वनस्पतींच्या अतंर्गत संरक्षणप्रणालीमध्ये टर्पिनेप्रमाणेच प्रभावी कार्य करणारी नैसर्गिक नत्रयुक्त सेंद्रिय संयुगाची फळी म्हणजे अल्कलॉइडे. अशा प्रणालीमध्ये असणार्‍या अंदाजे दोन लक्ष द्रव्यांपैकी २१ हजार द्रवरूप घटक हे अल्कलॉइडे या नत्रयुक्त गटामध्ये मोडले जातात. यामधील कॅफीन, निकोटीन, मॉर्फीन, ॲट्रोपीन, एफेड्रीन यांचा मानवास प्राचीन काळापासून परिचय आहे.

अल्कलॉइडे हे जरी निसर्गनिर्मित असले तरी २१ व्या शतकात मानवानेसुद्धा त्यांची प्रयोगशाळेत निर्मिती केली आहे. हे द्रव्य अम्लधर्माकडे किंचितसे झुकलेले वाटतात. चवीला कडवट असलेला हा पदार्थ निसर्गात तीन प्रकारात पाहावयास मिळतो. याच्या रेणूस जर प्राणवायुचा घटक जोडला असेल, तर अल्कलॉइडे स्फटिकीय, रंगहीन रूपात आढळतात. प्राणवायू घटक नसेल तर ते स्निग्ध रूपात उडनशील असतात. ते तंबाखूमधील निकोटीन या स्वरूपात आढळते. निसर्गात पिवळा आणि केशरी रंग असणारे काही अल्कलॉइडेसुद्धा आहेत. ९० टक्के अल्कलॉइडे वनस्पतीविश्वात आढळत असले तरी काही जीवाणू, कवक आणि प्राण्यांच्या बाहय कातडीमध्येसुद्धा आढळलेले आहेत. हे द्रव्य पाण्यात अतिशय अल्प प्रमाणात विरघळते, मात्र अल्कोहॉलसारख्या द्रवरूप पदार्थात त्वरित विरघळते.

अल्कलॉइडे हे मोठया प्रमाणात शरीरात गेले तर विषारी ठरतात. यांचे प्रमाण उच्च वनस्पती कुलामध्ये पाने, फळे, खोडांच्या साली आणि मुळामध्ये जास्त आढळते. सिंखोना (Cinchona) वृक्षाची साल, सर्पगंधाची मुळे अथवा नक्स-व्होमिकाची (Nux–vomica) गोलाकार चपटी फळे यामध्ये अल्कलॉइडे मोठया प्रमाणात असतात. अल्कलॉइडेची निर्मिती वनस्पतींच्या नत्र चयापचय क्रियेमध्ये होते आणि त्यांच्या या निर्मितीचा मुख्य उद्देश म्हणजे वनस्पतींचे स्वत:चे संरक्षण. त्यांच्या कडवट चवीमुळे चराऊ जनावरे त्यांच्या संपर्कात येणे टाळतात, मात्र चुकून खाण्यात आले, तर त्या जनावरांच्या जन्मास येणाऱ्या वासरावर/कोकरावर त्याचा परिणाम जाणवतो. गाय आणि शेळी यांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. अनुवंशिक दोष असणार्‍या अशा जनावरांचा अंधश्रद्धा प्रचारकाकडून वापर केला जातो.

टयुलिप वृक्षामध्ये तयार होणारे अपोर्फिन (Aporphine) अल्कलॉइड वृक्षाचे कवकापासून रक्षण करते. हेमलॉक (Hemlok) ही वनस्पती अल्कलॉइडेमुळे कडसर आणि विषारी होते. निसर्गामध्ये फक्त याच नावाचे फुलपाखरू या वनस्पतींच्या फुलावर आढळते आणि त्याचे सुरवंट याचा पाला खातात. त्यामुळे या वनस्पतीमधील अल्कलॉइडे त्याच्या शरीरात साठविले जाते आणि शत्रूपासून त्याचे रक्षण होते. फुलपाखरांच्या काही विशिष्ट प्रजातीमध्ये वनस्पतीच्या आहारामधून संरक्षण करण्याची ही पद्धत अगदीच आगळी-वेगळी आहे.

अल्कलॉइडे या नत्रयुक्त द्रव्यांचा उपयोग हजारो वनस्पतींनी त्यांच्या संरक्षणासाठी केला असला तरी, मानवाने मात्र त्याच्याही पुढे जाऊन संरक्षणासाठी केला आहे. सुमारे १७ विविध दुर्धर आजारांवर ते कार्य करताना आढळते. उदा., क्युनोन हे अल्कलॉइड मलेरिया प्रतिबंधक आहे. उत्साहवर्धक आणि मेंदूस तरतरी आणणारे कोकेन, कॅफीन आणि निकोटीन यांना हजारो वर्षांचा इतिहास आहे. इनॉल विभागामधील अल्कलॉइडे त्यांच्या सेवनानंतर त्या व्यक्तीने कल्पना केलेले आभासी विश्व त्याच्या सभोवती तयार करतात म्हणूनच या समूहास वैदयकीय क्षेत्रात मानसोपचार तज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच वापरावे लागते. २१ व्या शतकात रासायनिक खतांचा अतिरेक टाळण्यासाठी सेंद्रिय व निसर्ग-शेतीचे महत्त्व वाढविले जात असल्याने जैविक कीडनाशकांचेही महत्त्व वाढत आहे. तंबाखूचे पाणी, निंबोळीचा अर्क यांचा वापर यामुळे वाढला आहे. अल्कलॉइडे वापर वनस्पतींची वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठीसुद्धा होतो. सध्या या क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन सुरू आहे.

संदर्भ :

  • Leland J. Natural Products from Plants, Second Edition,CRC, p30. ISBN O-8493-2976-0, 2006.
  • R.H.F. Mansake. The Alkaloids, Chemistry and Physiology, Volume VIII, Academic Press New York, p.673,1965.
  • https://www.Youtube.com/watch?v=VG1mPeHgDu4

समीक्षक : शरद चाफेकर