सुलह कूल : सुलह कूल ही मध्ययुगीन राजकीय विचारातील संकल्पना आहे. सुलह कूल  (Sulhikul) हा एक अरबी शब्द असून, ज्याचा शाब्दिक अर्थ सूफी रहस्यवादी तत्त्वानुसार वैश्विक शांती किंवा संपूर्ण शांती असा आहे. तिसरा मुघल सम्राट अकबर याने (शासन काळ : १५५६-१६०५) आपल्या राज्यात ही संकल्पना लागू केली. जिचे वर्णन, वेगवेगळ्या धर्मांमधील शांततापूर्ण आणि सुसंवादी संबंध असे केलेले आहे. आपल्या राज्यातील भिन्न लोकांना एकमेकात गुंफण्याच्या प्रयत्नातून, अकबराने मानवा-मानवातील ऐक्य व शांतीची संकल्पना मांडली. सुलह कूल संकल्पनेतून केवळ सहिष्णुता एवढाच अर्थ सूचित होत नाही, तर समतोल, सौजन्य, परस्पर आदर आणि तडजोड असाही अर्थ प्रतिध्वनित होतो. भिन्न लोकांमध्ये ऐक्य व सुसंवाद राखण्यासाठीया सर्व बाबींची आवश्यक असते.

मूलतः अकबराच्या कारकिर्दीत व त्याच्या नंतर काही काळ मुघल दरबारात सुलह कूलचे धोरण राबवले गेले. भारतातील काही सुफी चळवळीमधून सुद्धा सुलह कूल याचा वापर केला जात असे. प्रामुख्याने आज ही संज्ञा, मुघल संस्कृती व भारतातील सूफी चळवळीच्या क्षेत्रात संशोधन करणारे इतिहासकार, कला इतिहासकार, अभ्यासक आणि काही प्रमाणात इतर विद्वान आणि शांततावादी कार्यकर्त्यांकडून वापरली जाते.

आंतरधर्मीय चर्चाविश्वात, विधायक सुसंवादासाठी सहिष्णुता महत्वाची मानली जाते. त्यामुळे सुलह कूल या संकल्पनेला भिन्न सांस्कृतिकता व आंतरसांस्कृतिक चर्चेमध्ये महत्व प्राप्त झाले आहे. सुलह कूल ही संकल्पना धार्मिक सहिष्णुता, सर्वांना समान वागणुक आणि सार्वत्रिक शांततेच्या प्रस्थापनेसाठी मांडण्यात आली. बहुल सांस्कृतिक लोकांमध्ये, जिथे वारंवार धार्मिक संघर्ष होतात, तिथे ही ऐतिहासिक संकल्पना पुनर्जीवित करून, आधुनिक साधन म्हणून उपयोगात आणण्यास उपयुक्त आहे. याबरोबर बहुसांस्कृतिक कार्य शक्तींचे व्यवस्थापन करण्यात सुद्धा ही संकल्पना मार्गदर्शक ठरू शकते.

संदर्भ :

  • https://bharatdiscovery.org/india/