दंडनीती : प्राचीन भारतीय राजकीय विचार प्रतिपादित करणारा ग्रंथ. ब्रह्मदेव हा या ग्रंथाचा कर्ता आहे. ब्रह्मदेवाचा एक संप्रदाय होता. त्याचे उपासक होते. महाभारताचे शांतीपर्व व गीता हे ग्रंथ मूळ ब्रह्मदेवाच्या संप्रदायाचे होते असा एक युक्तिवाद आहे. हा ग्रंथ राज्यशास्त्र या विषयावरील महत्त्वाचा ग्रंथ आहे. प्रथम ग्रंथ तयार केला आणि नंतर राज्यसंस्थेची निर्मिती केली ( महाभारत, १२-५९-२९) असा युक्तिवाद केला जातो. दंडनीती  या ग्रंथात एक लाख अध्यायांचा समावेश आहे. या ग्रंथाचा संक्षेप पुढे केला गेला. हे काम विशालाक्ष व अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनी केले. या ग्रंथात प्राचीन भारतीय राजकीय विचार आणि महत्त्वाच्या संकल्पना मांडलेल्या आहेत. अशोक चौसाळकर यांनी ब्रह्मदेवाच्या दंडनीती  ग्रंथात समावेश झालेल्या विषयांची एक यादी दिली आहे. ती यादी पुढील प्रमाणे आहे.
१) आन्विक्षिको, त्रयी, वार्ता व दंडनिती या चार विद्या व राज्याचे शिक्षण.
२) सप्तरंग राज्य व त्यांची कर्तव्य आणि राज्य संस्थेवर येणारी विविध संकटे व आपत्ती.
३) राजाचे अधिकार, सत्ता व कर्तव्य.
४) मंत्री परिषद रचना व कार्य
५) कायदा आणि न्याय व्यवस्था
६) राज्याच्या विविध विभागांचे व प्रदेशांचे प्रशासन
७) अंतरराज्य संबंध व मंडलसिद्धांत
८) गणराज्याचे स्वरूप व प्रशासन
९) त्रिवर्ग पुरुषार्थ – धर्म, अर्थ व काम आणि जीवनातील त्यांचे तौलनिक महत्त्व.
दंडनीती या ग्रंथात वरील महत्त्वाच्या संकल्पना आणि विषय आलेले आहेत. हा ग्रंथ काल्पनिक असला तरी यातील विषय आणि संकल्पना कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथातही आढळतात. हे पुस्तक प्राचीन भारतीय राजकीय विचारातील एक महत्त्वाचे पुस्तक आहे. त्याचे लेखक ब्रह्मदेव हे प्राचीन भारतीय राज्यशास्त्रज्ञ होते. हा युक्तिवाद प्राचीन भारतीय राज्यशास्त्राच्या संदर्भात केला जातो.

संदर्भ :

  • भट्टाचार्य, तारापद, द कट ऑफ ब्रह्मा, पाटणा, १९५७.
  • चौसाळकर, अशोक, प्राचीन भारतीय राजकीय विचार, प्रतिमा प्रकाशन पुणे, २०११.