एक इस्लामी धर्मपंथ. शिया पंथाचाच हा एक उपपंथ असून तो इमाम जाफर अल्-सादिक यांच्या मृत्यूनंतर ७६५ च्या सुमारास उदयास आला. इस्माइली पंथाच्या अनेक शाखोपशाखा झाल्या. इस्माइल हे अल्-सादिक यांचा मुलगा. यांच्याच नावावरून पंथास ‘इस्माइली पंथ’ हे नाव पडले. ‘इस्माइली’ या नावाने हा पंथ नवव्या शतकाच्या मध्यास संघटित होऊन विशेष प्रसिद्धीस आला. या काळात या पंथाचे प्रचारक जगातील विविध भागांत गेले आणि इस्माइल यांचा मुलगा इमाम मुहंमद हेच प्रेषित मुहंमदांचा ‘महदी’ अथवा ‘मसीहा’ असल्याचे सांगू लागले. इमाम मुहंमद यांना सातवा इमाम मानणारे ‘सबीया’ ठरले. इस्माइली पंथाची सुरुवातीच्या काळातील एक विशेष ख्यातनाम शाखा म्हणजे ‘करामिता’ अथवा ‘कर्मेथियन’ ही होय. हम्‌दान कर्मत या नेत्यांच्या नावावरून या शाखेस हे नाव पडले. ८९३ च्या सुमारास करामिता शाखेचे फातिमी शाखेशी वितुष्ट आले. उबैदुल्ला हे फातिमी परंपरेतील पहिले इमाम इफ्रिक्रियात (सध्याचा ट्युनिशिया) ९०९ मध्ये सत्ताधीश झाले आणि त्यांनी स्वत:स मुहंमद पैगंबरांचा (पैगंबरांच्या फातिमा ह्या मुलीकडून) अधिकृत वंशज-वारस म्हणून जाहीर केले. ९६९ मध्ये फातिमींनी ईजिप्त जिंकला. ईजिप्तमध्ये सु. दोन शतके टिकलेले फातिमींचे साम्राज्य, इस्लामी संस्कृतीचे प्रभावी केंद्र होते. ह्या केंद्राचे अनुयायी इस्लामी जगात सर्वत्र पसरले होते. त्यामुळे ह्या पंथाची एक प्रभावी व मजबूत संघटना निर्माण झाली. कुराणाचा रूपकात्मक अर्थ विषद करणे व धार्मिक आचाराचा सांकेतिक अर्थ इमामांना आणि पंथाच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट करून सांगणे, हे त्यांचे कार्य होते. नव-प्लेटोमताची शिकवणही त्यांनी स्वीकारली व त्यावर आधारित असा एक तत्त्वज्ञानाचा रसाइल इख्वान अस्-सफा नावाचा विश्वकोशही त्यांनी ह्याच काळात रचला.

अल्‌-हाकीम यांच्या कारकिर्दीत (९९६−१०२१) ड्रूसेस यांनी इमाम हे ईश्वरावतार आहेत, असे प्रतिपादिले आणि ते ह्या पंथाच्या संघटनेतून फुटून वेगळे झाले.

अल्-मुस्तानसिर (मृ. १०९४) यांनंतर इमामांचा वैध वारस कोण? याबाबत इस्माइली पंथात मोठी फूट पडली. ईजिप्तमध्ये इमामांचा मुलगा अल्-मुस्ताली यांनी गादी बळकावली; परंतु पर्शिया व सिरियातील इस्माइलींनी मात्र अल्-मुस्ताली यांचे थोरले बंधू अल्-निझार यांचाच गादीवर खरा हक्क असल्याचे प्रतिपादिले. त्यामुळे या पंथात, एक मुस्तालींचा आणि दुसरा निझारींचा असे दोन गट पडले. ईजिप्तमध्ये सलादीन याने ११७१ मध्ये जेव्हा फातिमी परंपरेतील अखेरच्या इमामांचा शेवट केला, तेव्हा ईजिप्तमधील इस्माइली पंथाचा अंत झाला. तथापि येमेनमध्ये मात्र या पंथाची अल्-मुस्ताली शाखा टिकून होती. असे असले, तरी या शाखेनेही फातिमी परंपरेतील शेवटच्या चार इमामांना (अल्-मुस्ताली यांचा मुलगा अल्-अमीर यांच्या नंतरचे चार इमाम) मान्यता दिली नाही. म्हणून या शाखेसही नंतर इमामपरंपरा उरली नाही. त्यामुळे या शाखेचे नियंत्रण संघटनाप्रमुखांकडून होऊ लागले. या प्रमुखास ‘दाई’ म्हणत. या पंथाची मुस्ताली शाखा येमेनमधून हिंदुस्थानात आली आणि सोळाव्या शतकात हा दाई सुरत येथे येऊन राहू लागला. त्याचे हिंदुस्थानातील अनुयायी बोहरा म्हणून ओळखले जातात.

निझारी शाखेचे नेतृत्व हसन इब्‍न अल्‌-सब्बाह (मृ. ११२४) यांच्याकडे होते. आलामूत या प्रमुख किल्ल्यांसहित इराण व सिरियातील अनेक किल्ले त्यांच्या नियंत्रणाखाली होते. ते व त्यांचे वंशज आलामूत येथून पक्षाचे नियंत्रण करीत. आपली दहशत निर्माण व्हावी म्हणून हत्या करणारे दरोडेखोर त्यांनी हाताशी धरले. यावरून त्यांना ‘हाशिशी’ असेही नाव पडले. हसन यांचा चौथा वंशजही हसन याच नावाचा होता. त्याने आपणच इमाम निझार यांचा वंशज असल्याचे व कियामतीची वेळ आली असल्याचे जाहीर केले. यामुळे त्याला व त्याच्या वंशजांना लोक ईश्वराचा आविष्कार मानू लागले. पुढे त्यांची इराणातील सत्ता मोगलांनी आणि सिरियातील सत्ता मामलूक यांनी संपुष्टात आणली. तेव्हा निझारी शाखा इमामांकरवी इतरत्र कशीबशी टिकून राहिली. हे इमाम आलामूत येथील राजांचेच वंशज होते. चौदाव्या शतकापासून मात्र निझारींमध्ये दोन परस्परविरोधी शाखा अस्तित्वात आल्या. ताहिरशाह (मृ. १५४५ ?) हे त्यांतील कनिष्ठ शाखेचे पुरुष १५२० मध्ये हिंदुस्थानात अहमदाबाद येथे येऊन स्थायिक झाले. त्यांच्या वंशजांनी हिंदुस्थानातून सिरियातील इस्माइलींचे सु. दोन शतके नियंत्रण व नेतृत्व केले. वरिष्ठ शाखेचे इमाम १८८० पर्यंत पर्शियातील विविध भागांत राहत होते. आगाखान या नावाने प्रसिद्ध असलेले इमाम १८४० मध्ये हिंदुस्थानात आले. ते आणि त्यांचे वंशज यांनाही लोक आगाखान म्हणूनच ओळखू लागले. आगाखानाचे जगातील विविध भागांत अनेक अनुयायी आहेत. ते खोजा म्हणून ओळखले जातात.

ईश्वर एकमेवाद्वितीय असून मानवाला अनाकलनीय आहे. विश्वचैतन्य, विश्वबुद्धी, विश्वात्मा, सजीव सृष्टी इ. ईश्वराच्या छटा आहेत. विश्वबुद्धी किंवा विश्वज्ञानातून ‘नातिकां’ची किंवा थोर इमामांची उत्पत्ती होते आणि त्यांच्याकरवीच मानवाला ईश्वराच्या थोडेफार जवळ जाता येते. इमाम सर्वज्ञ व पापमुक्त असतात. समकालीन इमामाला जो जाणू शकणार नाही, तो काफर होय, अशी या पंथाची तात्त्विक भूमिका आहे.

संदर्भ :

  • Asani, Ali S.; McGregor, R. S. Ed. ‘The Ismaili Ginans as Devotional Literature’, Devotional Literature in South Asia, Cambridge, 1992.
  • Daftary, Farhad, The Ismailis : Their History and Doctrines, Cambridge, 1990.
  • Gibb, H. A. R.; Kramers, J. H. Ed. Shorter Encyclopaedia of Islam, Leiden, 1961.
  • Hamdani, Abbas H. The Beginnings of the Ismaili Da‘wa in Northern India, Cairo, 1956.
  • Lokhandwall, Shamoon T. ‘The Bohras, a Muslim Community of Gujarat’, Studia Islamica 3, 1955.
  • Shackle, Christopher; Zawahir, Moir, Ismaili Hymns from South Asia : An Introduction to the Ginans, London, 1992.