कोणत्याही घटनेचे स्पष्टीकरण किंवा उपपादन (Explanation) करण्यासाठी एखादी कल्पना गृहीत धरावी लागते व तिच्या अनुषंगाने त्या घटनेचा अर्थ लावावा लागतो. तो अर्थ जर वास्तव घटना समजण्यास अनुकूल व अनुरूप ठरला, तर गृहीत धरलेली कल्पना (गृहीतक) ग्राह्य ठरते व नंतर तिला एखाद्या व्यापक नियमाचे किंवा सिद्धांताचे रूप व दर्जा प्राप्त होतो. प्रत्यक्ष इंद्रियांच्या साहाय्याने, गरज लागेल तेथे व साहाय्यक उपकरणांची मदत घेऊन, तसेच सामाजिक शास्त्रांत अनुकूल व प्रतिकूल स्वरूपाची सर्व प्रकारची माहिती गोळा करून, शक्य तेथे प्रयोग करून व मिळालेल्या माहितीची चिकित्सक रीत्या छाननी करून, घटनांच्या वर्तनाचा कल व दिशा व्यक्त करणारी विधाने तयार केली जातात व ती विधाने गृहीतक म्हणून वापरून त्याच्यावरून पुढे व्यापक व वैश्विक नियम घडविले जातात. सुचलेल्या गृहीतकापासून तर्कदृष्ट्या संभाव्य परिणाम निगमित केले जातात व प्रत्यक्ष घटना त्या अपेक्षित व निगमित परिणामांशी जुळतात की नाहीत, हे पाहिले जाते. याला निकषण किंवा पडताळा म्हणतात. निकषणात गृहीतक जर यशस्वी व फलदायी ठरले, तर ते घटनेचे उपपादन करण्यास उपयुक्त ठरते व त्याला उपपत्तीचा (Theory) दर्जा प्राप्त होतो. अनेक उपपत्ती एकाच वेळी योग्य व स्पर्धक ठरल्या, तर त्यांना एक निर्णायक कसोटी लावावी लागते आणि जी एकमेव उपपत्ती (गृहीतक) त्या कसोटीस यशस्वीपणे उतरेल, तिला शेवटी व्यापक व वैश्विक अशा नियमाचा दर्जा प्राप्त होतो. गृहीतकापासून तर्कदृष्ट्या अपेक्षित निगमित संभाव्य परिणाम जर प्रत्यक्षात घडून आलेले दिसले नाहीत, तर ते गृहीतक त्याज्य ठरते किंवा त्याच्यात आवश्यक ते योग्य फेरफार करावे लागतात. सुरुवातीस स्वीकारलेल्या गृहीतकाचे तर्कशुद्ध व गणिती रीतीने निष्कर्ष काढण्याची गणितज्ञांची पद्धती असते व तसे करताना ते प्रत्यक्ष घटनांचा विचार करीत नाहीत.

एखादी समस्या सोडविताना प्रथम आपण मनाशी एक कल्पना बाळगून चालत असतो. यासच गृहीतक अथवा अभ्युपगम म्हणता येईल. नंतर पुराव्याने ही कल्पना आपण पडताळून पाहतो. हे गृहीतक अथवा कल्पना जर फलद्रुप झाली, तर तिला सिद्धांताचे अथवा नियमाचे स्वरूप प्राप्त होते आणि निष्फळ ठरली, तर ती त्याज्य ठरवून दुसऱ्‍या कल्पनेच्या अनुरोधाने ह्या दुसऱ्‍या कल्पनेचा पडताळा पाहण्याचा प्रयत्न केला जातो. विज्ञानाच्या क्षेत्रात, मुख्यतः वैज्ञानिक संशोधनात, विविध व विस्कळित अशा वास्तव घटनांचे निरीक्षण केले जाते; पण त्या सर्वांना एकत्र गुंफून त्या सर्वांवरून एखादे सामान्यीकरण करण्यासाठी सुरुवातीपासूनच जी एक मार्गदर्शक आणि निरीक्षणाला व विचाराला वळण, तसेच आकार देणारी अटकळ बांधावी लागते, तिला गृहीतक म्हणतात. अशा तऱ्हेची सुयोग्य गृहीतके तयार करणे, हेच विज्ञानात विगमनाचे मुख्य कार्य असते, असे जॉन स्ट्यूअर्ट मिल म्हणतो. विगामी (Inductive) तर्कशास्त्रात विल्यम स्टॅन्ली जेव्हन्झने मिलच्या निर्णायक विगामी पद्धतीच्या कल्पनेवर सडकून टीका केली. प्रिन्सिपल्स ऑफ सायन्स (१८७४) या पुस्तकात त्याने वैज्ञानिक पद्धतीची एक पर्यायी उपपत्ती दिली आहे. त्याने गृहीतक-निगामी पद्धतीचा (Hypothetico–Deductive Method) पुरस्कार केला. विगामी निष्कर्ष आपण सिद्ध करू शकतो, हे मिलचे मत चूक आहे; विगामी निष्कर्ष संभाव्य आहेत, हे दाखविण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही; विज्ञान गृहीतकांच्या पलीकडे कधीच जाऊ शकत नाही; त्याचे सिद्धांत म्हणजे जास्तीत जास्त संभाव्य अशी गृहीतकेच असतात, असे त्याचे प्रतिपादन आहे. गृहीतकांच्या संभाव्यतेचे मोजमाप करण्याची त्याने एक रीतही दिली आहे. तिच्या साह्याने सर्वांत अधिक संभाव्य गृहीतक कोणते, ते ठरविता येते. हे संभाव्यतम गृहीतक खरे असेलच, अशी ग्वाही अर्थातच कोणी देऊ शकत नाही. ते कदाचित खोटेही असेल; परंतु ते तसे आहे, हे आपल्याला कळेपर्यंत संभाव्यतम गृहीतकावर भिस्त ठेवणे ह्यातच वैज्ञानिक शहाणपणा आहे, असे त्याने प्रतिपादिले.

वैज्ञानिक गृहीतक व्यापक व सामान्य नियमाच्या स्वरूपाचे तसेच वैश्विक होण्यासाठी, त्याच्यात जेवढा कमी तपशील येईल, तेवढे ते सामान्य होण्याचा संभव अधिक असतो. डार्विनची क्रमविकासाची उपपत्ती अशा स्वरूपाची आहे. गृहीतकास व्यापक सामान्यत्व आणि वैश्विकता प्राप्त होईपर्यंत जे जे बदल आवश्यक वाटतील, ते ते त्याच्यात करावे लागतात. नवनवीन बदलते अनुभव, ज्ञानाची सतत होणारी प्रगती ह्यांच्या अनुरोधाने गृहीतकात बदल होणे स्वाभाविक असते; कारण प्रत्यक्ष घटनांच्या शक्य तेवढे जवळ येणे व त्यांचे यथार्थ वर्णन व उपपादन करणे, हेच गृहीतकाचे मुख्य कार्य असते. वर्णनात्मक, उपपादनात्मक, कर्ता वा कारणविषयक, प्रक्रियाविषयक, घटनानुबंधक इ. विविध प्रकारची गृहीतके असतात. तर्कशुद्ध गृहीतक हे निकषणक्षम, निःसंदिग्ध, आत्मसुसंगत, सत्यकारण (Vera Causa), प्रस्थापित सत्यांशी सुसंगत व पूर्वकथनक्षम असे असावे लागते. त्याच्या साहाय्याने केवळ त्याच्या विवक्षित क्षेत्रातील घटनांचेच उपपादन होऊन चालत नाही, तर सुयोग्य गृहीतक तत्सम इतर घटनांनाही लागू करता येऊन, त्याच्या साहाय्याने इतरही तत्सम घटनांचे सुयोग्य रीतीने उपपादन करता आले पाहिजे. ह्यास ‘विगमनाची संप्लुती’ (Consilience of Inductions) म्हणतात. मानवी व्यवहारांचे उपपादन करताना गृहीतकात मानवी हेतूंचा अपरिहार्यपणे आधार घ्यावा लागतो; कारण सर्व मानवी क्रिया सहेतुकच असतात.

संदर्भ :

  • Barker, S. F. Induction and Hypothesis, Ithaka (N.Y.), 1957.
  • Cohen, I. Bernard; Smith, George E. Eds. The Cambridge Companion to Newton, Cambridge, 2002.
  • Kuhn, Thomas, The Essential Tension, Chicago, 1977.
  • Longino, Helen E. Science as Social Knowledge : Values and Objectivity in Scientific Inquiry, Princeton, 1990.
  • Newton, Isaac; Trans. by Cohen, I. B.; Whitman, A. The Principia, Mathematical Principles of Natural Philosophy : A New Translation, California, 1999.
  • Popper, Karl, The Logic of Scientific Discovery, London, 1959.
  • Stebbing, L. S. A Modern Introduction to Logic, Bombay, 1961.
  • https://www.newworldencyclopedia.org/entry/Hypothesis