भांड पाथर : जम्मू कश्मीरमधील पारंपरिक लोकनाट्य. १५ व्या शतकामध्ये सुलतान जैनुल आबिदीन याच्या काळात जम्मू कश्मीरमध्ये  नाटक आणि नाट्यकार यांना विशेष महत्त्व होते. दरबारामध्ये त्यांचे मंच प्रदर्शन केले जात. काश्मीरचा राजा अली शहा आणि हसन शहा यांनी कर्नाटक संगीतातील विद्वानांनाही नाट्य कला सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केले जायचे असे मानले जाते. कालपरत्वे दरबारामध्ये सादर होणारी नाट्यकला बंद झाली. मात्र दरबारातील ही कला एक लोककला म्हणून जिवंत राहिली. भांड दूरदूरच्या गावांमध्ये जाऊन आपली कला सादर करून समाजातील लोकांचे मनोरंजन करत. अशाप्रकारे त्यांनी आपली कला जिवंत ठेवली.

भांड हे उपहासात्मक आणि वास्तववादी नाटक आहे जे सामान्यत: एकपात्री आहे. भरतमुनीच्या नाट्यशास्त्रामध्येही त्याचा उल्लेख केला गेला आहे. या नाटकात भांड कलाकार पूर्णपणे कौशल्यपूर्ण असतात आणि ते प्रचलित कथांमध्ये समकालीन धार्मिक, सामाजिक आणि राजकीय विषय तयार करून सादर करतात. हे कलाकार स्वत:ला एक कुशल अभिनेता, नर्तक, एक्रोबीट आणि संगीतकार होण्यासाठी प्रशिक्षण देत असतात. कथा अशा पद्धतीने वर्णन केल्या जातात की प्रत्येक सादरीकरणामध्ये प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन असते. भांड पाथर हे लोकनृत्य प्रामुख्याने उत्तर भारतातील पंजाब आणि कश्मीर या भागामधील सामाजिक स्थितीवर व्यंग सादर करणारी प्राचीन पद्धती आहे. भांड या शब्दाचा अर्थ आहे विदूषक, विनोदवीर, भाट. काश्मीरमध्ये पारंपरिक भांड नाट्यशैलीमधील पाथर याचा अर्थ एक खेळ किंवा नाटक असा होता. मुख्यतः भांड या शब्दाचा अर्थ भान किंवा लक्ष या शब्दापासून उत्पन्न झाले असे मानले जाते. काश्मीरमधील भांड पाथर पारंपरिक नृत्य, संगीत आणि नाट्यकला यांचा अद्भुत संगम आहे. यामध्ये व्यंग, हास्यविनोद, नक्कल याद्वारे हास्य निर्माण करण्यासाठी प्राथमिकता दिली जाते. नर्तक, गायक, अभिनेता तसेच या परंपरेशी संबंधित सर्व कलाकार यांना भांड असे म्हणतात. भांडमध्ये वापरल्या जाणार्‍या रचना काश्मिरातील मध्ययुगीन व आधुनिक रहस्यमय वख्यांमधील वख आणि श्रुखांवरून तयार केलेल्या आहेत. कालांतराने हे नाटकीय अनुभव शैक्षणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर परिपक्व आणि संपूर्ण रंगमंचावर सादर होणारी कला म्हणून विकसित झाली आहे.

भांड हे मूळ रूपात शेतकरी वर्गातील लोक आहेत. मे आणि जून महिन्यामध्ये शेतामध्ये आलेल्या पिकांसमोर नृत्य, गायन करून धान्य कपडे आणि पैसे प्राप्त करत. भांड कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून देव-देवतांची आराधना सुद्धा करत. या विशेष कार्यक्रमांना भांड जश्न असेही म्हणतात. या प्रकारच्या नृत्यामध्ये देव-देवतांच्या आराधनेसोबतच व्यंग, विनोद, नक्कल यांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात समावेश केला जातो. जेव्हा भांड कार्यक्रम सुरू होतो तेव्हा न्हावी, झाडूवाला, पंडित, शेतकरी, राजा, स्वयंपाकी, अशा सर्वांवर आधारित व्यंग सादर केले जाते. भांड कलेमध्ये प्रत्येकाची नक्कल करणे याला विशेष महत्त्व आहे. राजा आणि सन्माननीय व्यक्ती यांची नक्कल करणे आणि त्याद्वारे मनोरंजन करणे हे या लोकनाट्याची विशेष कला आहे.

भांड पाथर याच्या सादरीकरणामध्ये पूर्वनिर्धारित किंवा लिखित पटकथेचा वापर केला जात नाही. नृत्याप्रमाणे विविध मुद्रा आणि हावभावाच्या माध्यमातून गोष्ट पुढे पुढे जात राहते. भांड पाथर मध्ये स्त्रियांची पात्रेही पुरुषच सादर करतात. ही कला सादर करण्यासाठी प्रामुख्याने नक्कल करणारे व रचनाकार असे दोन कलाकार, स्त्रियांची पात्र करणारे दोन पुरुष, दोन सुरनई वादक (एक शहनाई प्रमाणे वाजविले जाणारे सुषिर वाद्य), दोन ढोल वाजवणारे तर एक नगारा वाजविणारा वादक असे कलाकार असतात. नाटकातील विविध पात्र दर्शकांमध्ये राहूनच आपली कला सादर करतात. वेशभूषा आणि रंगभूषा काश्मिरी असते. शिकारगा हे एक व्यंगात्मक पारंपरिक पाथर असून तो जंगलामध्ये जाऊन हरणांची शिकार करतो या कहाणीवर हे पात्र आधारित आहे. या पारंपरिक नाट्यशैलीमध्ये शिकारगा  हे एकमेव पाथर आहे जे प्राण्यांचा वेश धारण करून आणि आणि मुखवट्यांचा वापर करून सादर केले जाते.

आयजीएनएसीने या संस्थेद्वारा शास्त्र व प्रार्थना कार्यक्रमांतर्गत रिव्हिजिटिंग भांड पाथर :होम थिएटर ऑफ काश्मीर या महोत्सवात गोसाईन पाथर, शिकारगा पाथर आणि बादशाह पाथर  ही तीन नाटके सादर करण्यात आली होती. गोसाईन पाथर, राजा पाथर, दर्जी पाथर, इंग्रज पाथर ही अलीकडे रणभूमीवर सादर होणारी नाटके भांड पाथर या लोकनाट्याच्या ऐतिहासिक युगाचे प्रतिबिंब आहेत असे अभ्यासक मानतात.

संदर्भ :

  • वरदपांडे, मनोहर लक्ष्मन, हिस्ट्री ऑफ इंडियन थियेटर, अभिनव पब्लिकेशन्स ,१९८७,
  • CCRT Publications, CCRT, New Delhi.
  • S.C.Bhatt, Bhargava Gopal, Land And People, Kalpaz Publications, New Delhi, 2006.