शाळेशी संबंधित असलेल्या विविध बाबींची सद्यस्थिती, त्यातील आवश्यक बदल आणि त्याकरिता इष्ट असलेले उपाय यांच्या सर्वेक्षणात्मक संशोधनाचा अंतर्भाव शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये होतो. शाळेशी संबंधित सर्वेक्षण विविध प्रकारचे असते. गाव, वस्ती, शहर, जिल्हा, राज्य, राष्ट्र, ग्रामीण वा शहरी विभाग अशा भिन्न भौगोलिक क्षेत्रांशी ते संबंधित असते. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक किंवा महाविद्यालयीन शिक्षणाच्या या भिन्न स्तरानुसार शैक्षणिक सर्वेक्षण केले जाते. हे सर्वेक्षण वास्तू, अध्ययन पद्धती, प्रशासन, प्रयोगशाळा, अर्थव्यवस्था, विद्यार्थ्यांची प्रगती, त्यांची बौद्धिक क्षमता, आवडीनिवडी, क्रमिक पुस्तके इत्यादी स्वरूपांचे असते. सामान्यतः शैक्षणिक सर्वेक्षणात स्तर, क्षेत्र आणि कार्य या तिन्ही बाबी एकत्रित विचारात घेतल्या जातात. कोणत्या स्तरावर, कोणत्या क्षेत्रात, कशासाठी सर्वेक्षण करायचे यांचा विचार त्यात असतो. कधीकधी अनेक कार्यांचा एकत्रित विचार करण्याकरिता व्यापक स्वरूपाचे सर्वेक्षण केले जाते.

कोणत्याही सर्वेक्षणाच्या एका टोकाला निव्वळ माहिती असते, तर दुसऱ्या टोकाला प्रयोग आहे. त्यामुळे सर्वेक्षणात माहिती संकलनाची, प्रयोगशीलतेची व त्यातून अनुमान काढण्याची प्रवृत्ती आढळते. यादृष्टीने विचार करता सर्वेक्षण म्हणजे प्रचलित तथ्यांचे संकलन, वर्णन, स्पष्टीकरण आणि मुल्यांकन होय. सर्वेक्षणामुळे विशिष्ट क्षेत्रातील वर्तमान स्थितीचे यथार्थ चित्र कळते. सर्वेक्षण हे संख्यात्मक, गुणात्मक असते. यामध्ये भाषेला महत्त्व असून गणितीय सांकेतिक भाषेचाही त्यात उपयोग होतो. अभ्यासाचे उद्दिष्ट, क्षेत्र, साधन, तंत्र, विषय इत्यादींनुसार सर्वेक्षणाचे लोकमत सर्वेक्षण, सामाजिक सर्वेक्षण, राजकीय सर्वेक्षण, आर्थिक सर्वेक्षण, शैक्षणिक सर्वेक्षण इत्यादी विविध प्रकार पडतात. शैक्षणिक सर्वेक्षण झाल्यानंतर तज्ज्ञांच्या निकषनुसार आवश्यक त्या शाळेमध्ये आवश्यकतेनुसार शैक्षणिक मार्गदर्शन, शैक्षणिक मूल्यमापन, शैक्षणिक संशोधन, शैक्षणिक समुपदेशन इत्यादींबाबत सूचना दिले जाऊ शकते.

शैक्षणिक सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश शैक्षणिक प्रगती साधणे हा असतो. शैक्षणिक सर्वेक्षणातून प्राप्त माहितीचा उपयोग धोरणकर्ते, प्रशासक, शिक्षक व संशोधक यांना शैक्षणिक नियोजन करण्यासाठी व विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. तसेच शैक्षणिक सर्वेक्षणामुळे देशाच्या किंवा राज्याच्या शैक्षणिक योजना तयार करण्यास खूप मदत होते. त्यामध्ये ज्याठिकाणी शाळा नाही त्याठिकाणी शाळा काढणे, आवश्यक ठिकाणी शाळा हलविणे, दोन शाळा परिस्थितीनुसार एकत्र समायोजन करणे, विशिष्ट अंतरामध्ये प्राथमिक शाळा नसल्यास तेथे नवीन प्राथमिक शाळा देणे इत्यादी. शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये अभिवृत्ती मापिका, अभिरुची शोधिका, पदनिश्चयन श्रेणी, प्रश्नावली, मुलाखती, निरीक्षणे, चाचण्या, प्रलेख इत्यादी साधनांचा माहिती संकलनाकरिता उपयोग केला जातो. त्याच प्रमाणे शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये समस्या व उद्दिष्टे, योजना, साधनांची निर्मिती, माहिती संकलन, संकलित माहितीचे वर्गीकरण व अर्थनिर्वचन, अहवाल लेखन, पाठपुरावा या पायऱ्यांचा समावेश होतो.

शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय (एम. एच. आर. डी.), राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एन. सी. ई. आर. टी.) आणि राष्ट्रीय माहिती केंद्र (एन. आई. सी.) या संस्था सहभागी आहेत. शैक्षणिक सर्वेक्षणासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे आर्थिक मदत होते; तसेच सर्वेक्षणाच्या सक्षम कार्यवाहीसाठी प्रशासकीय पाठींबा देण्याचे काम करते. सर्व प्रकारची शैक्षणिक माहिती पुरविणे, व्यवस्थापन करण, सर्वेक्षण कार्यामध्ये समन्वय राखणे आणि शैक्षणिक सर्वेक्षणाचा अहवाल तयार करून तो प्रसारित करणे इत्यादी प्रकारची जबाबदारी एन. सी. ई. आर. टी. ही संस्था पार पाडते. सर्वेक्षणाच्या संगणकीकरणाची जबाबदारी एन. आई. सी. पार पाडते. त्यामध्ये सॉफ्टवेअर विकसित करणे, प्राप्त माहितीवर प्रक्रिया करून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील निष्कर्षांचे सारणीकरण करणे इत्यादींचा समावेश होतो. राज्य पातळीवर २९ राज्ये व ७ केंद्र शासित प्रदेशांचे प्रशासन सर्वेक्षणाच्या कार्यवाहीमध्ये सहभागी झालेले असते. शालेय शिक्षण क्षेत्रातील देशाच्या एकूण प्रगती संदर्भातील माहिती गोळा करणे, ती एकत्रित करणे व प्रसारित करणे हा आखिल भारतीय शैक्षणिक सर्वेक्षण हाती घेण्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश असतो. तसेच केंद्र व राज्य शासनांच्या विविध शैक्षाणिक योजनांची पाहणी करणे, शैक्षणिक धोरणे तयार करणे व सूक्ष्म तसेच दीर्घ पातळीवरील शैक्षणिक नियोजन करण्यासाठी सर्वेक्षणाद्वारे मुलभूत माहिती पुरवली जाते. २०१९ या वर्षापर्यंत अखिल भारतीय स्तरावर एकूण आठ शैक्षणिक सर्वेक्षणे हाती घेण्यात आली होती.

सर्वेक्षण तक्ता

सर्वेक्षण क्रमांक संस्था दिनांक
प्रथम सर्वेक्षण केंद्रीय शिक्षण मंत्रालय ३१ मार्च १९५७
द्वितीय सर्वेक्षण एन. सी. ई. आर. टी ३१ डिसेंबर १९६५
तृतीय  सर्वेक्षण एन. सी. ई. आर. टी ३१ डिसेंबर १९७३
चौथे  सर्वेक्षण एन. सी. ई. आर. टी ३० सप्टेंबर १९७८
पाचवे  सर्वेक्षण एन. सी. ई. आर. टी ३० सप्टेंबर १९८६
सहावे सर्वेक्षण एन. सी. ई. आर. टी ३० सप्टेंबर १९९३
सातवे सर्वेक्षण एन. सी. ई. आर. टी ३० सप्टेंबर २००२
आठवे सर्वेक्षण एन. सी. ई. आर. टी ३० सप्टेंबर २००९

पहिले सर्वेक्षण : भारतामध्ये ३१ मार्च १९५७ मध्ये पहिले अखिल भारतीय शैक्षणिक सर्वेक्षण झाले. याच वर्षी महाराष्ट्रातही असे सर्वेक्षण पार पडले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे हाती घेण्यात आलेल्या पहिल्या शैक्षणिक सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट देशातील विविध वस्त्यांचा, शालेय स्तरावरील शिक्षण संस्थांचा शोध घेऊन त्यांची मोजदाद करणे, त्यांच्याकडून किती वस्त्यांना शैक्षाणिक सेवा पुरवल्या जातात याचा शोध घेणे हे होते. याचा सर्वेक्षणाचा वापर कोणत्या वस्त्यांना प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत, कोणत्या ठिकाणी आणखी नवीन शाळा सुरू करता येतील इत्यादींचे नियोजन करण्यासाठी झाला.

दुसरे सर्वेक्षण : ३१ डिसेंबर १९६५ रोजी दुसरे शैक्षणिक सर्वेक्षण एन. सी. ई. आर. टी.ने हाती घेतले. पहिल्या सर्वेक्षणापेक्षा दुसऱ्या सर्वेक्षणाची व्याप्ती अधिक होती. दुसऱ्या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट केवळ शाळांच्या स्थितीचा अभ्यास करणे हा नसून पहिल्या सर्वेक्षणामध्ये गोळा करण्यात आलेल्या माहितीमध्ये सुधारणा करणे व त्याआधारे नवीन शाळांचे ठिकाण निश्चित करण्यासाठी जिल्हा विकास नियोजन कार्यक्रम तयार करणे हा होता.

तिसरे सर्वेक्षण : ३१ डिसेंबर १९७३ रोजी तिसरे सर्वेक्षण हाती घेण्यात येऊन १९७५ मध्ये पूर्ण झाले. हे सर्वेक्षण पहिल्या दोन सर्वेक्षणापेक्षा अधिक व्यापक व सर्वंकष होते. यामध्ये उच्च शिक्षण, शैक्षणिक प्रशासन व तांत्रिक शिक्षण या घटकांचा समावेश होता. या सर्वेक्षणामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडे उच्च शिक्षणासंदर्भातील माहिती गोळा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती; तर राष्ट्रीय शैक्षाणिक नियोजन व प्रशासन संस्थेकडे शैक्षणिक प्रशासन व नियोजनाबद्दलची माहिती गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

चौथे सर्वेक्षण : ३० सप्टेंबर १९७८ रोजी चौथे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. विस्ताराच्या दृष्टीकोनातून या सर्वेक्षणामध्ये विशेष बदल करण्यात आले नव्हते. या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट मागील सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेल्या संख्याशास्त्रामध्ये सुधारणा करणे हा होता.

पाचवे सर्वेक्षण : ३० सप्टेंबर १९८६ रोजी पाचवे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. प्राथमिक शाळांमध्ये उपलब्ध असणाऱ्या सुविधांचे मुल्यांकन करणे व शिक्षकांची विस्तृत माहिती गोळा करणे हे या शैक्षणिक सर्वेक्षणाचे उद्दिष्ट होते.

सहावे सर्वेक्षण : ३० सप्टेंबर १९९३ रोजी सहावे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. विविध शालेय स्तरावरील शैक्षणिक सुविधांच्या सद्यस्थितीतील भौतिक सुविधांचे व मुलभूत सुविधांचे मुल्यांकन करणे, सवलतीच्या योजनांचा शोध घेणे व त्यांच्या लाभधाराकांची संख्या मोजणे हे या शैक्षणिक सर्वेक्षणाचे उद्दिष्ट होते.

सातवे सर्वेक्षण : ३० सप्टेंबर २००२ रोजी सातवे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर विविध प्रकारच्या शैक्षणिक व मुलभूत सुविधांचे मुल्यांकन करणे, विद्यार्थ्यांची इयत्तावार उपस्थिती जाणून घेणे, शिक्षणाच्या विविध स्तरावर असलेल्या अकार्यक्षम विद्यार्थ्यांची संख्या मोजणे इत्यादी.

आठवे सर्वेक्षण : ३० सप्टेंबर २००९ रोजी आठवे सर्वेक्षण हाती घेण्यात आले. शालेय शिक्षणाचे सर्वंकष चित्र तयार करण्याच्या दृष्टीकोनातून सातव्या सर्वेक्षणाच्या तुलनेत या सर्वेक्षणामध्ये काही नवीन घटकांवर प्रकाशझोत टाकण्याच्या हेतूने त्या घटकांवर आधारित नवीन प्रश्नांचा सामावेश या सर्वेक्षणामध्ये करण्यात आला. त्यामध्ये आदिवासी विभागातील शाळा, धार्मिक अल्पसंख्यांक शाळा व त्यांचे प्रकार, निवासी शाळा, बाग व त्यांचे क्षेत्रफळ, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळेच्या परिसरामध्ये पाण्याची सुविधा, स्वच्छता गृहे, आरोग्य शिबिरांचे आयोजन, पूर्ण वेळ शिक्षकांची नेमणूक, वय, लिंग व स्तरानुसार कार्यरत पूर्ण वेळ शिक्षकांची संख्या, समावेशक शिक्षणाची सोय, अकार्यक्षम विद्यार्थ्यांची स्तरानुसार प्रवेश संख्या, इयत्तावार इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या, प्रयोगशाळा सुविधा, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाची सुविधा, ग्रंथालयामध्ये ब्रेल लिपीतील पुस्तकांची संख्या, शाळेच्या परिसरातील अंगणवाडी केंद्रे, वर्ग, लिंग व सामाजिक स्तरानुसार अनुत्तीर्ण झाल्याने पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, प्रत्येक शाळेचा वार्षिक परीक्षेचा निकाल इत्यादी नवीन घटकांची माहिती होण्यासाठी या सर्वेक्षणामध्ये प्रश्न विचारण्यात आले होते; हेच या आठव्या सर्वेक्षणाचे वैशिष्ट्य होय.

संदर्भ :

  • जोशी, बी. आर., शिक्षणशास्त्र, पुणे, २००७.
  • भिंताडे, वि. रा., शैक्षणिक संशोधन पद्धती, पुणे, २००५.
  • मुळे, रा. श.; उमाठे, वि. तू., शैक्षणिक संशोधनाची मुलतत्वे, औरंगाबाद, १९९८.
  • Best, John W.; Kahn, James V., Research In Education, New Delhi, 2005.

समीक्षक : ह. ना. जगताप