उपवास म्हणजे विशिष्ट कालमर्यादेत मुख्यतः आहार वर्ज्य करण्याचे व्रत होय. या व्रतात ब्रह्मचर्य, मौन इ. निर्बंध शास्त्र वा रूढी जशी असेल, त्याप्रमाणे पाळावयाचे असतात. हे व्रत पाळण्याच्या कालमर्यादेत इष्ट देवतेची उपासना करावयाची असते. शिवाय उपवास हा पापक्षालनाचा एक मार्ग होय, असे गौतमधर्मसूत्रात सांगितले आहे. चित्त वा शरीर किंवा दोन्हीही शुद्ध राखण्याकरिता किंवा शुद्ध करण्याकरिता हे व्रत आचरावयाचे असते. ही कालमर्यादा चोवीस तासांपासून सप्ताह, महिना अशी दीर्घकालीनही असते. मात्र त्र्यहा, पंचाह, सप्ताह, मास, वर्ष इ. दीर्घ मुदतीच्या उपवासांमध्ये नियमित वेळी, मर्यादित आहारग्रहणास अनुमती असते. धर्मशास्त्रात अनुक्रमे एकादशी, प्रदोष, नवरात्र, शिवरात्री, ऋषिपंचमी, गणेशचतुर्थी इ. तिथी-उत्सव व शनिवार, रविवार इ. वार उपवासाचे म्हणून सांगितले आहेत. उपवास अगदी कडक रीतीने पाळण्यावर काही धर्मशास्त्रे भर देतात. दूध, फळे इ. विशिष्ट पदार्थांचे सेवन काही धर्मशास्त्रे संमत मानतात. ख्रिस्ती लोकांत अंडी, मासे इ. पदार्थांचेही उपवासात सेवन करणे संमत आहे. मुसलमान रमजानचा पवित्र महिना उपवासाचा मानतात. त्यात रात्री विशिष्ट कालात आहारग्रहणाला संमती आहे. यहुदी (ज्यू) व ख्रिस्ती या धर्मांत शब्बाथ व लेंट यांसारखे उपवासाचे दिवस ठरलेले असतात.

जैन, बौद्ध व हिंदू यांच्यात उपवासाचे माहात्म्य फार आहे. यांच्यामध्ये पापक्षालनार्थ वा प्रायश्चित्त म्हणून उपवासाचे व्रत सौम्य वा कडक रीतीने पाळण्याची प्रथा आहे. संतांच्या, प्रेषितांच्या किंवा अवतारांच्या पुण्यतिथी व जयंती यांनिमित्त काही काळ उपवास विहित असतो. विशिष्ट उत्सव, यज्ञ किंवा अन्य धार्मिक समारंभ या प्रसंगीही वैयक्तिक वा सामुदायिक उपवास करावयाचे असतात. सूर्य-चंद्र-ग्रहणकालातही उपवास विहित आहेत.

चित्तशुद्धी अथवा पापनिष्कृतीकरिता म्हणजेच प्रायश्चित्त म्हणून महात्मा गांधींनी राजकीय आंदोलनात उपवास केलेले आहेत. स्वतःच्या चित्तशुद्धीसाठी तसेच इतरांनी केलेल्या पापाचे वा अत्याचाराचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी उपवासाचा अनेक वेळा अवलंब केला. इतरेजनांच्या पापाबाबत आपण स्वतः उपवासाचे प्रायश्चित्त घेण्याची कल्पना त्यांनी ख्रिस्तचरित्रावरून स्वीकारली.

संदर्भ :

  • काणे, म. म. पां. वा.; अनु. भट, यशवंत आबाजी, धर्मशास्त्राचा इतिहास, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई, १९६७ व १९८०.