडी भांडी मर्यादित स्वरूपात मिळाली आहेत. या काळातील लोकांची घरे ही चौकोनी, आयताकृती, वर्तुळाकार आणि लंबवर्तुळाकार आकाराची, विटांनी आणि दगडांनी बांधलेली आहेत. शेल प्रकारचे दगड नजीक उपलब्ध असल्याने या दगडांचा भरपूर उपयोग घरबांधणीकरिता करण्यात आल्याचे दिसून येते. आयताकृती घरामध्ये साधारणतः एका रांगेत दोन, तीन किंवा चार खोल्या असून बाहेरच्या बाजूला व्हरांडा आणि अंगण असे. या कालखंडातील मडक्यात पुरलेली, जमिनीत पुरलेली इ. प्रकारची मानवी शवाधाने आढळली.

अडम उत्खननातील सर्वांत महत्त्वाच्या पुरावशेषांपैकी एक असिकस जनपदस  लिहिलेली मातीची मुद्रा याच कालखंडातील आहे. या स्तरातून मोठ्या प्रमाणात चांदीची आहत नाणी, तक्षशिला प्रकारची नाणी, तांब्याची नाणी, पितळ आणि शिसे या धातूची नाणी सापडली असून भद्र, मित्र आणि महाराठी यांची नाणी उत्खनित स्तरांतून मिळाली आहेत. सातवाहन राज्यकर्त्यांच्या नाण्यांव्यतिरिक्त नाण्यांचे साचे, विविध रंगाचे अर्धमौल्यवान दगडी मणी, हस्तिदंताच्या आणि हाडाच्या वस्तू, मृण्मय शिल्पे, मणी, खेळणी, काचेच्या आणि शंखाच्या बांगड्या, विविध धातूंच्या वस्तू आणि अवजारे, दगडी पाटे-वरवंटे इ. मोठ्या प्रमाणावर मिळाली आहेत. उपरोक्त पुरावशेषांच्या आधारावर हा कालखंड इ. स. पू. १५० ते इ. स. २५० इतका निर्धारित करण्यात आला आहे.

अडमच्या तटबंदीच्या उत्खननावरून असे निदर्शनास आले आहे की, तटबंदीची निर्मिती लोहयुगापासून सुरू झाली होती. लोहयुगाच्या प्रथम टप्प्यात तटबंदी आणि खंदकाचे निर्माण करण्यात आले असून लोहयुगाच्या द्वितीय टप्प्यात तटबंदीवर दगडी बाधंकाम केले गेले. मौर्य काळात तटबंदी ४.५० मी. ने उंच करण्यात आली होती. अडमच्या तटबंदीची आजची ६.४० मी. उंची आणि खंदकाची २६.५० मी. रुंदी सातवाहन कालखंडातील आहे. या पुरास्थळा नजीक असलेला स्तूप सातवाहन आणि महाराठी यांच्या काळातील आहे. हा स्तूप माती आणि दगडांत निर्मित असून याचे मेधी, अंड, हर्मिकेचे स्थापत्य अवशेष आणि पोच रस्त्याचे पुरावे उत्खननातून प्राप्त झाले आहेत. दोन टप्प्यांत निर्मित या स्तूपात तांब्याच्या नाणी, अर्धमौल्यवान दगडी मणी,  मृण्मय मणी इ. वस्तू मिळाल्या आहेत.

अडमच्या उत्खननाने विदर्भाच्या इतिहासावर मोठा प्रकाश टाकला आहे. विदर्भाच्या आद्य शेतकरी ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्ये आणि समकालीन ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीपेक्षा वेगळेपण या उत्खननाने पुढे आणली. उत्खननात प्राप्त लोखंडी उपकरणे, अन्नधान्ये, पाळीव प्राण्यांची आणि घोड्यांची हाडे आणि तटबंदी व खंदक निर्मितीची सुरुवात प्रगत लोहयुगाची सुरुवात दर्शवतात. मौर्य-शुंग काळामध्ये अडम येथे सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाची सुरुवात झाल्याचे दिसून येते. उत्खननात प्रथमच अडम या पुरास्थळाला ऐतिहासिक काळात असिकस जनपदस  म्हणून संबोधले जात होते, हे सिद्ध झाले आहे. उत्खननात आतापर्यंत अज्ञात असलेल्या पुष्कळ मुद्रा आणि मुद्राकांच्या प्राप्तीने महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या इतिहासात नवीन भर पडली आहे. या उत्खननात विविध काळाची एकूण ५३७४ नाणी मिळाली आहेत, जी महाराष्ट्राच्या उत्खननात सर्वाधिक आहेत. नाण्यांच्या इतक्या विशाल संख्येवरून ऐतिहासिक काळात अडम या स्थळाची आर्थिक भरभराट लक्षात येते. यामध्ये चांदीची आहत नाणी, असिक जनपद प्रकारची आहत नाणी, महाकोसल प्रकारची आहत नाणी, भद्र, दामभद्रची तांब्याची नाणी, मित्र आणि दत्त यांची नाणी, सातवाहनांची नाणी, चांदीची रोमन नाणी, क्षत्रपांची नाणी, महाराठीची नाणी इ. तत्कालीन इतिहासावर विपुल प्रकाश टाकतात. अडम उत्खननातून प्राप्त दामभद्राच्या मुद्रांकावरील नावेचे अंकन, रोमन नाणी, मृण्मय शिल्पे, रूलेटेड खापरे, उत्तरेकडील काळी झिलईदार खापरे, तक्षशिला प्रकारची नाणी इ. देशांतर्गत आणि विदेशी व्यापाराची साक्ष देत आहेत. उत्खननातून प्राप्त स्तूप आणि त्रिरत्न चिन्हे सातवाहन काळातील रहिवाशांवर बौद्ध धर्माचा प्रभाव सिद्ध करतात. सातवाहन साम्राज्याच्या आणि रोमन व्यापाराच्या अस्तानंतर अडम हे पुरास्थळ ओस पडण्यास सुरुवात झाली.

संदर्भ :

  • Nath, Amrendra, ‘Excavations at Adam (1988-1992) : A city of Asika Janpadʼ, Memoirs of the Archaeological Survey of India, No. 109., 2016.

                                                                                                                                                                                  समीक्षक : प्रमोद जोगळेकर