दांडेकर, सोनोपंत : (२० एप्रिल १८९६ — ९ जुलै १९६८). महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचे विख्यात भगवद्भक्त, श्री ज्ञानेश्वरीचे संशोधक, संपादक आणि संतवाड्.मयाचे अभ्यासक. त्यांचे मूळ नाव शंकर वामन दांडेकर असून ते सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकर या नावाने अधिक परिचित होते. त्यांचा जन्म एका सुशिक्षित-सुसंस्कृत कुटुंबात ठाणे जिल्ह्यातील केळवे येथे झाला. त्या सुमारास दांडेकर कुटुंबीय केळवे माहीम येथे राहत होते; परंतु  मलेरियाच्या साथीमुळे त्यांच्या जन्मासमयी दांडेकर कुटुंब केळवे येथील वाडीत राहायला गेले होते. ते दीड वर्षांचे असताना त्यांचे मातृछत्र हरपले; मात्र वडिलांनी त्यांच्या शिक्षण-संवर्धनाकडे पूर्ण लक्ष दिले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण केळवे माहीमच्या प्राथमिक शाळेत पूर्ण झाले. पुढे ते माध्यमिक शिक्षणासाठी त्यांच्या बंधूंसह पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात दाखल झाले (१९०५) आणि मॅट्रिकची परीक्षा उत्तम रीत्या उत्तीर्ण झाले (१९१२). त्याच सुमारास ते विष्णुबुवा जोग या साक्षात्कारी पुरुषाच्या संपर्कात आले. विष्णू नरसिंह जोग तथा ‘जोग महाराज’ हे वारकरी संप्रदायाचे एक अध्वर्यू होते व लोकमान्य टिळकांचे निकटचे मित्र होते. सोनोपंतांना जोग महाराजांमुळे हरिभक्ती व देशभक्तीबरोबरच ज्ञानेश्वरीची गोडी लहान वयात लागली. पुढे त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. पदवी घेतली (१९१७). त्या काळी रॅंग्लर र. पु. परांजपे, गुरुदेव रा. द. रानडे अशा अनेक नामवंत व्यक्ती तेथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. त्यांपैकी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक गुरुदेव रानडे व जोग महाराज या दोन उत्तुंग व्यक्तींच्या सहवासाचा सोनोपंतांच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. त्यांना मुंबई विद्यापीठाची प्रल्हाद सीताराम स्कॉलरशिप मिळाली आणि पुढे ते गुरुदेव रानडे यांच्या सांगण्यावरून पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो हा विषय घेऊन एम.ए. झाले (१९१९).

त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे या प्रसिद्ध शिक्षण संस्थेचे आजीव सदस्यत्व घेऊन शिक्षणक्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला व न्यू पूना कॉलेजात (सध्याचे स. प. महाविद्यालय) तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे सोनोपंतांनी तत्त्वज्ञान मंडळाची स्थापना केली (१९२१). त्या मंडळात व्याख्यान देण्यासाठी डॉ. राधाकृष्णन् आले असताना ते सोनोपंतांविषयी म्हणाले, ‘‘I see nothing less in Prof. Dandekar a true follower of my friend Prof. R.D. Ranade – a great philosopher of today.’’ वरील उद्गारावरून तरुणपणीच त्यांची योग्यता किती होती, हे स्पष्ट होते.

यानंतर सोनोपंतांनी अनुक्रमे नू. म. विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून १९३४ ते १९४० पर्यंत धुरा वाहिली आणि पुढे ते मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयाचे उपप्राचार्य झाले (१९४०) व पुण्यातील स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य झाले (१९४५) आणि तिथूनच ते निवृत्त झाले (१९५०). प्राचार्यपदी असताना त्यांनी प्रसाद मासिकाचे संपादक (१९४७) म्हणून काम केले. पुणे विद्यापीठाच्या स्थापनेत पुढाकार घेतला (१९४९) आणि अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषविले (१९५१). अध्यापन करीत असताना त्यांची एक अट होती. ती म्हणजे प्रत्येक आषाढीत वारीच्या वेळी रजा मिळावी. त्यामुळे त्यांनी पंढरीची वारी कधीच चुकविली नाही. ­­­­वारकर्‍यांचे प्रबोधन, अंधश्रद्धांचे निर्मूलन, धर्मग्रंथांचे सादरीकरण, कीर्तनसंस्थेचे पुनरुज्जीवन, लोकशिक्षण हे त्यांच्या वारीचे हेतू होते.

निवृत्तीनंतर त्यांनी नेवासे येथील ज्ञानेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला (१९५३). नेवासे येथील शंकराच्या मंदिरात ज्या एका खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ सांगितली, ते मंदिर कालौघात पडले; परंतु तो खांब टिकून राहिला. त्या खांबाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी भव्य ज्ञानेश्वर मंदिर बांधले (१९६३). जत संस्थानच्या राणीसाहेबांनी सोनोपंतांना गुरुस्थानी मानले होते. राणीसाहेबांनी सोन्याचा कळस ज्ञानेश्वर माउलीच्या चरणी अर्पण केला व त्याची स्थापना सोनोपंतांच्या हस्ते करण्यात आली. याशिवाय त्यांनी पिंपळनेर येथील संत निळोबाराय मंदिर, पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.

ज्ञानेश्वरीची अर्थासह संशोधित आवृत्ती काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे सोनोपंतांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली (१९५६). सार्थ ज्ञानेश्वरीचे प्रकाशन हे सोनोपंतांचे महत्त्वाचे योगदान होय. या ग्रंथाला त्यांनी लिहिलेली अभ्यासपूर्ण प्रस्तावना स्वतंत्र ग्रंथाच्या तोडीची आहे. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ज्ञानेश्वरीच्या राजवाडे संशोधित प्रतीच्या संपादनातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. या समितीने ज्ञानेश्वरीची संशोधित आवृत्ती तयार केली. तिला सोनोपंतांची १५० पानांची प्रस्तावना असून ती सोनोपंतांची ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध आहे. तिच्या शेवटी कठीण शब्दांचा कोश सुलभ अर्थाद्वारे (सोपपत्तिक) जोडला आहे. त्यांनी गावोगावी कीर्तने-प्रवचने करून सर्वसामान्य लोकांना नीतिधर्माचा उपदेश करून त्यांना अंधश्रद्धामुक्त असा सन्मार्गाचा रस्ता दाखविला. शिवाय त्यांनी ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा, भावार्थ रामायण इत्यादी संत-साहित्य संशोधित करून शुद्ध स्वरूपात लोकांपुढे ठेवले. ज्ञानदेव आणि प्लेटो, ईश्वरवाद, अध्यात्मवादाची मूलतत्त्वे, अभंग-संकीर्तन—भाग १,२,३, ज्ञानदेव चरित्र, वारकरी पंथाचा इतिहास, गीतेच्या श्लोकावर प्रवचने, जोग महाराजांचे चरित्र इ. मौलिक ग्रंथ लिहिले. तसेच अनेक ग्रंथांचे संपादनही केले.

ईश्वरवाद या ग्रंथात त्यांनी एकेश्वरवाद, नास्तिकवाद, देवधर्माचे भवितव्य व ईश्वरदर्शन या विषयांची चर्चा केली आहे.

अध्यात्मवादाची मूलतत्त्वे या ग्रंथात त्यांनी अध्यात्मवादाचा उगम तसेच विज्ञान, मानसशास्त्र, नीतिधर्म इत्यादी ज्ञानशाखांशी अध्यात्मवादाचा काय संबंध आहे, याचीही मीमांसा केली आहे.

श्री ज्ञानदेव चरित्र या ग्रंथात त्यांनी ज्ञानदेवांचे चरित्र आणि तत्त्वज्ञान यांच्याशी सामान्य वाचकांचा स्थूल परिचय व्हावा, या उद्देशाने ज्ञानदेवांच्या तत्त्वज्ञानाचा ऊहापोह केला आहे.

गीतेच्या श्लोकांवरील प्रवचने या ग्रंथात त्यांनी परमात्म्याचा अपरोक्षानुभव, त्याचे सर्वव्यापी दर्शन व त्याच्याशी समरसता ही कोणत्या साधनाने प्राप्त होते, हे सांगितले आहे.

वारकरी पंथांचा इतिहास या ग्रंथात वारकरी पंथांचे ओझरते दर्शन व तत्त्वज्ञान यांची चर्चा त्यांनी केली आहे.

अभंग-संकीर्तन भाग—१ हा ग्रंथ लिहिण्याचा उद्देश वारकरी हे अभंगांवर ज्या पद्धतीने निरूपण करतात, ती पद्धत अ-वारकरी जिज्ञासूंच्या समोर मांडावी, असा आहे. अभंग-संकीर्तन भाग—२ या कीर्तनमालेत प्रसादच्या अंकांतून प्रसिद्ध झालेले नऊ अभंग व नवीन दोन अशा अकरा अभंगांची कुसुममाला गुंफली आहे. यात भजनात अपरिचित असणाऱ्या तुकोबांच्या तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकणारे पण सामान्यतः माहीत नसणारे रसाळ अभंग दिलेले आहेत. अभंग-संकीर्तन भाग—३ यामध्ये श्री ज्ञानदेव, श्री नामदेव, श्री एकनाथ, श्री तुकोबा व श्री निळोबा या वारकरी संतांचे बारा अभंग आहेत.

धार्मिक ग्रंथांची पारायणे करण्यापेक्षा त्यातले विचार आचरणात आणा; धर्माला अध्यात्माची जोड द्या; धर्म म्हणजे आत्मधर्म, तो साधण्यासाठी भक्तिप्रधान, उदार भागवतधर्माची गरज आहे, असे विचार त्यांनी मांडले. कीर्तनासाठी अभंग घेताना त्यांनी रामदासी संप्रदायाचाही समावेश जाणीवपूर्वक करून घेतला. अनेक फडाफडांमधील द्वेषभाव काढून टाकण्यासाठी एका फडावरचे, दुसऱ्या फडावरचे कीर्तन असा भेद करून कीर्तन ऐकायला आडकाठी केली नाही. कोणत्याही देवतेच्या कोणत्याही मंदिरात कीर्तनाला (कीर्तन करण्यास व ऐकण्यास) पूर्ण मुभा दिली.

श्रीक्षेत्र आळंदी येथे गुरुवर्य जोग महाराजांनी भूषविलेल्या वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सोनोपंतांनी बराच काळ समर्थपणे सांभाळली होती.

विद्याविभूषित प्राचार्यपद भूषविणाऱ्या या तत्त्ववेत्त्याने महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या अंतःकरणात प्रेमादराचे स्थान मिळविले. जुन्या परंपरा आणि नव्या कल्पना यांमध्ये भावभक्तीचा जिवंत जिव्हाळा निर्माण करून त्यांची सोनोपंतांनी सोज्ज्वळ सांगड घातली. मराठी साहित्यात राजवाड्यांच्या ज्ञानेश्वरीनंतर दांडेकरांच्या ज्ञानेश्वरीचे नाव घेतले जाते. ती त्यांच्या जीवनभराच्या अभ्यासाचे फलित होय. तिच्यातील ओव्यांचा अर्थ अत्यंत सुबोध नि रसाळ भाषेत देऊन त्यांतील अनेक गहन स्थळे सोप्या भाषेत सर्वसामान्य वाचकांना सहज समजतील, अशी उपलब्ध केली आहेत.

आजन्म ब्रह्मचारी राहून संसाराच्या मोहपाशात स्वतःला न अडकवता त्यांनी इतरांचे संसार सुखी कसे होतील, याची अहर्निश चिंता बाळगली. विद्यादान, ज्ञानप्रसार व समाजसेवा हेच आपले ध्येय मानून ते अखेरपर्यंत सतत कार्यरत होते.

संतांचा धर्म आणि विद्यमान अणुयुगाचे मर्म यांचा समन्वय त्यांच्या विचारात, उक्तीत आणि वृत्तीत आढळतो. भक्तिमार्गाला अद्ययावत शास्त्रशुद्ध कल्पनांची जोड देऊन सोनोपंतांनी या पंथाला व्यापक, नित्य, नवे, चैतन्ययुक्त आणि बुद्धिप्रामाण्यवादी रूप दिले. विचाराने आणि आचारानेही तत्त्वज्ञानी राहिलेल्या सोनोपंतांचे वयाच्या ७१ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.

तत्त्वज्ञान, अध्यात्म हे ग्रंथांत ठेवावयाचे विषय नाहीत. ते सरळ, सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे कार्य सोनोपंतांनी जन्मभर केले. पाश्च्यात्त्य आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला. त्याचे फलित म्हणजे त्यांचा प्लेटो व ज्ञानेश्वर यांच्यावरील ज्ञानदेव आणि प्लेटो हा तुलनात्मक ग्रंथ होय. संत-साहित्य प्रकाशन समितीवर त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले. सोनोपंत जन्मभर काही सांगत राहिले. ज्यांनी ते ऐकले, अनुभवले, त्यांना आपल्यावर अमृताचा घडा ओतला गेल्याची अनुभूती आली, धन्यता वाटली. स. प. महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवाचा प्रारंभ त्यांच्या कीर्तनाने झाला. वारकरी पंथाचे ते आधारस्तंभ होते. त्यांनी सोन्याचा पिंपळ प्रत्येक वारकर्‍याच्या अंगणात लावला, असे म्हटले जाते.

सोनोपंतांची स्मृती निरंतर राहावी म्हणून त्यांच्या मृत्यूनंतर पालघरमधील कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीची स्थापना करून महाविद्यालय सुरू केले (१९७०).

संदर्भ :

  •  दांडेकर, शंकर वामन, अध्यात्मवादाची मूलतत्त्वे, पुणे, २०१५.
  •  नेउरगांवकर, स. के. सोनोपंत : चरित्र व कार्य, प्रथम आवृत्ती, १९६९.
  •  पाटील, रामचंद्र गोपाळ, प्रा. सोनोपंत दांडेकर चरित्र, पुणे, १९६८.
  •  पाठक, यशवंत, येणे बोधे आम्हा। असो सर्व काळ।। , मुंबई, २००८.

समीक्षक – सदानंद मोरे

प्रतिक्रिया व्यक्त करा