आइसलँड या देशातील एक प्रसिद्ध आणि अतिशय जागृत ज्वालामुखी. रेक्याव्हीक या आइसलँडच्या राजधानीपासून पूर्वेस ११० किमी., दक्षिण किनाऱ्यापासून आत ४८ किमी. वर हा ज्वालामुखी आहे. दक्षिण आइसलँडमधील पूर्वेकडील ज्वालामुखी पट्ट्यात सस. पासून १,४९१ मी. उंचीवर हा ज्वालामुखी आहे. आइसलँड बेटाच्या अगदी पूर्व भागात स्थित असलेल्या या ज्वालामुखीच्या सभोवतालचा संपूर्ण प्रदेश विस्तृत कृषिक्षेत्राचा आहे. या ज्वालामुखीचे वैशिष्ट्य म्हणजे हा भेगी प्रकारचा ज्वालामुखी असून मोठ्या उद्रेकाच्या वेळी हेक्लूजा नावाने ओळखल्या जाणाऱ्या ५.५ किमी. लांबीच्या भेगेतून लाव्हारस बाहेर येत असतो. संपूर्ण भेगेतून लाव्हारस बाहेर येत असल्यामुळे लाव्हारस व त्याच्याबरोबर बाहेर पडणाऱ्या इतर पदार्थांच्या संचयनापासून सुमारे ४० किमी. लांबीचा लांबट आकाराचा ज्वालामुखी डोंगर निर्माण झाला आहे. या डोंगरात अनेक ज्वालामुखी कुंडही आढळत असून त्यांतील दोन कुंड विशेष जागृत आहेत.

ख्रिस्तपूर्व कालावधीत येथे अनेकदा उद्रेक झालेले आहेत. पूर्वीच्या काळी याला हेल पर्वत म्हणून ओळखले जाई. इ. स. ११०४ ते २००० या कालावधीत वीसपेक्षा अधिक वेळा येथे मोठे उद्रेक झाले आहेत. त्यांपैकी  इ. स. १३००, १७६६, १९४७ मध्ये झालेले ज्वालामुखी उद्रेक विनाशकारी होते. यांमध्ये विशेषत: १७६६ मधील उद्रेकात फार मोठी जिवीत व वित्त हानी झाली होती. उद्रेकाचा कालावधी अगदी काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत असा अनिश्चित असतो. इ. स. १९४७-४८ मधील उद्रेकात २९ मार्च १९४७ रोजी झालेल्या उद्रेकानंतर पुढे १३ महिने उद्रेक चालू होते. या उद्रेकांच्या वेळी निर्माण झालेले राखेचे ढग वातावरणात २७ किमी.पर्यंत पसरले होते. बाहेर उडालेली राख फिनलंडपर्यंत गेली होती. तद्नंतरचे १९७०, १९८०, १९९१ आणि २००० मधील उद्रेक सौम्य होते. २००० मधील उद्रेक चार दिवस चालू होते. विसाव्या शतकाच्या अखेरीपासून या ज्वालामुखी उद्रेकाचे स्वरूप बदललेले दिसते. सुरुवातीला स्फोटक राख बाहेर पडून त्याच्या बरोबरीने फवाऱ्यासारखा वर उडणारा किंवा वाहणारा लाव्हा बाहेर पडतो.

निद्रितावस्थेत असतानाच्या कालावधीत हा ज्वालामुखी डोंगर हिमाच्छादित असतो. तसेच त्यावर लहान हिमनद्या आढळतात. हायकिंग, बर्फावरील खेळ, गिर्यारोहण इत्यादींसाठी हौसी पर्यटक येथे गर्दी करीत असतात. या परिसराला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी लेईरूबक्की फार्म येथे २००७ पासून हेक्ला केंद्र स्थापन करण्यात आले आहे. हेक्ला केंद्रात प्रवाशांना हेक्ला ज्वालामुखी व त्याच्या सभोवतीच्या प्रदेशाची माहिती देण्यात येते.  हेक्ला ज्वालामुखीचा उद्रेक अचानक होत असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आणून दिले जाते. धूपनियंत्रणासाठी या डोंगराच्या उतारावर बर्च, वाळुंज इत्यादी वृक्षांची लागवड केली आहे.

समीक्षक : वसंत चौधरी