पश्चिम आशियातील इराण आणि अरबस्तान द्वीपकल्प यांदरम्यानचा अरबी समुद्राचा एक फाटा. याला इराणचे आखात असेही म्हणतात. या आखाताची लांबी ९९० किमी., कमाल रुंदी ३४० किमी. व किमान रुंदी ५५ किमी. आहे. ही किमान रुंदी हॉर्मझ सामुद्रधुनीत आहे. पर्शियन आखात आणि ओमानचे आखात यांना हॉर्मझ सामुद्रधुनीने जोडलेले आहे. ओमानचे आखात अरबी समुद्रात विलीन होते. एकंदरीत हे आखात उथळ असून त्याच्या खोलीमध्ये एकसारखेपणा आढळत नाही. इराणच्या किनाऱ्याजवळ खोली अधिक, तर अरबस्तान किनाऱ्याजवळ ती कमी आढळते. आखाताची सरासरी खोली ५० मी. व कमाल खोली ९० मी. असून केवळ आग्नेय भागातील एकाकी ठिकाणी ती ११० मी. पेक्षा अधिक आढळते. या आखाताच्या सभोवताली बहरीन, इराण, इराक, कुवेत, ओमान, कॉटार, सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिराती हे आठ देश आहेत. त्यांपैकी उत्तरेस, ईशान्येस आणि पूर्वेस इराण; आग्नेयीस व दक्षिणेस संयुक्त अरब अमिराती; नैर्ऋत्येस व पश्चिमेस कॉटार, बहरीन आणि सौदी अरेबिया, तर वायव्येस कुवेत आणि इराक हे देश आहेत. पर्शियन आखातात कित्येकदा खुद्द पर्शियन आखाताबरोबरच हॉर्मझ सामुद्रधुनी आणि ओमानच्या आखाताचाही समावेश केला जातो. ऐतिहासिक आणि जागतिक दृष्ट्या याला ‘पर्शियन आखात’ असे म्हटले जाते. १९६० पूर्वी छापलेल्या बहुतेक नकाशांत, तसेच आंतरराष्ट्रीय तह आणि दस्तऐवजांत या जलभागाला पर्शियन आखात म्हणूनच संबोधले आहे. काही अरब शासकांनी याला ‘अरेबियन आखात’ म्हटले असले, तरी जागतिक पातळीवर ते नाव स्वीकारले गेले नाही. आंतरराष्ट्रीय जलआलेखन संघटनेने (इंटरनॅशनल हायड्रोग्रॅफिक ऑर्गनाइझेशन) या जलभागाचा ‘इराणचे आखात’ (पर्शियन आखात) असा उल्लेख केला आहे. या संघटनेने ओमान आखाताची वायव्य मर्यादा हीच पर्शियन आखाताची दक्षिण मर्यादा ठरविली आहे. अरबस्तान किनाऱ्यावरील रास लिमाह (२५° ५७’ उ. अक्षांश) आणि इराणच्या किनाऱ्यावरील रास अल कुह (२५° ४८’ उ. अक्षांश) यांना जोडणारी रेषा म्हणजे या आखाताची दक्षिण मर्यादा मानली जाते.
मध्य क्रिटेशस काळातील घडामोडींमध्ये या आखाताची निर्मिती झाली असून टायग्रिस – युफ्रेटीस द्रोणीचाच हा भाग असल्याचे मानले जाते. आखाताचा इराणकडील किनारा डोंगराळ असून तेथे अधूनमधून कडे आढळतात. त्याशिवाय तेथे अरुंद किनारपट्टी मैदाने, पुळणी, भरती – ओहोटी यांदरम्यानचा (अंतरावेलीय) सपाट भाग, छोट्या नद्यांची दलदली मुखे आणि नदीमुखखाड्या, नैसर्गिक परंतु असुरक्षित बंदरे व बरीच लहान लहान बेटे आहेत. हॉर्मझ सामुद्रधुनीच्या उत्तर भागात मुख्य भूमीपासून क्लॅरेन्स (खुरान) सामुद्रधुनीने वेगळे झालेले १०८ किमी. लांबीचे किश्म हेच एक मोठे बेट आहे. बूशीर शहरापासून उत्तरेस शट-अल्-अरब नदीच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत किनारपट्टी मैदानाची रुंदी अधिकाधिक वाढत जाते. आखाताच्या अगदी ईशान्य भागात शट-अल्-अरब नदीच्या मुखाजवळ ६४ किमी. लांबीचा दलदलयुक्त त्रिभुज प्रदेश आहे. टायग्रिस – युफ्रेटीस नद्यांच्या संगमानंतरच्या प्रवाहास शट-अल्-अरब म्हणून ओळखले जाते. कारून ही शट-अल्-अरबची प्रमुख उपनदी आहे. अरबस्तानकडील किनारा सखल असून तेथे वाळवंट, कच्छ वनश्री व लहान लहान खाड्या आढळतात. प्रामुख्याने कॉटार द्वीपकल्पाभोवती आणि अगदी आग्नेयीस हॉर्मझ सामुद्रधुनीच्या भोवतालच्या निसर्गसुंदर मुसंदम द्वीपकल्पावर सागरी कडे आढळतात. या किनाऱ्यावरील बहुतांश भागात बहरीन वगळता वालुकाश्म पुळणी आणि खारकच्छांनी वेढलेली अनेक लहान लहान बेटे आहेत. त्यांतील काही प्रवाळ बेटे आहेत. येथील काही बेटांच्या मालकी हक्काबाबत तेथील देशांमध्ये प्रादेशिक विवाद आहेत. येथील बेटे नैसर्गिक मोती मिळविणे व मासेमारीसाठी प्रसिद्ध असून चाचेगिरीकरिता कुप्रसिद्ध आहेत.
टायग्रिस, युफ्रेटीस, कारून व जाराही या आखाताला मिळणाऱ्या प्रमुख नद्या असून त्यांद्वारे आखाताला अल्प प्रमाणात गोड्या पाण्याचा पुरवठा होतो. या नद्या पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर गाळ वाहून आणून या आखातात टाकतात. पर्वतीय प्रदेशातील बर्फ वितळून या नद्यांना पाणीपुरवठा होत असल्यामुळे वसंत ऋतूत आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस त्यांना सर्वाधिक पाणी असते. काही वेळा नुकसानकारक पूरही येतात. बूशीरच्या दक्षिणेस इराणमधून काही अल्पकालीन प्रवाह या आखाताला येऊन मिळतात. अरबस्तान किनाऱ्यावर मात्र आखाताला गोड्या पाण्याचा पुरवठा करणारी एकही नदी नाही.
सभोवतालच्या वालुकामय प्रदेशावरून वाहत येणाऱ्या जोरदार वायव्य वाऱ्याबरोबर वाहत येणाऱ्या धूळ, रेती, वाळू इत्यादी पदार्थांचे या आखातात संचयन होते. विविध प्रक्रियांद्वारे त्यापासून कॅल्शियम कार्बोनेटची निर्मिती होते. इराणलगतच्या खोल सागरी प्रदेशात आणि टायग्रिस – युफ्रेटीस यांच्या त्रिभुज प्रदेशाभोवतालच्या भागांत कॅल्शियम कार्बोनेटयुक्त करड्या-हिरव्या रंगाच्या चिखलाचे थर आढळतात. तळावरील उबदार आणि खाऱ्या पाण्यामुळे या कॅल्शियम कार्बोनेटयुक्त गाळाचे कठीण खडकात रूपांतर होते. आखातातील जो गाळ लाटांद्वारे किनाऱ्याकडे फेकला जातो, त्यापासून किनारी प्रदेशात खारकच्छांनी वेढलेली बेटे निर्माण होतात. जास्त लवणता आणि उच्च तापमान यांमुळे या भागात कॅल्शियम सल्फेट आणि सोडियम क्लोराइडयुक्त वर्षण होते.
पर्शियन आखाती प्रदेशात उष्ण वाळवंटी निरुत्साही हवामान आढळते. उच्च तापमान (सरासरी ३८° से.) आणि दमटपणा (सापेक्ष आर्द्रता सुमारे ८० टक्के) ही येथील हवामानाची विशेष वैशिष्ट्ये आहेत. अगदी वायव्य भागात हिवाळे बऱ्यापैकी थंड असले, तरी तापमान उच्च असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२ ते २१ सेंमी. आहे. नोव्हेंबर ते एप्रिल यांदरम्यान पाऊस अगदी तुरळक पडत असून ईशान्य भागात तो थोडा अधिक असतो. सर्वसाधारणपणे उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात ढगाळ वातावरण अधिक असते. उन्हाळ्यात धुळीची वादळे आणि धूसर हवा हे आविष्कार नेहमीच अनुभवास येतात. उन्हाळ्यात उत्तरवायव्येकडून वाहत येणारे शामल वारे कधीकधी वादळी स्वरूप धारण करतात. शरद ऋतूत नेहमीच चंडवात आणि जलशुंडांची निर्मिती होते. काही वेळा त्यातील वाऱ्याचा वेग अल्पावधीत (अगदी पाच मिनिटात) दर ताशी १५० किमी. पर्यंत पोहोचलेला असतो. किनारी भागांत खाऱ्या आणि मतलई वाऱ्याचा प्रभाव जाणवतो.
आखातातील पृष्ठजलाचे तापमान हॉर्मझ सामुद्रधुनीत २४° ते ३२° से., तर अगदी वायव्य भागात ते १६° ते ३२° से. असते. गोड्या पाण्याच्या पुरवठ्यापेक्षा बाष्पीभवन अधिक असते. उच्च तापमान आणि गोड्या पाण्याच्या कमी पुरवठ्यामुळे लवणतेचे प्रमाण अधिक असते. आखाताच्या मुखाजवळ दर हजारी लवणता ३७ ते ३८, तर अगदी वायव्य भागात ती ३८ ते ४१ च्या दरम्यान आढळते. अरबस्तानच्या किनारी भागातील खारकच्छांत यापेक्षाही अधिक लवणता व तापमान आढळते. भरती – ओहोटीची कक्षा कॉटारभोवती १.२ ते १.५ मी. असते. वायव्य भागात ती ३.० ते ३.४ मी., तर अगदी आग्नेय भागात २.७ ते ३.० मी. इतकी वाढलेली आढळते.
पूर्वी पर्शियन आखातात व परिसरात मासेमारी, नैसर्गिक मोती मिळविणे, डाउ बोटींची बांधणी करणे, जहाजांच्या शिडांचे कापड तयार करणे, उंटांची जोपासना, वेताच्या चटया तयार करणे, खजूर उत्पादन करणे, दक्षिणेकडील बेटांवर लाल काव तयार करणे यांसारखे व्यवसाय केले जात असत. सभोवतालचा बहुतांश भूप्रदेश ओसाड आहे. केवळ मेसोपोटेमियाच्या सखल व सुपीक मैदानी प्रदेशातून कृषी उत्पादने घेतली जातात; परंतु त्यांवर स्थानिकांच्या अन्नविषयक गरजाही नीट भागत नाहीत. त्यामुळे येथील लोकांना मासेमारी, खजूर उत्पादन व भटके पशुपालन हे व्यवसाय करावे लागतात. पूर्वी या आखातात मोती मिळविण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जाई; परंतु १९३० च्या दशकात जपानच्या कृत्रिम मोत्यांचे जागतिक बाजारपेठेत आगमन झाले तेव्हापासून येथील हा परंपरागत उद्योग कमी झाला. तरीही येथून मोती आणि खजूर यांची निर्यात केली जाते. आखातात अनेक मत्स्यक्षेत्रे असून व्यापारी तत्त्वावर मासेमारी केली जाते. मोठे मत्स्योद्योग कुवेत, कॉटार, बहरीन येथे स्थापन झाले असून काही देश माशांची निर्यात करतात. आखाताला मिळणाऱ्या नद्यांवर मोठी धरणे बांधल्यामुळे आखाताला होणारा पोषकद्रव्यांचा पुरवठा कमी झाला. त्याचा परिणाम मत्स्यपैदास कमी होण्यावर झाला आहे.
पर्शियन आखातात आणि परिसरात खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे समृद्ध साठे आहेत. इ. स. १९०८ मध्ये इराणमध्ये खनिज तेल साठ्यांचा शोध लागला. दुसऱ्या महायुद्धापासून पर्शियन आखाताच्या सभोवतालचे देश खनिज तेल उत्पादनात जगात अग्रेसर बनले आहेत. जगातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायुच्या संभाव्य साठ्यांपैकी अनुक्रमे दोन तृतीयांश आणि एक तृतीयांश साठे येथे आहेत. त्यामुळे जगातील औद्योगिक दृष्ट्या विकसित देशांच्या दृष्टीने हा प्रदेश अतिशय महत्त्वपूर्ण बनला आहे. या दोन्ही खनिज पदार्थांच्या साठ्यांचे सातत्याने येथे शोध घेतले जात असून नवनवीन साठे सापडत आहेत. या साठ्यांचे अधिकार तसेच आपल्या देशांच्या किंवा राज्यांच्या खऱ्या सीमांबाबत त्यांच्यात विवाद चालू आहेत.
आखातातील युद्धजन्य परिस्थितीला इतर घटकांबरोबरच खनिज साठ्यांचे अधिकार हाही एक घटक कारणीभूत झालेला आहे. उदा., १९८० – १९८८ मधील इराण – इराक युद्ध, १९९०-१९९१ मधील पर्शियन आखात युद्ध आणि २००३ – २०११ मधील इराक युद्ध इत्यादी. येथील उत्पादित खनिज तेलाचे स्थानिक रित्या मोठ्या प्रमाणावर शुद्धीकरण केले जाते. कच्च्या तेलाची निर्यातही मोठी असून ती प्रामुख्याने वायव्य यूरोप, पूर्व आशिया आणि जगातील इतर देशांना केली जाते. २००२ मध्ये पर्शियन आखाताच्या सभोवतालच्या बहरीन, इराण, इराक, कुवेत, कॉटार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांनी मिळून जगाच्या २५ टक्के तेल उत्पादन घेतले होते. खनिज तेल रसायन उद्योग आणि खनिज तेलावर आधारित इतर उद्योग, उपभोग्य वस्तुनिर्मिती उद्योग या आखाती प्रदेशात वेगाने विकसित होत आहेत. औद्योगिकीकरणामुळे औद्योगिक अपशिष्टे, इतर अपशिष्टे आणि तेलाची गळती यांमुळे आखातातील परिसंस्थांची खूप हानी झाली आहे.
अनेक शतकांपासून पर्शियन आखाती प्रदेशांचा सागरी व्यापार आफ्रिका आणि भारताशी चालत असे. त्यासाठी स्थानिक गलबतांचा वापर केला जाई. आज या आखाताच्या सभोवतालचे सर्व देश खनिज तेल उत्पादनात जगात अग्रेसर असून त्यांचा तेलाचा व्यापार जगभरातील देशांशी चालतो. त्यामुळे आज या आखातातून जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या मोठमोठ्या तेलवाहू टँकरची निरंतर वाहतूक चालू असते. खार्ग बेट (इराण), कुवेत, अल् दम्मम (सौदी अरेबिया), बहरीन, पोर्ट राशिद (संयुक्त अरब अमिराती) ही येथील प्रसिद्ध तेलवाहू केंद्रे आहेत. एकेकाळी भरभराटीस आलेली बंदरे गाळ साचल्यामुळे आज किनाऱ्यापासून दूर अंतर्भागात गेलेली आढळतात. सुमेरिया – बॅबिलोनियाचे एरिडू १९२ किमी., बसरा ११० किमी., तर आबादान हे किनाऱ्यापासून ५३ किमी. आत आहे. बंदर आब्बास, बूशीर, बंदर-इ-माहशहर, आबादान, खुर्रामशहर (इराण); बसरा (इराक); कुवेत, मीना-अल-अहमदी, मीना-अब्द-अल्लाह (कुवेत); रास तनूरा, दम्मम, धाहरान (सौदी अरेबिया); मनामा (बहरीन); दोहा (कॉटार); शारजा, दुबई, अबू धाबी (संयुक्त अरब अमिराती) ही या आखातावरील महत्त्वाची बंदरे आहेत. रेडिओ-मार्गनिर्देशन केंद्र प्रणाली आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून येथील तेलवाहू जहाजांची (टँकरची) वाहतूक नियंत्रित केली जाते; परंतु टँकरची प्रचंड संख्या आणि अपतट भागांत तेलविहिरींचे उभारलेले मंच इत्यादींचा वाहतुकीस अडथळा येतो.
प्राचीन काळापासून हे आखात पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशांमधील दुवा ठरला आहे. सुमेरियन, बॅबिलोनिया, मेसोपोटेमिया यांसारख्या प्राचीन संस्कृतींचा उदय आणि विकास या आखाताच्या उत्तरेकडील प्रदेशांत झाला होता. बॅबिलोनियन काळापासून अरबांपर्यंत प्रामुख्याने या आखातातून भारताशी व्यापार झाल्याचे दाखले मिळतात. सोळाव्या शतकापासून दुसऱ्या महायुद्धापर्यंत या आखातावर पोर्तुगीज, डच आणि मुख्यत: इंग्रज यांचे प्रभुत्व होते. पाश्चात्यांचा प्रत्यक्ष राजकीय अंमल या भागातून निघाला असला, तरी खनिज संपत्तीकरिता त्यांचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप राहिला आहे. श्रीमंतीबरोबर नेहमीच या परिसरात स्फोटक परिस्थिती राहिली आहे.
समीक्षक : माधव चौंडे