एक महान बोधिसत्त्व. महायान पंथात बुद्धांपेक्षा बोधिसत्त्वाचे महत्त्व वाढल्यामुळे ह्यांस उपास्य देवतेचे स्वरूप प्राप्त झाले. समंतभद्र, रत्नपाणी, विश्वपाणी, वज्रपाणी, अवलोकितेश्वर असे ध्यानिबोधिसत्त्व मानलेले असून अवलोकितेश्वरांच्या डोळ्यांपासून चंद्रसूर्य इ. प्रकारे देवांची निर्मिती झाली. तारा ही अवलोकितेश्वरांच्या अश्रूंपासून जन्मलेली देवता होती. प्रज्ञा, करुणा इ. शक्तीही होत्या.

बोधिसत्त्व अवलोकितेश्वर (सु. ९००‒१०००), नालंदा बिहार.

अवलोकितेश्वर हे करुणेचे मूर्तिमंत रूप बनले व शरणागताला अभयदान व संरक्षण देणे, हे त्यांचे कर्तव्य होऊन बसले. ते लोकांना आपले स्वतःचे पुष्प देऊन वाचवू शकतात. लोकेश्वर व लोकनाथ असेही त्यांचे दोन नावे असून त्यांचा अर्थ विश्वाचा स्वामी असा होतो.

सद्धर्मपुंडरीक  ह्या ग्रंथाच्या २४ व्या परिच्छेदात ह्या अवलोकितेश्वरांचे माहात्म्य वर्णन करून शरण आलेल्या लोकांच्या साहाय्यार्थ सदैव धावून येण्याची त्यांची नेहमीच कशी तयारी असते, हे दाखविले आहे. त्यामुळे भारताबाहेरच्या बौद्ध प्रदेशांत त्यांना विशेष महत्त्व प्राप्त होऊन त्यांच्या मूर्ती उभारलेल्या दिसतात. नेपाळमधील काठमांडू शहरात प्रमुख चौकात ह्या देवतेची मूर्ती आहे. तसेच कंबोडिया म्हणजे ख्मेर प्रजासत्ताकातील अंकोरवात येथील एका बौद्ध मंदिराच्या शिखरावर एक प्रचंड मूर्तीचा मुखवटा आहे, तो याच उपास्य देवतेचा समजला जातो. चीन, जपान, व्हिएटनाम या देशांत ‘क्वान्‌यिन्‌’ या नावाने ओळखली जाणारी देवता हीच होय. काही ठिकाणी अवलोकितेश्वर अर्धनरनारीच्या स्वरूपातही आढळतात. एक सहस्र हात असलेली अशी ही देवता आहे. असे कल्पून तिच्या अनेक हात असलेल्या मूर्ती व चित्रे बनवलेली आढळतात.

संदर्भ :

  • Blofeld, J. Bodhisattva of Compassion : The Mystical Tradition of Kuan-Yin, Boston, 1977.
  • Rinpoche, B.; Donyo, K.; Trans. Buchet, C. Profound Wisdom of the Heart Sutra, San Francisco, 1994.
  • Yu, C. Kuan-Yin : The Chinese Transformation of Avalokitesvara, New York, 2001.