रूपिम : पारंपारिकदृष्ट्या भाषेचा विचार करताना ‘शब्द’ संकल्पनेला महत्त्व दिले जाते. पण भाषाशास्त्राच्या दृष्टीने भाषेचा विचार केल्यास ‘शब्द’ ही संकल्पना अपुरी पडते. उदा. ‘राम’, ‘रामाने’, ‘रामावर’ इ. मराठीतील शब्द एकाच शब्दाची रूपे आहेत की ते स्वतंत्र शब्द आहेत? शब्द या संकल्पनेच्या आधारे याचे निश्चित उत्तर देता येत नाही. भाषेतील घटकांत असणारा परस्पर संबंध दाखविण्यासाठी आणि त्याचा भाषाशास्त्रीय दृष्टीने अभ्यास करण्यासाठी संरचनावादी अभ्यासकांनी ‘रूपिम’ ही संकल्पना योजली. व्याकरणिक विश्लेषणातील व अर्थदृष्ट्या अविभाज्य लघुत्तम घटकासाठी ‘रूपिम’ संज्ञा वापरली जाते. (मराठीत या संकल्पनेस ‘पदिम’ असेही म्हटले जाते). रूपिमाची व्याख्या – ‘अर्थपूर्ण लघुत्तम रूप’ (रमेश धोंगडे, २००६) किंवा ‘व्याकरणिक विश्लेषणातील लघुत्तम घटक’ (मिलिंद मालशे, १९९५) अशी केली गेली आहे. अर्थात या दोहोंनी व्याकरणिक व अर्थस्तरावर रूपिमाचे अस्तित्त्व मान्य केले आहे. रूपिम विश्लेषणात परस्पर विरोधाचे तत्त्व वापरले जाते. प्रत्येक रूपिम हा स्वनात्मक व अर्थात्मक दृष्टीने अनन्य असतो. ‘ज्या भाषिक रूपाचे इतर कोणत्याही भाषिक रूपाशी स्वनात्मक-अर्थात्मक साम्य नसते असे रूप म्हणजे रूपिम होय’ अशी व्याख्या ब्लूमफिल्डने केलेली आहे. रूपिम संकल्पनेच्या या विश्लेषणाच्या आधारे वर दिलेल्या उदाहरणात {राम} {ने} व {वर} अशी तीन रूपिमे आपल्याला मिळतात.

रूपिमे महिरपी कंसात { } दाखविली जातात. रूपिमांचे दोन प्रकार पडतात. (१) बद्ध रूपिम व  (२) मुक्त रूपिम.

(१) बद्ध रूपिम : वाक्यात (पदात) जे रूपिम स्वतंत्रपणे अवतरू शकत नाहीत त्यांना ‘बद्ध रूपिम’ म्हणतात. उदा. ‘रामाने’, ‘पुस्तके’ या शब्दांची फोड केली असता राम्+ने व पुस्तक्+ए अशी रूपे मिळतात. यांतील ‘ने’ व ‘ए’ ही रूपे स्वतंत्रपणे वाक्यात येऊ शकत नाहीत. इतर रूपिमांना जोडूनच ती अर्थपूर्ण वाक्य तयार होण्यास सहाय्यभूत ठरतात. मराठीतील पूर्व प्रत्यय (उदा. बे-, नि-) व उत्तर प्रत्यय (उदा, -करी, -दार) बद्ध रूपिमे आहेत.

(२) मुक्त रूपिम : वाक्यात जे रूपिम इतर रूपिमांच्या सहाय्याशिवाय स्वतंत्रपणे वाक्यात येते त्याला ‘मुक्त रूपिम’ म्हणतात. उदा. ‘छान’, ‘मांजर’ रूपिम ही एक अमूर्त संकल्पना आहे. भाषेत प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या रूपिमाच्या रुपाला ‘रूपिका’ असे म्हणतात. रूपिका या भाषेत पुनःपुन्हा सिद्ध होणाऱ्या विशिष्ट स्वनांचा संच असतात.

काही विशिष्ट परिस्थितीत रूपिमांची विशिष्ट रूपे येतात. त्या विशिष्ट रूपांना त्या रूपिकाची रूपिकांतरे म्हणतात. रूपिकांतरांची वाटणी पूरक (complementory) असते. व्याकरणिक व ध्वनीसान्निध्य या दोन कारणांमुळे रूपिकांतरांचे वितरण होते. उदा. ‘जातो’ व ‘गेला’ या दोहोंमधील [जा] व [गे] ही {जा} या रूपिमाची रूपिकांतरे आहेत. [गे] या रूपिकांतराचा विनियोग /वापर हा ‘भूतकाळ’ दर्शविण्यासाठी होतो व अन्यत्र [जा]  या रूपिकांतराचा वापर केला जातो. रूपिकांतरे विश्लेषण पुढील प्रमाणे दाखविले जाते.

{जा} -> [गे] / भूतकाळी रूप

{जा} -> [जा] / अन्यत्र

(रूपिकांतरे ही चौकोनी कंसात [ ] दाखविली जातात.)

मराठीतील शब्द हे रूपिमांशी एकास एक नात्याने जोडलेले नाहीत. मराठीतील शब्दांमध्ये विकार प्रक्रिया अधिक आहे. त्यामुळे सुटसुटीतपणे शब्दातून मूळ रूपिम काढणे सोपे नाही. उदा. ‘आहे’ व ‘होता’ या दोन शब्दांत लिंग, वचन, पुरुष व काळ यांचे स्वतंत्र प्रत्यय काढल्यास मूळ एक रूपिम मिळत नाही. {आह्} {हो} {अस्} या रूपिमांत स्वनात्मक साम्य नाही. शब्दातील विकार बाजूला काढून उरणारे रूप हे मूळ रूपिम मानण्यात अडचणी येतात. याला पर्याय म्हणून रूपिकाबदलाची प्रक्रिया मानता येते. म्हणजे, {आह्} रूपिमाचे वर्तमानकाळी क्रियापद रूप [आहे] व भूतकाळी क्रियापद रूप [होते] असे मानणे सोपे जाते.

संदर्भ :

  • धोंगडे, रमेश, भाषा आणि भाषाविज्ञान, दिलीपराज प्रकाशन, पुणे, २००६.
  • मालशे, मिलिंद, आधुनिक भाषाविज्ञान: सिद्धान्त आणि उपयोजन, लोकवाङ्मय गृह व राज्य मराठी विकास संस्था, १९९५.
  • Katamba, F., Morphology,Basingstoke : MacMillan,1993.