निरनिराळ्या तीव्रतेचा सल्फर डाय-ऑक्साइड आणि वनस्पतींचा प्रतिसाद.

गंधक (सल्फर) हे वनस्पतींना पोषक द्रव्य आहे. सल्फर डाय-ऑक्साइड पानांमध्ये शिरला, तर झाडाच्या चयापचय क्रियेत त्याचे पचन होते आणि तो प्रथिनात बांधला जातो. मात्र, पानांत शिरताना तीव्रता व वेग जास्त असल्यास तोच वायू प्रदूषक ठरतो आणि वनस्पतीवर दुष्परिणाम दिसू लागतात.

रंध्रांवाटे पानात शिरलेले सल्फर डाय-ऑक्साइड पानांतील पाण्यात विरघळते आणि सल्फ्यूरस अम्ल तयार होते. हे अम्ल वनस्पतींना विषारी असते, परंतु अस्थिर असल्याने त्याचे जलद सल्फर डाय-ऑक्साइडमध्ये रूपांतर होते. हे अम्ल सौम्य असतानाच वनस्पतीच्या पचनक्रियेत सामावले जाते. विशेषतः जमिनीतून कमी गंधक मिळत असेल तर हवेतून येणारे सौम्य प्रमाणातील गंधकाम्ल वनस्पतीस पोषक ठरते.

प्रदूषक वायूंचा वनस्पतींवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी तयार केलेली प्रायोगिक पारदर्शक खोली.

रंध्रातून पानांत शिरलेले हे प्रदूषक पेशींदरम्यानच्या जागांमधून पेशीत शिरते, हरितद्रव्य – अ (chlorophyll – a) वर प्रथम परिणाम करते, नंतर हरितद्रव्य – ब चा नाश करते. पेशीतील रसाचा अम्लांक कमी झाल्याने हरितद्रव्यातील मॅग्नेशियम सुटा होतो. परिणामी पिवळट-भुरे फिओफायटीन द्रव्य दिसून येते. असा परिणाम सतत होत राहिल्यास पानाचा रंग मातकट-भुरा होतो. प्रदूषणाची तीव्रता चालूच राहिल्यास भुऱ्या पेशी मृत पावून गळून पडतात, पानाला भोके पडतात. पानाच्या नाजूक भागात हा परिणाम प्रथम दिसतो. नंतर तो शिरांच्या दरम्यानच्या भागात आणि पानांची टोके व कडा या भागांत दिसतो. एकदल वनस्पतींच्या पानांवर होणारा परिणाम पानांच्या कडा, टोक आणि समांतर शिरांच्या दरम्यान पांढरट रेघांच्या रूपात दिसतो.

वनस्पतींच्या निरनिराळ्या जातींवर वायुप्रदूषकांचा परिणाम वेगवेगळ्या प्रमाणांत होतो. विशेषकरून पानांत आकार, कणखरपणा, जाडी, पृष्ठावरील मेणाचे आवरण, रंध्रांचे आकार व वितरण या गुणांबरोबरच पानातील रस व रसायने यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे वनस्पती प्रकार सहनशील वा संवेदनशील बनतात. नुकतीच पूर्ण वाढ झालेली, परंतु मेणासारखे आच्छादन नसलेली पाने अतिशय संवेदनशील असतात. अनेक सर्वेक्षणे आणि प्रयोगान्ती असे दिसून आले आहे की, सूर्यफूल आणि त्याचे तिथोनियासारखे नातलग, लसूणघास, जव, कापूस, सोयाबीन, गहू व आंबा या वनस्पती सल्फर डाय-ऑक्साइड प्रदूषणास संवेदनशील आहेत, तर तगर (चांदणी), रुई, कण्हेर व चिकू सहनशील असतात.

संदर्भ:

  • Boralkar D.B.; Chaphekar, S.B. Foliar injury to Trigonella foenum-graecum  due to sulphur dioxide exposure.  Ind.J.Air Pollut. Contr. 4. 1983.
  • Keller and Schwager,. Air pollution and ascorbic acid. Eur.J.Forest Pathology. 7(6): 338-350. 1977 Knabe, W.. Effects of SO2 on terrestrial vegetation. Ambio, 5:213-218. 1976.
  • Rao, D.N. and LeBlanc, F. Effects of SO2 on the lichen algae, with special reference to chlorophyll. Bryologist, 69:60-75. 1966.

 समीक्षक : बाळ फोंडके