उथ्मान (उस्मान) बिन अफ्फान : (सु. ५७६—१७ जून ६५६). इस्लामी परंपरेतील तिसरे खलीफा. त्यांचा जन्म मक्का येथे कुरैश जमातीतील प्रसिद्ध बानू उमय्या कुलात झाला. त्यांचे कुटुंब श्रीमंत आणि कपड्यांचे व्यापारी होते. उस्मान यांनीही व्यापार यशस्वीपणे सांभाळला. त्यानंतर त्यांचा प्रेषित मुहंमद पैगंबरांशी निकटचा संबंध आला आणि त्यांनी आपला व्यवसाय सोडून इस्लाम धर्माला वाहून घेतले. मुहंमद पैगंबरांची मुलगी रुकय्या यांच्याशी त्यांचा विवाह झाला. उमर या दुसऱ्या खलीफांनंतर सहा उमेदवारांतून त्यांची खलीफा म्हणून निवड झाली. त्यांची कारकीर्द बारा वर्षांची (६४४–६५६) होती. पवित्र कुराणाची एकच एक अधिकृत अशी प्रत निश्चित व प्रचलित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.
त्यांच्या बारा वर्षांच्या कारकिर्दीत नव्यानेच एकत्रित झालेल्या अरबांनी सिरिया, ईजिप्त, उत्तर आफ्रिका, सायप्रस, आर्मेनिया आणि पर्शिया यांचा बराच भाग आपल्या स्वामित्वाखाली आणला. पुढे स्वाऱ्या बंद झाल्यामुळे आर्थिक चणचण सुरू झाली. सैन्याचे उत्पन्न कमी झाले. तशात पूर्वीचे ठिकठिकाणचे राज्यपाल काढून टाकून त्यांच्या जागी आपल्या नातेवाईकांची नेमणूक केल्यामुळे, ईजिप्तच्या पदच्युत राज्यपालाच्या नेतृत्वाखाली ६५६ मध्ये बंड झाले. बंडखोर सैनिकांनी खलीफांच्या राजवाड्याला वेढा घातला. तेव्हा मुहंमदांचे कनिष्ठ जावई अली यांनी शिष्टाई केली; परंतु तडजोडीच्या अटीप्रमाणे पूर्वीच्या राज्यपालांना न नेमल्यामुळे, वेढा घातलेल्या सैनिकांनी संतापून खलीफा उस्मान यांचा खून केला.
संदर्भ :
- Ruthven, M.; Nanji, A. Historical Atlas of Islam, Harvard, 2004.
- Saunders, John J. A History of Medieval Islam, Abingdon, UK, 1978.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.