माच :  मध्यप्रदेशातील माळवा आणि त्याच्या आसपास क्षेत्रांतील अत्यंत लोकप्रिय लोकनाट्यशैली. राजस्थानमधील ख्याल शैली आणि उत्तर प्रदेशातील नौटंकी याच्याशी हिचे साधर्म्य आहे. या लोकनाट्यशैलीची वेगळी छाप आणि ओळख त्यामध्ये सादर होणाऱ्या कविता आणि छंदांमुळे तयार झालेली आहे. माळवा प्रदेशामधील प्रचलित माचचे पहिले प्रवर्तक उज्जैनचे रहिवासी बाल मुकुंद गुरु यांना मानले जाते. त्यांनी माचसाठी सोळा विविध लेखांची निर्मिती केली. ज्या सोळा रचना आजही मूळ स्वरूपात गुरुजींचे शिष्य यांच्याकडे सुरक्षित आहेत. बाल मुकुंद स्वतः मुख्य पात्र म्हणून या रचनांमध्ये अभिनय सादर करत असत. यामध्ये रंगमंचाचा एक प्रकार असला तरी अभिनयावर कमी भर दिला जातो आणि नाटकातील गीत आणि नृत्यातून कथा उलगडत जाते. नाटकाची पार्श्वभूमी पडद्याद्वारे दर्शविली जाते आणि नर्तक सहसा गायकही असतात.

माच लोकनाट्य : एक दृश्य

माच या शब्दाची उत्पत्ती मंच शब्दापासून झाली असे मानतात. माच सुरू होण्याच्या एक आठवडा अगोदर मोकळ्या जागेमध्ये मंच उभारला जातो. त्याच्या सभोवताली माच मंडळातील कलाकार एकत्र येऊन आपल्या गुरूंच्या हाताने खांबाची पूजा करतात. मंच पाच फूट ते दहा फूट उंचीवर तयार केला जातो, त्यावर विविध रंगाची कागदाची फुले डिंकाने चिटकवली जातात. माच मधील सर्व पात्र या ठिकाणी आपली कला सादर करतात. सुविधेसाठी दर्शकांना मंचाच्या तिन्ही बाजूला बसण्याची व्यवस्था केलेली असते. माच लोकनाट्य शैलीमध्ये मंच सज्जा विशेष आकर्षक असते. राज महालाचे वैभव दाखविण्यासाठी प्रभावी असा मंच तयार केला जातो. यामध्ये पहारेकरी, राजा, राजदरबारातील अन्य व्यक्ती, सैनिक यांना बसण्यासाठी विशिष्ट व्यवस्था केलेली असते. याद्वारे राजमहालाचे वैभव सादर केली जाते. पूर्वीच्या काळी पौराणिक गोष्टींचे सादरीकरण केले जात असे: परंतु काळानुसार यामध्ये उपलब्ध साहित्य, प्रेम कथा, ऐतिहासिक व लोककथा यांचाही समावेश केला जात आहे. राजा गोपीचंद, प्रल्हाद, नळ आणि दमयंती आणि मालवण नायक तेजाजी आणि केदारसिंग यांचे किस्से या नाटकांतून बघायला मिळतात. अलिकडच्या काळात माच लोकनाट्य शैलीमध्ये चोरी, साक्षरता आणि भूमिहीन कामगार यासारख्या समकालीन मुद्द्यांवर देखील लक्ष केंद्रित केले आहे.

चोपदार (गदाधारी, जो सूत्रधार म्हणून काम करतो), भिश्ती (जो नाट्य चालू होण्यापूर्वी रंगमंचावर पाणी टाकतो), फर्राश (जो रंगमंचावर आसन टाकतो) हे या नाट्यशैलीचे तीन महत्त्वपूर्ण पात्र आहेत. या तिन्ही पात्रांशिवाय सादरीकरण अशक्‍य आहे. इतर पारंपरिक नाट्यशैली प्रमाणे माच या लोकनाट्यशैलीमध्ये विदूषक हे पात्र महत्त्वपूर्ण आहे. माच सादर करणारे कलाकार विनम्र व दर्शकांच्या परिचयाचे असतात. माचच्या संगीतामध्ये ढोलक हे मुख्य वाद्य आहे, याच बरोबर सारंगी व नगारा याचाही वापर केला जातो. गती वाढवण्यासाठी, छंद बद्ध संवादाचे लयीत सादरीकरण करण्यासाठी तालाचे विशेष महत्त्व आहे. यामध्ये नृत्याची विशेष भूमिका असते. संगीत हा माच सादरीकरणाचा मुख्य घटक आहे आणि हिंदुस्थानी शास्त्रीय रागांतून नाटक रंगवले जातात किंवा प्रसंगाला प्रतिबिंबित करणारे शब्द आणि सूर यांच्यासह हे चित्र मोठ्या प्रमाणात रेखाटते. वेशभूषा व रंगभुषा भडक स्वरूपाची व आकर्षक स्वरूपात केलेली असते. आधुनिक काळात वेशभूषा व रंगभूषेतून सामान्य जीवनशैलीचे सादरीकरण केले जाते.

माच ही दोन किंवा तीन शतकांची जुनी परंपरा आहे, जी १९ व्या शतकाच्या धार्मिक घडामोडींनी आकारली होती. मूळ होळीच्या सणाशी संबंधित असली तरी ही नाट्यशैली आता बर्‍याच प्रसंगी सादर केली जाते.

संदर्भ :