प्रसूतीनंतर ६-८ आठवड्यांचा कालावधी हा प्रसवोत्तर कालावधी (Postnatal period) म्हणून ओळखला जातो.

प्रसवोत्तर दक्षतेचे महत्त्व  : प्रसूती नंतरच्या कालावधीमध्ये मातेला शारीरिक आणि मानसिक आधाराची आवश्यकता असते. मातेची संतुलित आहारविषयक काळजी घेणे गरजेचे असते. प्रसूतीदरम्यान ओटीपोटाचे व योनिमार्गाचे स्नायू ताणल्यामुळे कमकुवत होतात. त्यांची ताकद वाढवण्यासाठी प्रसूतीनंतर व्यायामाची आवश्यकता असते. प्रसूतीनंतर कमकुवत स्नायूंची ताकद वाढवणे व शरीराची ठेवण पूर्ववत करणे महत्त्वाचे असते. स्नायूंच्या कमकुवतपणामुळे होणारी कंबरदुखी किंवा योनिमार्गातून गर्भपिशवी ऱ्हास (Prolapse uterus) यांसारख्या तक्रारी टाळण्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे.

प्रसवोत्तर तपासणी  : प्रसूती झाल्यानंतर मातेच्या रक्तदाबाची वेळोवेळी तपासणी केली जाते. तसेच पुढील २४ तासांमध्ये थकवा, ओटीपोटातील दुखावा, मूत्र असंयमितता (Urine incontinence), स्तनांचा जडपणा इ. बाबींवर देखील वैद्यकीय लक्ष दिले जाते. मातेला गर्भनिरोधन (Contraception), शारीरिक स्वच्छता आणि संतुलित आहार यांविषयी तज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जाते. प्रतिजैविके तसेच लोह आणि फॉलिक अम्लयुक्त औषधे निर्देशित केली जातात. स्तनपानविषयक माहिती दिली जाते.

स्तनपानादरम्यान आवश्यक शारीरिक ठेवण : प्रसूतीनंतर आईने बाळाला स्तनपान देत असताना विशिष्ट पद्धतीने बसावे. उदा., धारक पकड (Cradle hold), तिर्यक् धारक पकड (Cross cradle hold), चेंडूसमान पकड (Ball hold) इत्यादी.

नैसर्गिक प्रसूती झालेल्या महिलांनी घ्यावयाची काळजी : प्रसूतीनंतर फुप्फुसांची प्रसरण क्षमता वाढवणे आणि पर्यायाने ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून थकवा कमी करण्यासाठी श्वसनसंबंधित व्यायाम आवश्यक आहेत. प्रसूतीनंतर पायाची सूज कमी करण्यासाठी पाऊलांचे व्यायाम करावेत. यामुळे रक्ताभिसरण वाढते. तसेच सर्वांगाला मालिश केल्याने स्नायूंना आराम मिळतो. प्रसूतीनंतर शरीराची ठेवण पूर्ववत करण्यासाठी कंबरेची लवचिकता वाढवणारे तसेच स्नायूंचे चलनवलन वाढवणारे व्यायाम केले जातात. यामध्ये मार्जारासन, भुजंगासन, चक्राकार व्यायाम (Rotation exercise), पोटावर झोपून मान व खांदे वर उचलणे /प्रसरण (Extension) इ. व्यायाम प्रकारांचा अंतर्भाव असतो.

अंतरक स्थिरकारी व्यायाम प्रकार : (Core stability exercises). प्रसूतीनंतर ओटीपोट व योनिभाग यांतील स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी काही व्यायाम प्रकार केले जातात. त्यांना अंतरक स्थिरकारी व्यायाम प्रकार असे म्हणतात. यामध्ये पोट आत घेऊन दहापर्यंत अंक मोजणे तसेच पोट आत घेऊन एक पाय कमरेतून वर उचलणे अशा व्यायामांचा अंतर्भाव होतो. या व्यायामांमुळे लघवीला होणारा त्रास तसेच योनिभागातून गर्भपिशवी बाहेर येण्याचा त्रास टाळला जातो.

वायुजीवी व्यायाम प्रकार : (Aerobic exercises). शारीरिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुलभ वायुजीवी (उदा., चालणे) व्यायाम प्रकार दिले जातात. यामुळे शारीरिक ठेवण पूर्ववत होण्यास साहाय्य होते.

सिझेरियन प्रसूती झालेल्या महिलांनी घ्यावयाची काळजी : सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झालेल्या महिलांना टाक्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. खोकताना पोटाच्या टाक्यांवर उशीने दाब देण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे टाक्यांवर पडणारा ताण कमी होतो. स्तनपानादरम्यान टाक्यांना धक्का लागणार नाही, याची काळजी घेऊन विशेष पद्धतीने बसण्याची पद्धत शिकवली जाते. तसेच उशीचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. उदा., फुटबॉल पकड (Football hold) इत्यादी. सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर फुप्फुसांची प्रसरण क्षमता कमी होते. त्यामुळे खोकण्याऐवजी दीर्घ श्वास घेऊन जोरात श्वास बाहेर सोडण्याची क्रिया शिकवतात (Huffing). सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर पोक काढून बसण्याची सवय लागू शकते. यामुळे कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. हे टाळण्यासाठी उशीला टेकून ताठ बसण्याचा सल्ला दिला जातो. परिणामी पाठदुखी कमी होऊन पाठीला आराम मिळतो. प्रसूतीनंतर पोटात वाताचा गोळा/वायुगोळा तयार होण्याची शक्यता असते, असे झाल्यास पोट दुखू लागते. हा त्रास कमी करण्यासाठी टाक्यांभोवती मालिश करण्याचे तंत्र शिकवले जाते. तसेच सर्वांगाला मालिश केल्याने स्नायूंना आराम मिळतो.  सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे प्रसूत महिलांनी टाक्यांचा दुखावा कमी झाल्यावर, नैसर्गिक प्रसूत महिलांना सुचविल्याप्रमाणे व्यायाम करावयास सांगतात.

प्रसवोत्तर नैराश्य : (Postpartum depression). हॉर्मोनप्रेरित आणि शारीरिक बदलांमुळे काही महिलांमध्ये प्रसूतीनंतर नैराश्यात्मक भावना दिसून येतात. तसेच दैनंदिन सवयींमध्ये बदल आढळून येतात. उदा., थकवा, निद्रानाश इ. यामुळे नवजात बालकाकडे दुर्लक्ष होऊ शकते. हे टाळण्यासाठी मातेला मानसिक आधाराची आवश्यकता असते. आवश्यकता असल्यास मानसोपचार तज्ञाची मदत देखील घेण्यात येते.

पहा : नवजात शिशुदक्षता (Neonatal care).

संदर्भ :

• Mantle, Jill Physiotherapy in Obstetrics and Gyanaecology Second edition, Butterworth-Heinemann, 2004.

https://www.who.int/maternal_child_adolescent/publications/WHO-MCA-PNC-2014-Briefer_A4.pdf

https://www.ncbi.nlm.nih.gov/books/NBK304191/