अधोमुखी बीजकाचा लंब छेद

सपुष्प वनस्पतींमधील प्रत्येक बीजक हे लांबट व बारीक अशा बीजबंधाने (funiculus) बीजकधानीला (Placenta) जोडलेले असते. या जोडणीच्या भागाला नाभी (Hilum) म्हणतात. कित्येकदा बीजबंध या नाभीपुढे वाढत जाऊन कंगोरा तयार होतो ज्यास संधिरेषा (Raphe) असे म्हटले जाते. या बीजबंधामधून वाहक – वृंद (Vascular bundle) बीजकधानी ते बीजकतलाकडे (Chalaza) पोहोचतात. प्रदेहच्या (Nucellus) तळाशी जेथे संधिरेष संपते व अध्यावरण (Integuments) विखुरतात तो भाग म्हणजे बीजकतल. बीजबंध व बीजकतल हे मध्यवर्ती असून ते प्रदेह व अध्यावरण यांसारखे सुस्पष्ट नसतात.

बीजकाचे प्रकार : अ) ऊर्ध्वमुखी, ब) अधोमुखी, क) वक्रमुखी, ड) तिर्यङ्मुखी.

प्रदेह हा गुरुबीजुककोशाचा (Megasporangium) भाग असून यात न्युनीकरण विभाजन (Meiotic division) होऊन ४ गुरुबीजुक तयार होतात; ज्यांपैकी केवळ एक भृणकोशात (Embryo sac) विकसित होते. या भृणकोशात होणाऱ्या समविभाजनावरून ४ वा ८ केंद्रक हे ४ ते ७ कोशिकांमध्ये समाविष्ट होतात. ह्या कोशिका अंड कोशिका (Egg cells) म्हणून ओळखल्या जातात. या दोन साहाय्यक कोशिकांसोबत (Synergids) मिळून अंदुक परिवार (Egg apparatus) बनवितात व मध्यवर्ती एक मोठी कोशिका जमा होते. जर ७ कोशिका असतील, तर या ४ कोशिकांच्या व्यतिरिक्त ३ तलस्थ कोशिका (Antipodal cells) ह्या अदुंक परिवाराच्या विरुद्ध बाजूस एकवटतात. प्रदेहच्या भोवती असलेल्या अध्यावरणांमुळे अरुंद असे बीजकरंध्र (Micropyle) तयार होते; ज्यातून परागनलिका प्रदेह व भृणकोशात शिरून फलन – प्रक्रिया होते व युग्मज (Zygote) निर्माण होते.

सर्वसाधारणपणे बीजकाचे (बीजकरंध्र ज्या दिशेने उघडते व बीजबंधाशी कितीचा कोन बनतो त्यानुसार) चार प्रकार आहेत. जेव्हा बीजक सरळ असते जेणेकरून बीजबंध, बीजकतल आणि बीजकरंध्र हे एकाच दिशेत सरळ व उभ्या स्वरुपात येतात तेव्हा त्या बीजकास ऊर्ध्वमुखी बीजक (Orthotropous ovule) म्हणतात. जर बीजक बीजबंधासह खालच्या दिशेस वाकलेले असून बीजकरंध्र हे नाभीजवळ असेल आणि त्यामुळे केवळ बीजकरंध्र व बीजकतल हेच एका दिशेत सरळ असतील तर अधोमुखी बीजक (Anatropous ovule) तयार होते. हा सर्वसामान्य बीजक प्रकार पुष्कळ फुल-प्रजातींमधे आढळतो. तिर्यङ्मुखी बीजकात (Amphitropous ovule) बीजक आडवे असून बीजबंधाशी ९०° कोन करते. काही वेळा आडवे बीजक वाकून नालाकृती बनते आणि बीजकरंध्र व बीजकतल हे एकाच सरळ दिशेत येत नाहीत. अशा प्रकारास वक्रमुखी बीजक (Campylotropous ovule) असे संबोधले जाते.

संदर्भ :

  • Endgress, P. Angiosperm ovules : diversity, development, evolution, Annals of Botany,107: 1465-1489, 2011.

समीक्षक : शरद चाफेकर