वनस्पतिशास्त्राच्या वर्गीकरणशाखेत वनस्पतींचे नमुने अभ्यासाकरिता जपून ठेवण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. सगळ्या वनस्पती सर्वकाळ उपलब्ध होत नाहीत, शिवाय वर्गीकरण दृष्ट्या शाकीय अवयवांपेक्षा त्यांच्या फुलांचा आणि फळांचा उपयोग अधिक परिणामकारक असतो हे लक्षात घेता त्यांचे योग्य जतन करणे आवश्यक असते. त्यामुळेच या वनस्पतींची फांदी, पर्णरचना, कळ्या (द्लपुंजे पुंकेसर, स्त्री – केसर यांच्यासह), फुले, फळे, बिया इ. भाग शास्त्रशुद्ध पद्धतीने जाड कागदावर दोऱ्याने शिवून किंवा चिकटवून ठेवले जातात. या वनस्पतीबद्दलची सविस्तर माहितीदेखील त्यावर नोंदविलेली असते आणि असे सर्व वनस्पतींचे नमुने एखाद्या ग्रंथालयातील पुस्तकाप्रमाणे वनस्पतिसंग्रहालयात साठविले जातात.
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, स्थानिक (विद्यापीठे/संशोधन संस्था) किंवा अगदी एखाद्या प्रजातीच्या पातळीवरदेखील अशी वनस्पतिसंग्रहालये उभारता येतात. त्याद्वारे साहजिकच कोणत्याही स्थळ – काळाच्या बंधनाशिवाय त्यांचा अभ्यास करता येतो. परंतु हे नमुने बारकाईने न्याहाळण्यासाठी या वनस्पतिसंग्रहालयात समक्ष भेट द्यावी लागते. या नमुन्यांची उत्तम देखभाल करावी लागते, शिवाय वाळवी, किडे, बुरशी किंवा पाऊस, आग अशा संकटांपासून त्यांचे रक्षण करणे अतिशय जिकीरीचे काम होऊन बसते. यासाठी आवश्यक तो निधी, जागा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ मिळणेही आता कठीण होत आहे. त्यामुळेच या परंपरागतपद्धतीला काही सक्षम पर्याय शोधण्याची गरज ओळखून हे वनस्पती नमुने (Plant specimen) आभासी (Virtual) किंवा अंकीय प्रकारात जतन करण्याची सुरुवात झाली. त्यासाठी असे सर्व उपलब्ध नमुने तपासून अंकीय प्रकारात परावर्तीत केले जातात आणि अणुविद्युत माध्यमात संग्रहित करण्यात येतात. यामुळे प्रत्येक वेळी या वनस्पतीच्या नवनव्या फांद्या तोडण्याची आवश्यकता नसते आणि त्यामुळे एक प्रकारे दुर्मिळ वनस्पतींचे त्यांच्या अधिवासात रक्षण करण्यास हातभार लागतो.
अंकीय जतनापूर्वीची तयारी व प्रक्रिया, प्रतिमेचे अंकन (Image mapping), प्रतीमेवरील संस्कार (Image processing), अणूविद्युत प्रकारातील माहितीचे संकलन व माहितीचे भौगोलिक संदर्भीकरण (Georeferencing) हे अंकीय माहितीस्रोत तयार करण्यासाठीचे टप्पे आहेत. सूक्ष्म निरीक्षण करण्यासाठी सदरचे नमुने अतिशय अधिक विभेदन क्षमतेने अंकित करावे लागतात. साहजिकच त्यामुळे मोठ्या आकाराच्या संगणकीय नस्त्या तयार होतात आणि त्या हाताळताना उच्च क्षमतेच्या संगणकांचा वापर करावा लागतो.
या प्रकारचे अंकीय नमुने सहजगत्या उपलब्ध होतात आणि अधिकाधिक लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. वनस्पतींचे नमुने, छायाचित्र, समीपदृश्ये यांसह सगळ्या माहितीच्या नोंदी उपलब्ध होत असल्याने जनजागृतीसाठी त्याचा चांगला वापर करता येऊ शकतो. त्याद्वारे स्थानिक किंवा देशपातळीवरील वनस्पती विविधता, प्रजातीतील विविधता, औषधी किंवा अन्य उपयुक्त वनस्पतींचा अभ्यास करणे शक्य होते.
जगभरात विविध वनस्पती उद्याने, विद्यापीठे, शासकीय किंवा खाजगी वनस्पतिसंग्रहालये यांनी अशी अंकीय नमुन्याच्या कितीतरी पेढ्या तयार केल्या आहेत. लंडन येथील क्यू वनस्पती उद्यान, उष्ण कटिबंधीय मिसूरी उद्यान, हार्व्हर्ड विद्यापीठ अशा जगप्रसिद्ध उदाहरणाबरोबर आपल्याकडे भारतीय वनस्पती सर्वेक्षण यांचे मध्यवर्ती राष्ट्रीय नमुने संग्रहालय, हावरा येथील वनस्पतिसंग्रहदेखील अंकीय स्वरुपात उपलब्ध आहे. कर्नाटक राज्याचे वनस्पती वैभवदेखील अंकीय स्वरूपात उपलब्ध आहे.
संदर्भ :
- Datar, Mandar and Ghate Vinaya, A need for online Herbaria in India, Current Science 97 (4): 470-471, 2009.
- https://herbariumworld.wordpress.com/category/digital-collections/
समीक्षक : शरद चाफेकर