पउमचरिय : महाराष्ट्री प्राकृतातील एक चरित-महाकाव्य. ‘पद्मचरित’ हे त्याच्या नावाचे संस्कृत रूप. रामकथा सांगण्याचा हेतू ह्या महाकाव्यरचनेमागे आहे. रामाच्या अप्रतिम सौंदर्यामुळे जैन पुराणांनी त्यास ‘पद्म’ (कमल) असे म्हटले आहे. ह्या महाकाव्याची एकूण ११८ पर्वे वा सर्ग आहेत. विमलसूरी हा ह्या महाकाव्याचा कर्ता. विमलसूरी कोणत्या काळात होऊन गेला, त्यासंबंधी वेगवेगळी मते आहेत. ती लक्षात घेता, इ. स.च्या पहिल्या शतकापासून चौथ्या शतकापर्यंत केव्हा तरी तो होऊन गेला असावा, असे दिसते.
राम आणि लक्ष्मण ह्यांची गणना जैन आपल्या शलाकापुरुषांत (महापुरुषांत) करतात. त्यांच्या दृष्टीने राम अणि लक्ष्मण हे आठवे बलदेव-वासुदेव होत. राजा श्रेणिक व गौतम गणधर यांच्या संवादाच्या पार्श्वभूमीवर विमलसूरीने जैनमतानुसार आपली रामकथा मांडलेली आहे. वाल्मीकि रामायण अनेक विपरीत आणि असंभवनीय अशा गोष्टींनी भरलेले आहे, अशी विमलसूरीची भूमिका आहे. उदा., रावण हा राक्षस असून तो मांस खात असे ,इंद्राचा पराभव करून रावणाने त्याला शृंखलाबद्ध अवस्थेत लंकेस आणिले इत्यादी. रावणास दशानन म्हटले जाते, त्याचे कारण ह्या महाकाव्यात दिले आहे. रावणाच्या आईने त्याच्या गळ्यात नवरत्नांचा सुंदर हार घातला होता. त्या हारातील प्रत्येक रत्नात एक, अशी रावणमुखाची नऊ प्रतिबिंबे पडत असत. ही नऊ प्रतिबिंबे आणि रावणाचे प्रत्यक्ष मुख मिळून तो दशानन झाला. भीमारण्यात जाऊन त्याने अनेक विद्यांचा अभ्यास केला होता. तो जिनेंद्राचा भक्त होता अनेक जिन मंदिरे त्याने उभारली होती. दंडकारण्यात राहत असताना लक्ष्मणाने रावणाची बहीण चंद्रनखा हिच्या शंबूकनामक पुत्राला ठार केले होते. तिचे दुःख पाहून रावण आपल्या पुष्पक विमानात बसून आला व सीतेला त्याने पळवून नेले. एका मुनीकडे रावणाने परदारात्यागाचे व्रतही घेतले होते. सीतेला संतुष्ट करून तिच्या पूर्ण संमतीनेच तिला प्राप्त करून घेण्याचा रावणाचा निश्चय होता. पुढे जे युद्ध झाले, त्यात रावण रामाकडून नव्हे, तर लक्ष्मणाकडून मारला गेला असे त्यात म्हटले आहे. स्वतःविषयीचा संशय नष्ट करण्यासाठी सीतेने अग्निदिव्य केले; परंतु त्यातून यशस्वीपणे बाहेर आल्यानंतर तिने जैन धर्माची दीक्षा घेतली. लवकुशांनीही दीक्षा घेतली. रामाने तपाचरण करून निर्वाणपद मिळविले. विमलसूरीच्या ह्या महाकाव्याने रामकथेवर लिहिणाऱ्या जैनांसाठी एक आदर्शच निर्माण करून ठेवला, असे दिसते. सातव्या शतकात दिगंबर जैन आचार्य रविषेण ह्याने संस्कृतात लिहिलेल्या पद्मपुराणावर विमलसूरीचा प्रभाव आहे. ह्या महाकाव्याची हेर्मान याकोबीने संपादिलेली प्रत १९१४ मध्ये प्रसिद्ध झाली.