गौतम झुआन : (७१२–७७६). प्राचीन चीनमधील भारतीय वंशाचा एक प्रशासकीय अधिकारी व राजज्योतिषी. त्याच्या कुटुंबाचा मूळपुरुष गौतम प्रज्ञारुची नामक वाराणसीतील ब्राह्मण होता. त्याला धर्मज्ञान आणि अजित असे दोन पुत्र होते. तत्कालीन चीनमधील तांग (थांग) साम्राज्यात बौद्ध धर्मासोबतच भारतीय खगोलशास्त्राला मानाचे स्थान असल्याने अनेक भारतीय चीनमध्ये मोठी पदे भूषवीत होते. इ.स. सहाव्या शतकात गौतम प्रज्ञारुची सहकुटुंब चीनमध्ये येऊन तांग साम्राज्याची राजधानी चांग-आन इथे राहू लागले. अजितला राहुल नामक तर राहुलला सिद्धार्थ नामक एक पुत्र होता. या सिद्धार्थला जिआन आणि झुआन असे दोन पुत्र होते. धर्मज्ञान एका बौद्ध मठाचा प्रमुख झाला, तर त्याचा पुत्र राहुल हा कुटुंबातील पहिला राजज्योतिषी होता. तांग राजवंशातील चिनी सम्राज्ञी वू हिच्या आदेशानुसार त्याने नवीन पंचांग व दिनदर्शिका तयार केली. त्याचा पुत्र सिद्धार्थने नवग्रहसिद्धांत नामक ग्रंथाचे चिनी भाषांतर केले. या सिद्धार्थाचा चौथा पुत्र म्हणजे गौतम झुआन होय. या कुळातील पुरुषांच्या नावाआधी ‘गौतमʼ हा शब्द लावण्याची पद्धत होती. या कुटुंबातील पुरुषांनी कालांतराने बौद्ध धर्म स्वीकारून चिनी स्त्रियांशी लग्ने केली. परिणामी पुढील पिढ्यांतील पुरुषांची नावेही चिनी वळणाची झाली. शिवाय मरणोत्तर दहनाचा भारतीय रिवाज मागे पडून दफनाचा चिनी रिवाज अंगीकारण्यात आला. सुरुवातीला प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांच्या भाषांतरांचे काम करणाऱ्या या पंडितांनी उत्तरोत्तर मोठ्या पदांवर काम केले.
कुटुंबाच्या प्रभावामुळे खूप तरुण वयातही झुआनला मोठ्या जबाबदारीची पदे मिळाली. जन्मानंतरचा झुआनचा सर्वप्रथम उल्लेख येतो तो चीनच्या शान्शी प्रांतातील फेंगशिआंग परगण्यातील सरदाराचा सहायक म्हणून. त्यानंतर शान्शी प्रांतातीलच लिजू परगण्यात त्याची एक सैन्याधिकारी आणि ज्योतिषी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यानंतर त्याने अनुक्रमे एक सरदार म्हणून आणि नंतर तांग साम्राज्याची राजधानी शिआन (मध्य चीन) येथे राजदरबारात ज्योतिषी म्हणून काम केले. यात मुहूर्त शोधणे, गरज भासल्यास अचूक नवीन पंचांग तयार करणे, इत्यादी कामांचा समावेश असे. इ. स. ७२१ मध्ये तत्कालीन राजज्योतिष्याला काही मुहूर्त शोधण्यात अपयश आल्यामुळे तांग सम्राट शुआनझोंगने यिशिंग नावाच्या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाला नवीन पंचांग तयार करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे तसे पंचांग तयार केल्यानंतर काही काळाने यिशिंग मरण पावला. काही वर्षांनी नवीन पंचांगाची तपासणी होऊन इ. स. ७२७ मध्ये ते अधिकृत करण्यात आले. त्यानंतर इ.स. ७३३ मध्ये सम्राट शुआनझोंगकडे झुआन आणि चेन शुआनजिंग या त्याच्या सहकाऱ्याने तक्रार केली की, यिशिंगप्रणीत पंचांगात बऱ्याच चुका आहेत. यावर सम्राटाने पंचांगाच्या फेरतपासणीचा आदेश दिला. फेरतपासणीत यिशिंगचे पंचांग अचूक असून त्यावरचे आक्षेप निराधार असल्याचे समजल्यावर झुआनला खोटे आरोप केल्याबद्दल राजधानीतून हद्दपार केले गेले. मुळात झुआनने असे आक्षेप घेण्याचे कारण इतकेच होते की, त्याला पंचांगशुद्धीच्या कामात सहभागी करून घेतलेले नव्हते.
या कालखंडात झुआनने शान्शी प्रांतातील लिनफेंग परगण्याचा उपाध्यक्ष वांग सी याच्या थोरल्या मुलीशी लग्न केले. हे घराणे जुने व प्रभावशाली होते, तसेच तांगपूर्व काळात चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. या लग्नापासून झुआनला सहा पुत्र झाले – शांग, बिआन, यू, हुआंग, यान आणि माओ. झुआनचा सख्खा भाऊ जिआन आणि पाचवा मुलगा यान हे दोघेही झुआनसोबत तांग साम्राज्याच्या खगोलशास्त्र विभागात होते. इ.स. ७७६ रोजी वयाच्या पासष्टाव्या वर्षी झुआन मरण पावला. त्यानंतर तीन महिन्यात त्याची पत्नीही मरण पावली. त्याला तांग साम्राज्याची राजधानी चांग-आन येथे दफन करण्यात आले. इ. स.१९७७ च्या मे महिन्यात त्याचे थडगे व त्यावरील विस्तृत मृत्युलेख पुरातत्त्वीय उत्खननात सापडला. प्राचीन ग्रंथांसोबतच या शिलालेखातूनही गौतम झुआनबद्दल तपशीलवार माहिती मिळते.
संदर्भ :
- Sen, Tansen, Buddhism, Diplomacy and Trade : The realignment of Sino-Indian relations, 600-1400, University of Hawai Press, USA, 2003.
- Sen, Tansen, ‘Gautama Zhuan : An Indian Astronomer at the Tang Court’, China Report, Vol. 31, Issue 2, pp. 197-208, New Delhi, India, 1995.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर