अवसरीकर, वसंत : (१९४४). महाराष्ट्रातील लोकनाट्य, वगनाट्यातील विनोदी कलावंत. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील अवसरी या गावी झाला असून त्यांच्या वडिलांचे नाव कुशाबा, आईचे नाव रंगाबाई आणि आडनाव रोकडे असे आहे. घराण्यात तमाशाची परंपरा होती. त्यांचे आजोबा शंकरराव अवसरीकर यांचा तमाशाचा फड होता शिवाय वसंत अवसरीकर यांचे आईवडीलही तमाशा कलावंत होते. लोककलेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. वसंत अवसरीकरांचे शालेय शिक्षण झालेले नाही. वयाच्या सातव्या वर्षांपासून ते आजोबाच्या तमाशात काम करीत होते. लहानवयात त्यांनी राजा हरिश्चंद्र, रोहिदास, युवराज अशी कामे केली. जाणत्या वयात ते त्यांचे चुलते ग्यानबा अवसरीकरण यांच्याबरोबर सोंगाडकाम करू लागले. त्यांच्याकडून विनोदासाठी हजरजबाबीपणा, योग्य शब्दांचा वापर, अचूक शब्दफेक, अचूक टायमिंग हे सर्व वसंत अवसरीकरांना शिकायला मिळाले. त्यामुळे ते सोंगाडकामात तरबेज झाले. वडिलांच्या इच्छेखातर ते पेटी वाजवायला शिकले.
आजोबांचा तमाशा बंद पडल्यानंतर वसंत अवसरीकर मुंबईला गेले. तिथे ते दादू इंदूरकरांच्या तमाशात पेटीवादकाचे काम करू लागले. त्यावेळी दादू इंदुरीकरांचे गाढवाचं लग्न हे लोकनाट्य चालू होते. त्यामध्ये दिवाणजीची भूमिका हणमंत शिवणेकर हा सोंगाड्या करीत होता. दादू इंदुरीकरांचे आणि त्याचे कशावरून तरी बिनसले आणि तो तमाशा सोडून गेला. तो करीत असलेला दिवाणजीची भूमिका वसंत अवसरीकरांना मिळाली. त्यांच्या हजरजबाबीपणामुळे आणि विनोदी अभिनयामुळे त्यांची ही भूमिका अतिशय गाजली. या भूमिकेमुळेच ते उत्तम सोंगाड्या म्हणून महाराष्ट्राला परिचित झाले.
१९७३ मध्ये दादू इंदुरीकरांना संगीत नाट्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. त्या नंतर अंतर्गत कलहामुळे दादू इंदुरीकरांचा तमाशा फड बंद पडला. वसंत अवसरीकर यांनी तमाशाक्षेत्र सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात आल्यानंतर त्यांना लोकनाट्यात काम करण्याची संधी मिळाली. मात्र अडचण अशी निर्माण झाली कि वसंत अवसरीकर हे शाळा न शिकलेले, निरक्षर होते. लोकनाट्याची संहिता लिखित असते. पाठांतर करायचे असते. तमाशात असे काही नसते. तिथे उस्फूर्तपणे बोलायचे असते. लिहता – वाचता न येणाऱ्या वसंत अवसरीकरांना त्यांची पत्नी लोकनाट्य वाचून दाखवायची आणि त्यांचं पाठांतर करून घ्यायची. याच पद्धतीने वसंत अवसरीकरांनी बाई बिलंदर नवरा कलंदर, गावची जत्रा भानगडी सत्रा, पाटील बायको सांभाळा, कडी लावा आतली, कथा अकलेच्या कांद्याची, मी तुमची लाडाची मैना, सखा माझा मंत्री झाला, कशी सांभाळू दौलत लाखाची अशा अनेक लोकनाट्यातून कामे केली. त्याचप्रमाणे एक होता विदूषक, सरपंच भगीरथ, बाईसाहेब या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे. सूर्यकांत, गुलाब मोकाशी, मोहन जोशी, निळू फुले, राम नगरकर, राजा गोसावी, कुलदीप पवार, मधू कांबीकर, उषा नाईक, लीला गांधी अशा दिग्ग्ज कलावंताबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
शाळा, दवाखाने, ग्रंथालये यांच्या मदतीसाठी कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याचे अनेकवेळा प्रयोग आयोजित केले जात होते. त्यामध्ये वसंत अवसरीकर यांचा सहभाग असायचा. मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीसाठी एक वर्ष प्रशिक्षक म्हणून काम त्यांनी केले आहे. वसंत अवसरीकर यांनी प्रदीर्घकाळ लोककलेची सेवा केली असल्यामुळे त्यांना राज्य शासनाच्या वतीने विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार २००७ साली देण्यात आलेला आहे. या शिवाय निळू फुले स्मृती पुरस्कार, झी गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. मराठी भाषा विभाग आणि साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते वसंत अवसरीकर यांना उत्कृष्ट लोककलावंत म्हणून सन्मानित करण्यात आले होते.
वसंत अवसरीकरांनी अनेक लोकनाट्यातून अनेक भूमिका केल्या पण लोकांच्या स्मरणात राहिला तो त्यांनी गाढवाच्या लग्नात साकारलेला दिवाणजीचं. दादू इंदुरीकरांच्या मृत्यनंतर अनेक नाट्यसंस्थानी गाढवाच्या लग्नाचे प्रयोग केले पण त्यात दिवाणजींच्या भूमिकेसाठी अवसरीकरच असायचे. नाट्यसंस्था कोणतीही असू द्या गाढवाचं लग्न करायचं म्हटलं कि दिवाणजीच्या कामासाठी सर्वाना एकमेव नाव आठवायचं ते म्हणजे वसंत अवसरीकर. दिवाणजीचं काम इतर कलाकरांनीही केलेले आहे, पण त्यांच्या कामावरही वसंत अवसरीकरांच्या कामाचीच छाप आहे. आपल्या हजरजबाबीपणामुळे आणि वेगळ्या ढंगाच्या अभिनयाने आपण उत्तम सोंगाडे आहोत हे वसंत अवसरीकरांनी सिद्ध केलेले आहे. वसंत अवसरीकरांनी पंच्याहत्तरी जवळ केलेली आहे. वय वाढल्यामुळे त्यांनी लोकनाट्यात काम करणे बंद केले आहे.
संदर्भ :
- खुडे, सोपान, फड रंगला तमाशाचा, प्रफुल्लता प्रकाशन, पुणे.