घरे बांधताना खोल्यांची मांडणी, पाण्याची सोय, सूर्यप्रकाशाचे नियोजन, सांडपाण्याचे व्यवस्थापन अशा अनेक महत्त्वाच्या बाबींचा विचार करावा लागतो. यामध्ये वास्तुरचनाकार आणि अंतर्गत सज्जा विशेषज्ञ (Interior designer) यांची भूमिका महत्त्वाची असते.

पारंपरिक घरबांधणी : भारतीय संस्कृतीमधील पहिले नगर सिंधू संस्कृतीमधून उदयास आले, असा इतिहास आहे. मोहें-जो-दडो आणि हडप्पा ही त्या काळातील उत्खननात सापडलेली पुरातनकालीन  शहरे होत. तत्कालीन काही घरांच्या रचनेमध्ये खोलीत पाण्याच्या विहिरी सापडल्या.  दैनंदिन  वापराचे पाणी त्यामधून घेतले जात असे. शहरे नद्यांच्या काठी वसलेली असल्यामुळे घरातील विहिरींना बारा महिने मुबलक पाणी असे. शौचालय आणि स्नानगृह घरातच होते. सांडपाणी रस्त्यालगतच्या गटारात सोडले जात असे. सांडपाणी व्यवस्थापन उत्कृष्ट होते. आरोग्यदायी सुविधा आणि स्वच्छता यांना प्राधान्य दिल्यामुळे लोकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असे. अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत अनेक घरांच्या भिंती जाडजूड आणि मातीच्या विटांच्या होत्या. जाडजूड भिंतींमुळे घराचा अंतर्भाग उन्हाळ्यातही थंड राहण्यास मदत होई. जागेची कमतरता नसल्यामुळे घरे प्रशस्त होती. घराच्या मध्यभागी मोकळा चौक असून जास्तीत जास्त हवा आणि सूर्यप्रकाश अंतर्भागात येत असे.

पारंपारिक घर बांधणीचा एक प्रकार.

घराच्या अंगणातूनच सूर्य, चंद्र, तारे, आकाश, पाऊस, ऊन, वारा इ. नैसर्गिक बदलांचे दर्शन सहज होत असे. खोल्यांची उंची मोठी असल्याने हवा खेळती राहून उष्णतेचे प्रमाण कमी होत असे. सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार खिडक्यांचे आकार ठरवला जात असत. प्रकाश आणि हवा यांचे काही मूलभूत नियम असतात. प्रकाशाचा प्रवास सरळ दिशेने असतो, परंतु हवा कोणत्याही मार्गाने वळण घेते. पूर्वीच्या घरांना पश्चिमेस छोट्या आणि पूर्वेकडे मोठ्या खिडक्या असत. अनेक घरांमध्ये गरम हवेसाठी चिमणीची रचना होती. उजेडासाठी छताला झरोका/कवडसा ठेवला जात असे. विजेचा वापर न केलेली घरातील वातानुकूलित यंत्रणा कशी असते, याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. अशा रचनेमुळे घराचे अंतर्गत वातावरण आल्हाददायक आणि उत्साहवर्धक राहत असे आणि याचा सकारात्मक परिणाम घरातील व्यक्तींवर होत असे.

वास्तुरचनेचे महत्त्व : घराची रचना करताना सूर्यप्रकाश, दिशा, बांधकाम साहित्य, आधुनिक तंत्रज्ञान, वास्तुशास्त्रातील योग्य नियम, चुंबकीय क्षेत्र यांचे एकत्रिकरण केल्यास सुंदर घराची निर्मिती होऊ शकते. निसर्गातील अनेक गोष्टी माणसाला प्रेरणादायी असतात. अनेकदा नैसर्गिक आपत्ती उद्भवतात तेव्हा आपण पटकन निसर्गाला दोष देऊन मोकळे होतो. परंतु अनेकदा अशा आपत्ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित होत्या हे कालांतराने सिध्द होते. उदा., पावसाळ्यात अनेकदा डोंगराची दरड कोसळून पायथ्याशी असणारे गाव उद्ध्वस्त होते. घरे जमीनदोस्त होऊन मनुष्यहानी होते. आपण याला नैसर्गिक आपत्ती म्हणतो. परंतु हाच डोंगर आधी कोणीतरी पोखरल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली असते. म्हणूनच घरांची निर्मिती करताना निसर्गाशी बांधिलकी राखणे महत्त्वाचे असते. विशेषत: डोंगरमाथ्यावर घरे बांधताना पर्यावरणाचा विनाश होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असते. घर बांधताना वास्तुरचनाकार आणि त्यानंतर लागणाऱ्या अंतर्गत सजावटीसाठी अंतर्गत सज्जा विशेषज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक असते. अभ्यासू आणि अनुभवी वास्तुरचनाकार घराची रचना करतानाच हवा, उजेड, दिशा आणि इतर आवश्यक गोष्टींची अचूक सांगड घालतो.

घराची अंतर्गत रचना करताना वास्तुरचनाकाराने ग्राहकाच्या गरजांना ८०% आणि सजावटीला २०% असे प्राधान्य द्यावे. परंतु बाह्यरचना करताना स्वत:च्या कल्पनाशक्तीला ८०% आणि ग्राहकाच्या गरजेला  २०% असे प्राधान्य द्यावे.